गीताईंचं संघर्षमय जीवन: एक कष्टातून उभारलेलं साम्राज्य


*गीताईंचं संघर्षमय जीवन: एक कष्टातून उभारलेलं साम्राज्य

धरणगावच्या एका सर्वसामान्य कुटुंबात गीताबाई मांगो महाजन यांचं आगमन झालं. घरात १८ विश्व दारिद्र होतं, परंतु गीताईंच्या पायगुणांनी जणू त्या घरात एक नवीन उत्साह आला. आपल्या पतीसोबत खांद्याला खांदा लावून संसार सुरू केला आणि त्यांचं साधं, पण समृद्ध प्रेमाचं जीवन पुढं सरकू लागलं. संसारात पाच मुलं आणि सहा मुली जन्माला आली. आनंदानं भरलेलं त्यांचं घर अचानक दुःखात बुडालं, जेव्हा त्यांच्या पतींचं निधन झालं.

गीताईंसमोर आता संसाराची जबाबदारी आणि ११ मुलांच्या पालनपोषणाचं मोठं आव्हान होतं. कुटुंबातील सासू-सासऱ्यांची देखील काळजी घ्यावी लागणार होती. पण या खडतर परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही. एका गरीब स्त्रीचं मोठं धैर्य त्या काळात दिसलं. त्यांनी आपल्या कष्टाच्या बळावर आंब्याचा व्यवसाय सुरू केला. खेडोपाडी पायी प्रवास करत त्या आंबे विकू लागल्या. साळवा ते धरणगाव असा पायी प्रवास करत, आंबे घेऊन जात आणि तिकडून भाजीपाला आणून विक्री करत. एक सामान्य पण अत्यंत कष्टकरी स्त्री असलेल्या गीताईंची ही संघर्षकथा सर्वांना प्रेरणादायी ठरली.

त्यांच्या प्रामाणिकपणानं, कठोर परिश्रमांनी आणि न थकता केलेल्या कष्टांनी त्यांनी आपल्या मुलांना घडवलं. लहानपणापासूनच त्यांच्यावर प्रामाणिकपणाचे आणि मेहनतीचे संस्कार रुजवले. त्यांच्या मुलांनी आपल्या आईच्या संघर्षाचं सार्थक केलं. त्यांचा मोठा मुलगा शिवदास महाजन, दुसरा मुलगा देवा महाजन हे शेती करतात, आणि तिसरा मुलगा रावा महाजन, हे धरणगाव नगरपालिकेत कर्मचारी झाले. चौथा मुलगा देविदास महाजन धरणगाव शहराचे उपनगराध्यक्ष होते, तर पाचवा मुलगा गुलाब महाजन शेती करून आपलं कुटुंब सावरू लागला.

गीताईंच्या काबाडकष्टांनी उभारलेलं हे कुटुंब आता एक मोठं वृक्ष झालं आहे. ५० हून अधिक सदस्य असलेल्या या कुटुंबात आज गुण्यागोविंदाने सर्वजण एकत्र राहतात. त्यांचं घर आज एक आदर्श कुटुंब म्हणून ओळखलं जातं, जिथं प्रत्येक व्यक्तीच्या मनात गीताईंचं निःस्वार्थ प्रेम आणि त्यांच्या कष्टाचं मूल्य आहे.

स्वर्गीय गीताई वयाच्या ८५व्या वर्षी ह्या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचं मोठं आभाळ आलं, पण त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी त्यांच्या शिकवणींना आणि संस्कारांना धरून ठेवलं आहे. आज गीताईंची कथा प्रत्येकासाठी एक प्रेरणा आहे. एका सामान्य स्त्रीने, अडचणींना सामोरं जाऊन, आपल्या कुटुंबासाठी दिलेला संघर्ष आणि त्यातून मिळवलेला यशाचा मार्ग हा खऱ्या जीवनाचा आदर्श आहे.

त्यांच्या कष्टाचं हे साम्राज्य त्यांच्या मुलांनी आणि नातवंडांनी आजही जीवंत ठेवलं आहे, आणि गीताईंच्या आठवणी त्यांच्या जीवनाचं मार्गदर्शन करत राहतील.

© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !