सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल
सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव या लहानशा गावात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले मा.नंदू हिरालाल चौधरी हे नाव आज गोसेवा आणि भारतीय गोवंश संवर्धन क्षेत्रात एक आदरयुक्त प्रेरणास्त्रोत ठरले आहे. शेतकरी वडिलांच्या कष्टात वाढलेले, साधेपणात संस्कारांचे बीज घेऊन मोठे झालेले मा.चौधरी यांनी आपल्या जीवनाची दिशा लहानपणातच निश्चित केली होती.
त्यांचे बालपण कष्टमय होते. घरची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य असताना ही, त्यांनी शिक्षण आणि मातापित्यांच्या कर्तव्यांमध्ये संतुलन साधले. शेतीत आई-वडिलांना मदत करत, अभ्यास करत आणि आसपासच्या सामाजिक वास्तवाचा अभ्यास करत मोठे होत असताना त्यांच्या मनात एक दृढ संकल्प निर्माण झाला."घराच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही."
मात्र शिक्षणाइतकाच त्यांच्या मनाचा एक कोपरा गोसेवेच्या पवित्र भावनेने व्यापलेला होता. गायीं विषयी त्यांना लहानपणापासून अपार प्रेम होते. त्यांच्या मनात गोमातेला केवळ जनावर न मानता, ती आपली माय आहे असा श्रद्धेचा भाव होता. गायत्री परिवाराचे बालवयातच लाभलेले संस्कार आणि "गायत्री मंत्राने आयुष्य घडते" हा अनुभव त्यांच्या जीवनाचा दिशादर्शक ठरला.
शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुणे नगरीकडे वाटचाल केली. शहरी जीवनात पाय रोवत असतानाच, त्यांनी आपल्या गोसेवेच्या ध्येयाला कधीही विसरू दिले नाही. आणि त्या ध्येयाचे मूर्त रूप म्हणजेच ‘मोहन शक्ती गोशाळा’ केवळ एक संस्था नव्हे तर त्यांच्या आत्म्याचा श्वास.
गोपालना सारखे कार्य सुरु करताना अनेक अडचणी आल्या, पण त्यांच्या निश्चयापुढे त्या क्षुल्लक ठरल्या. समाजात गोसेवेची साखळी निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी स्वतः च्या गौ शाळेतील ५१ गाई शेतकऱ्यांना बहाल केल्या आहेत. हा त्यांचा खूप मोठा कार्यदृष्टिकोन होता. “गोसेवेचा दीप एका माणसाकडून दुसऱ्याकडे जावा, हीच खरी सेवा.”
त्यांचं कार्य केवळ गोसेवे पुरतं मर्यादित नाही. त्यांनी लाल कंधारी या महाराष्ट्राच्या अभिमानास्पद देशी गायींच्या जातीवर संशोधन सुरू केले आहे. या गायींचं संवर्धन, त्यांच्या पिढीला टिकवणं, हे त्यांनी आपलं जीवनकार्य मानलं आहे. आज त्यांच्याकडे पाच लाल कंधारी गोशाळा आणि इतर सहा गोशाळांची जबाबदारी आहे. त्या प्रत्येक गोशाळेत त्यांनी केवळ गायींची देखभालच केली नाही, तर त्या परिसरातील संस्कृती आणि परंपरेला नवा उजाळा दिला.
या विशाल कार्यामध्ये त्यांची अर्धांगिनी सौ. शोभा चौधरी यांचा अमूल्य सहभाग आहे. शिक्षकी परंपरेतून आलेल्या, सौम्य स्वभावाच्या आणि समर्पित वृत्तीच्या शोभाताईंनी आपल्या पतीच्या कार्यात खांद्याला खांदा लावून साथ दिली आहे. आपल्या पतीच्या
सेवेसंकल्पामध्ये त्या मनोभावे सहभागी आहेत.
त्यांची कन्या सुद्धा त्यांच्या मूल्यांचा वारसा अभिमानाने पुढे नेत आहे. ऑस्ट्रेलिया येथे उच्चपदस्थ नोकरी करत असताना ही, भारतीय गोमाते विषयीचा तिचा जिव्हाळा आज ही तसाच आहे. हेच दर्शवतं की संस्कारांची ज्योत योग्य पद्धतीने लावली गेली तर ती पिढ्यानपिढ्या प्रकाशमान राहते.
मा.नंदू चौधरी हे केवळ स्वतःच्या गोशाळेतच नव्हे तर इतर संस्थांना ही सतत मदतीचा हात देत असतात. पिंप्री येथील ‘कामधेनु गोशाळा’चे प्रमोदभाऊ चौधरी यांना त्यांनी वेळोवेळी मदत केली आहे. यामागे कोणता ही प्रसिद्धीचा हेतू नाही, तर एकच तत्त्व “सेवा हाच खरा धर्म आहे.”
पुण्यासारख्या महानगरात राहून ही, त्यांनी विषमुक्त शेतीचा उपक्रम सुरू केला आहे. स्वतः शेतात उतरत, गायींची सेवा करत, आणि इतरांना प्रत्यक्ष कृतीद्वारे प्रेरणा देत, त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. आज जेव्हा शहरी लोक नैसर्गिकते पासून दुरावत आहेत, तेव्हा मा.नंदू चौधरी यांचे कार्य म्हणजे “शाश्वत जीवनशैलीचे जिवंत उदाहरण” आहे.
त्यांचा हा जीवनप्रवास म्हणजे एका सामान्य गावकऱ्याचा, अढळ निष्ठा आणि अथक प्रयत्नांच्या जोरावर एक महान समाजसेवक होण्यापर्यंतचा प्रवास आहे. गायींच्या कल्याणासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि भारतीय संस्कृतीच्या जपणुकीसाठी त्यांनी उचललेले हे कार्य खऱ्या अर्थाने 'मोहन शक्ती' आहे. प्रेरणेचा आणि श्रद्धेचा दिवा!
आज जेव्हा समाज अधिकाधिक भौतिकतेकडे धावत आहे, तेव्हा मा.नंदू हिरालाल चौधरी यांच्या सारख्या व्यक्ती माणुसकीचे आणि निसर्गप्रेमाचे पाईक बनून समाजात आशेचे दीप लावतात. गोसेवा ही केवळ सेवा नाही, ती एक भावना आहे, एक संस्कृती आहे आणि नंदूभाऊ ही संस्कृती जगणारे झळाळते उदाहरण आहेत.
त्यांचा हा जीवनप्रवास आपल्याला हे शिकवतो की, "जिथे श्रद्धा तिथे सेवा, आणि जिथे सेवा तिथेच खरे समाधान."
|| नंदू हिरालाल चौधरी यांना कोटी कोटी प्रणाम ||
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा