खरंच राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, गावात गुटखा बंद आहे का……!
खरंच राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, गावात गुटखा बंद आहे का……! खिडकीतून बाहेर डोकावले की, रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांच्या ओठांवर एक सवय स्पष्टपणे दिसते. काहींच्या बोटांमध्ये एक छोटी काळी पिशवी असते. त्या पिशवीत नेमकं काय आहे, हे सांगायला कोणी भविष्यवेत्ता लागणार नाही. एखाद्या कोपऱ्यावर पोहोचल्यावर ती पिशवी उघडली जाते आणि तिच्यातील पदार्थ तोंडात टाकला जातो. मग सुरू होतो तो एक विळखा – सवयीचा, व्यसनाचा आणि सर्वात भयानक म्हणजे सामाजिक खोटेपणाचा. "राज्यात गुटखा बंद आहे" – हे वाचलं की प्रथमदर्शनी समाधान वाटतं. पण जेव्हा प्रत्यक्ष गावातून, तालुक्याच्या बसस्थानकातून, जिल्ह्याच्या स्टेशनाजवळून चालत जातो, तेव्हा ह्या खोट्या समाधानाचे खरे रूप दिसते. शाळांच्या कुंपणाशेजारी, गावाच्या चौकात, सार्वजनिक शौचालयांच्या भिंतींवर, स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर जिकडे पाहावे तिकडे लालसर थुंकीचे डाग. ही आपली संस्कृती आहे का? की ही एका बनावटीच्या बंदीची जळजळीत खूण आहे? शासनाच्या जाहिराती सातत्याने दाखवतात "गुटखा आरोग्यास घातक आहे", "गुटख्यामुळे कर्करोग होतो", "राज्यात गु...