आत्मविश्वासाच्या बळावर उभारलेलं स्वप्न : सचिन पाटील यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास
आत्मविश्वासाच्या बळावर उभारलेलं स्वप्न : सचिन पाटील यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास
नगरदेवळा, तालुका भडगाव येथील अतिशय साध्या कुटुंबात जन्मलेले आणि पारोळा येथील 'यश इन्स्टंट ऑनलाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' चे संचालक म्हणून नावारूपाला आलेले श्री. सचिन पाटील यांचा जीवनप्रवास हा खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या वडिलांची जिल्हा परिषदेत पशूवैद्यकीय शिपाई म्हणून नोकरी होती. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने लहानपणापासूनच संघर्षाची सवय झाली. पण जीवनातील आव्हानांमध्येही स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मार्ग काढण्याची जिद्द त्यांनी कधीही कमी होऊ दिली नाही.
शाळेत शिक्षण घेता घेता सचिन पाटील यांनी आर्थिक अडचणींमुळे हॉटेलमध्ये काम केले, छोटे-मोठे कामधंदे केले. कधीच कोणत्याही कामाला कमी लेखले नाही. त्यांना लहानपणापासून काहीतरी नवीन करण्याची आवड होती. "आपण परिस्थितीला दोष देत न बसता, आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवावा," असा त्यांचा ठाम विश्वास होता. याच विश्वासाच्या बळावर त्यांनी शिक्षण पूर्ण करून व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.
सचिन पाटील यांची 'यश इन्स्टंट ऑनलाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' कंपनी आज एक नावाजलेली संस्था आहे. त्यांनी कष्ट, प्रामाणिकपणा, आणि कार्यक्षमता याच्या बळावर व्यवसायात यश संपादन केले आहे. त्यांच्या या प्रवासात एक महत्वाची साथ लाभली ती म्हणजे त्यांच्या अर्धांगिनी, मोहिनी पाटील यांची. त्यांच्या प्रत्येक पावलावर मोहिनी ताई खंबीरपणे उभ्या राहिल्या. नवऱ्याचा प्रत्येक संघर्ष, कष्ट, अपयश आणि यश त्यांनी आपलं मानलं. संसारातील प्रत्येक कठीण क्षणात त्यांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली.
सचिन पाटील यांना महाराष्ट्र उद्योजक अवॉर्ड 2022 मिळाल्याची घटना ही त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा होता. मुंबईतील या सन्मानाने त्यांच्या कष्टाचे चीज झाले. मात्र, सचिन पाटील यांचा हा गौरव फक्त त्यांच्या कष्टांचा नसून त्यांच्या अर्धांगिनीच्या पाठिंब्याचाही आहे. मोहिनी ताईंनी आपला संसार आणि सचिन यांचा व्यवसाय दोन्ही सांभाळताना जी मेहनत घेतली, त्याचं हे फळ आहे.
आजचे त्यांचे सोन्याचे दिवस हे त्यांची मेहनत, जिद्द आणि मोहिनी ताईंच्या अखंड पाठिंब्याचे फळ आहे. परिस्थिती कितीही हलाखीची असो, स्वप्न पाहणे आणि त्याच्या पूर्ततेसाठी अपार मेहनत करणे याचाच प्रत्यय त्यांच्या जीवनप्रवासात आपल्याला दिसून येतो.
या प्रवासात जे शिकायला मिळतं ते म्हणजे संघर्षाच्या काळातही आत्मविश्वास न सोडता, पती-पत्नीच्या एकतेने आणि मेहनतीने कोणतीही गोष्ट साध्य करता येऊ शकते. जीवनातील चढ-उतारातही एकमेकांची साथ कशी असावी, हे सचिन आणि मोहिनी पाटील यांच्या कुटुंबाकडून शिकण्यासारखे आहे.
आज ते त्यांच्या मेहनतीने आणि पत्नीसह मिळवलेल्या या यशाचा आनंद घेत आहेत. सचिन पाटील यांचा हा यशाचा प्रवास तरुण पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल आणि संघर्षातून यशाकडे जाण्याचा मार्ग दाखवेल.
© शब्दांकन:दीपक पवार(संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा