मागे हटणं म्हणजे हार नव्हे...!
मागे हटणं म्हणजे हार नव्हे...! आपल्याशी चुकीचं वागणाऱ्या व्यक्तीला त्याची जागा दाखवण्याची ताकद आपल्यात असते. शब्दांनी ठाम उत्तर देता येतं, वागणुकीतून प्रत्युत्तर देता येतं, आवश्यक असेल तर स्पष्ट सीमा आखता ही येतात. परंतु प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देणं, प्रत्येक प्रसंगी स्वतःला सिद्ध करणं, प्रत्येक वेळी वादात उतरून आपली बाजू पटवून देणं हेच सामर्थ्याचं लक्षण असतं असं नाही. कधी कधी शांत राहणं हेच सर्वात प्रभावी उत्तर ठरतं. जेव्हा कोणी आपल्याला दुखावतं, कमी लेखतं, गैरसमज करतं किंवा अपमानित करतं, तेव्हा मनात भावनांचं वादळ उठतं. राग, दुःख, असहायता आणि स्वतःला योग्य ठरवण्याची तीव्र इच्छा. “मी चुकीचा नाही” हे ठामपणे सांगावंसं वाटतं. त्या क्षणी प्रत्युत्तर देणं सोपं असतं; पण थांबणं कठीण असतं. जर आपण त्या क्षणी एक खोल श्वास घेतला, स्वतःला सावरलं आणि शांतपणे त्या ठिकाणाहून दूर जाण्याचा निर्णय घेतला.तर तो पराभव नसतो. ती स्वतःवर मिळवलेली जिंक असते. कारण आपण परिस्थितीवर नव्हे, तर स्वतःच्या भावनांवर विजय मिळवलेला असतो. प्रत्येक लढाई लढायलाच हवी असं नसतं. काही लढाया न लढणं हाच खरा विजय असत...