आदर्श डॉक्टर: स्व. डॉ. कपूरचंदजी गंगाबिसनजी बिर्ला
आदर्श डॉक्टर: स्व. डॉ. कपूरचंदजी गंगाबिसनजी बिर्ला
स्व. डॉ. कपूरचंदजी गंगाबिसनजी बिर्ला हे नाव उच्चारले की डोळ्यांसमोर येते एक साधी राहणीमान असलेली, पण माणुसकीने परिपूर्ण, समर्पणभावनेने झगडणारी व्यक्ती. 13 मार्च 1943 रोजी जन्मलेले हे महान व्यक्तिमत्त्व 30 नोव्हेंबर 2023 रोजी आपल्यातून निघून गेले, पण त्यांच्या कार्याचा सुवास अजूनही कायम आहे.
डॉ. बिर्ला यांनी 1966 साली शिरपूर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून आपली सेवा सुरू केली. त्यानंतर तीन वर्षे धुळे मध्यवर्ती कारागृहातील दवाखान्यात काम केले आणि पुढे यावल येथे सात वर्षे सेवा दिली. मात्र, त्यांचे खरे योगदान एरंडोलमधील 14 वर्षांच्या सेवेतून लोकांच्या हृदयात कोरले गेले. स्व. मुकुंदसिंगजी परदेशी यांच्या साथीने एरंडोलमध्ये ग्रामीण रुग्णालय उभारण्यामध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
सरकारी दवाखान्यात काम करताना त्यांनी रोज 200 ते 250 रुग्णांवर उपचार केले. जात, धर्म, आर्थिक स्थिती यांचा कधीही विचार न करता त्यांनी प्रत्येक रुग्णाला आपल्या परीने मदत केली. "जो दे त्याचं भलं, जो न दे त्याचंही भलं" या तत्त्वानुसार त्यांनी आपले जीवन जगले.
हलाखीच्या परिस्थितीतून पुढे येऊनही त्यांनी कधीही पैशासाठी कोणत्याही रुग्णाला अडवले नाही. कमी खर्चात चांगले उपचार मिळावेत, यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले. रुग्णसेवा हा त्यांचा एकमेव ध्यास होता.
डॉ. बिर्ला यांनी एकूण 33 वर्षे सरकारी नोकरी केली. निवृत्तीनंतरही वयाच्या 77 वर्षांपर्यंत रुग्णसेवा सुरू ठेवली. कोरोना काळात वयोमानामुळे त्यांनी सेवा थांबवली, परंतु त्यांचा मृदू स्वभाव, विनम्रता, आणि प्रत्येकाशी असलेले मैत्रीपूर्ण नाते हे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक उजळवत राहिले.
"आहार, विहार आणि विचार चांगले ठेवा, म्हणजे तुमचे आरोग्य चांगले राहील," हा त्यांचा उपदेश अनेकांसाठी जीवनसूत्र ठरला. डॉक्टर म्हणूनच नव्हे, तर एक आदर्श मार्गदर्शक आणि निष्कलंक व्यक्ती म्हणून त्यांनी समाजात आपली ओळख निर्माण केली.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा सुसंस्कृत परिवार आहे. परंतु, त्यांच्या जाण्याने फक्त कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण समाजाने एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
स्व. डॉ. कपूरचंदजी बिर्ला यांचे जीवन म्हणजे रुग्णसेवेची अखंड गाथा. त्यांचे विचार आणि कर्तृत्व पुढील पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देतील. त्यांच्या स्मृतींना आणि कार्याला शतशः नमन!
© शब्दांकन: दीपक पवार(संपादक)खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा