प्रा. वा. ना. आंधळे – साहित्य, शिक्षण आणि समाजसेवेचे प्रेरणास्त्रोत
प्रा. वा. ना. आंधळे – साहित्य, शिक्षण आणि समाजसेवेचे प्रेरणास्त्रोत
काव्य, साहित्य आणि समाजसेवा या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून आपले वेगळे स्थान निर्माण करणारे प्रा. वा. ना. आंधळे हे एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहे. ७ मार्च १९८६ पासून धरणगावातील कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्यापन कार्य करणाऱ्या प्रा. आंधळे यांनी ३५ वर्षांच्या साहित्यिक प्रवासात मराठी साहित्य व काव्यजगतावर अमिट छाप सोडली आहे.
ते केवळ एक शिक्षकच नाहीत, तर साहित्यिक, संपादक,मातृहृदयी कवी आणि समाजाप्रति निस्सिम श्रद्धा भाव असलेले लोकशिक्षक म्हणूनही ते ओळखले जातात. त्यांच्या कार्याची महत्त्वपूर्णता त्यांच्या अनुभवसंपन्न जीवनात आणि काव्यलेखनाच्या प्रगल्भतेत दिसून येते. मराठी साहित्य क्षेत्रात त्यांनी केलेले योगदान खरोखरच स्तुत्य आहे.
शैक्षणिक व साहित्यिक कार्य
प्रा. आंधळे यांनी महाविद्यालयात १५ वर्षे मराठी विभाग प्रमुख आणि ७ वर्षे उपप्राचार्यपदी कार्यरत राहून आपल्या नेतृत्वकौशल्याचे प्रदर्शन केले आहे. सध्या ते मराठी विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक या पदांवर कार्यरत राहून सेवानिवृत्त झालेले आहेत. विद्यार्थ्यांसाठी ते एक आदर्श शिक्षक ठरले आहेत. त्यांनी केवळ शिक्षक म्हणून कार्य केले नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये साहित्यप्रेम आणि सामाजिक जाणिवा जागृत केल्या आहेत. त्यांचे काही विद्यार्थी साहित्य क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करीत आहेत.या घटनेने प्रा.आंधळे ठायीठायी कृतकृत्य होतांना दिसून येतात.त्यांच्या स्वतःचा काव्यलेखनाचा प्रवास अनुष्टुभ, किर्लोस्कर,अक्षर वैदर्भी,अस्मितांदर्श, मनोहर, लोकप्रभा,शब्दालय,उगवाई,किशोर या वाङ्मयीन नियतकालिकांसह जवळपास पाचशे अन्य नियतकालिकांतून पसरला आहे, ज्यातून त्यांनी आपल्या प्रतिभेची अमीट छाप सोडली आहे.
त्यांनी अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषवले असून, महाराष्ट्रभर त्यांनी व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या भाषणांमध्ये साहित्य, समाज आणि संस्कृती यांच्यावरील त्यांचे विचार नेहमीच प्रगल्भ आणि विचारप्रवर्तक "आई मला जन्म घेऊ दे...!" ही स्त्री भ्रूणहत्या या सामाजिक मुद्द्यावर अत्यंत परिणामकारक ठरली आहे. या कवितेने संपूर्ण राज्यातच नव्हे, तर देश-विदेशातही आपल्या प्रभावी संदेशाने जागरूकता निर्माण केली आहे. या कवितेच्या माध्यमातून स्त्री भ्रूणहत्या या गंभीर समस्येवर त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत आणि समाजात एक सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे.या कवितेचे इंग्रजी भाषेसह पंचेचाळीस भारतीय भाषेमध्ये अनुवाद झाले आहेत.एका कवितेचे इतक्या भाषेत अनुवाद होणे ही त्या कवितेची आणि त्यातील भावभावनांची उंची म्हणावी लागेल. एवढा मोठा जनाधार लाभलेल्या या कवितेनं चळवळीचे सामर्थ्य अंगिकारले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
साहित्यिक योगदान
प्रा. आंधळे यांनी काव्यप्रांती आपली स्वतःची स्वतंत्र वाट आणि ओळख निर्माण केलीय. त्यांचे फर्मान ,फर्मान आणि इतर कविता,निवडक फर्मान इंग्रजी भाषेतील अनुवादित फर्मान,गुलमोहर,स्पंदन इ काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांची कविता महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंडळ पुणे यांनी बालभारती इयत्ता तिसरी व युवकभारती इयत्ता अकरावी च्या अभ्यासक्रमात प्रा.आंधळे यांच्या सृजनाला दिलेले मानाचे पान खान्देशवासीयांच्या अभिमानाची घटना म्हटली पाहिजे.इतकेच नाही तर गुजरात राज्य शालेय शिक्षण मंडळ अहमदाबाद यांनी इयत्ता चौथी व इयत्ता सहावी च्या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितेला मिळालेले स्थान त्यांच्या लेखन सामर्थ्याचे प्रमाण मानले पाहिजे.शालेय अभ्यासक्रमाच्या पुढचे पाऊल विद्यापीठीय अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांची झालेली दमदार वाटचाल त्यात क.बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ,व कर्नाटक राज्यातील गुलबर्गा विद्यापीठ यातील पदवी ते पदव्युत्तर अभ्यासक्रमात त्यांच्या कविता विद्यार्थी अभ्यासत आहेत.
त्यांनी लिहिलेल्या किती तरी गझल आणि गाणी विद्यार्थ्यांच्या तोंडी आजही आहेत.
सन्मान आणि पुरस्कार
प्रा. आंधळे यांना अनेक साहित्यिक सामाजिक संस्थांनी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांच्या सृजनशीलतेला मिळालेल्या मान्यतेने त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान अधिकच उजळून निघाले आहे. त्यांनी आजवर तीन राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेय.
आकाशवाणी, दूरदर्शन आणि चित्रपटसृष्टीतील कार्य
प्रा. आंधळे यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील कार्यक्रमांमध्ये गीतलेखन केले आहे. त्यांच्या शब्दांना संगीताची साथ लाभल्याने ते प्रेक्षकांपर्यंत जास्त प्रभावीपणे पोहचले आहेत.
त्यांच्या कार्याचा प्रभाव
प्रा. आंधळे यांचे साहित्य आणि समाजकार्य हे आजच्या पिढीला एक प्रेरणा देणारे आहे. त्यांनी आपल्या सृजनशीलतेतून समाजातील अनेक समस्यांवर भाष्य केले आहे, ज्यामुळे त्यांचा साहित्यिक ठसा अजरामर झाला आहे. एक शिक्षक म्हणून त्यांचे कार्य विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मोलाचे ठरले आहे. त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या कवितांनी आणि गझलांनी मराठी साहित्याचा वारसा अधिक समृद्ध केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतभर त्यांनी केलेल्या कार्यामुळे ते साहित्य, समाजसेवा आणि शिक्षण या तिन्ही क्षेत्रांत एक आदर्श ठरले आहेत. त्यांच्या जीवनाची कहाणी ही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या कार्याची दखल साहित्यप्रेमी व समाजाने घेतल्याने त्यांचा गौरव केला जातो.
प्रा. वा. ना. आंधळे यांची जीवनयात्रा ही खऱ्या अर्थाने एक प्रेरणादायी अध्याय आहे. त्यांनी समाजसेवा, साहित्य आणि शिक्षणाच्या माध्यमातून केलेल्या कार्यामुळे ते सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या लेखणीतून साकारलेले शब्द समाजाला दिशा दाखवण्याचे कार्य करत राहतील.
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा