"धैर्य, प्रेम आणि निःस्वार्थ सेवा – राहुल सुकलाल पाटील यांच्या कर्तृत्वाची गाथा"
"धैर्य, प्रेम आणि निःस्वार्थ सेवा – राहुल सुकलाल पाटील यांच्या कर्तृत्वाची गाथा"
धरणगाव तालुक्यातील साकरे या छोट्याशा गावात एका साधारण कुटुंबात जन्मलेले राहुल सुकलाल पाटील हे नाव धरणगाव आणि परिसरातील लोकांच्या मनात आजही आदराने घेतले जाते. त्यांचे बालपण कठीण परिस्थितीने व्यापलेले होते. वडील लहानपणीच वारल्याने घराची सगळी जबाबदारी त्यांच्या आईवर आली. आईच्या कष्टांचे भान राखून राहुलने लहान वयातच ठरवले की, आपले कुटुंबाला आधार देणारा तोच होणार.
आपल्या शिक्षणाचा खर्च स्वतःच्या कष्टातून उचलणाऱ्या राहुलने सुरुवातीला खाजगी वाहनावर काम करत उपजीविका चालवली. त्यांची मेहनत, प्रामाणिकता आणि लोकसेवेची आवड पाहून त्यांना 108 रुग्णवाहिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ग्रामीण रुग्णालय, धरणगाव येथे रुग्णवाहिका चालक म्हणून त्यांनी काम सुरू केले आणि त्यातूनच त्यांच्या जीवनाचा प्रेरणादायक प्रवास सुरू झाला.
एक दिवस धरणगावहून एरंडोल मार्गे जळगावकडे जात असताना त्यांच्या रुग्णवाहिकेत दोन महिला, एक नवजात बालक आणि त्याचे वडील होते. गाडी चालवताना अचानक राहुलच्या लक्षात आले की, गाडीच्या खाली थोडासा धूर दिसत आहे. प्रसंगावधान राखून त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. गाडीतून उतरून पाहिले असता गाडीखाली आग लागलेली होती. प्रवाशांचा जीव धोक्यात असल्याची जाणीव होताच राहुलने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्वरित सर्वांना बाहेर काढले. नवजात बालकाला स्वतःच्या हातात उचलून सुरक्षित स्थळी नेले.
तिथे थांबून न राहता राहुल पुन्हा गाडीच्या जवळ गेले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्याबाहेर होती. काही वेळातच गाडीचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूच्या लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. पण या स्फोटापूर्वी राहुलने आपल्या धाडसाने सर्वांचे प्राण वाचवले होते.
या घटनेनंतर राहुलची ओळख फक्त रुग्णवाहिकेचा चालक म्हणून राहिली नाही. आपल्या निःस्वार्थ सेवेमुळे ते लोकांसाठी देवदूत ठरले. लोकसेवा हीच खरी सेवा असते, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
राहुल सुकलाल पाटील यांचा हा प्रवास केवळ प्रेरणादायक नाही, तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी लोकांसाठी निःस्वार्थपणे झटणाऱ्या हातांना यश कधीही अडवत नाही, हे शिकवणारा आहे. त्यांच्या धाडसाबद्दल आणि निःस्वार्थ सेवेसाठी समाजाने त्यांचे ऋणी राहावे, हेच योग्य ठरेल.
"रुग्णवाहिकेचा चालक असला तरी राहुल आज सर्वांच्या मनाचा नायक झाला आहे!"
©शब्दांकन:दीपक पवार(संपादक)खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा