खरंच राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, गावात गुटखा बंद आहे का……!

खरंच राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, गावात गुटखा बंद आहे का……!

खिडकीतून बाहेर डोकावले की, रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांच्या ओठांवर एक सवय स्पष्टपणे दिसते. काहींच्या बोटांमध्ये एक छोटी काळी पिशवी असते. त्या पिशवीत नेमकं काय आहे, हे सांगायला कोणी भविष्यवेत्ता लागणार नाही. एखाद्या कोपऱ्यावर पोहोचल्यावर ती पिशवी उघडली जाते आणि तिच्यातील पदार्थ तोंडात टाकला जातो. मग सुरू होतो तो एक विळखा – सवयीचा, व्यसनाचा आणि सर्वात भयानक म्हणजे सामाजिक खोटेपणाचा.

"राज्यात गुटखा बंद आहे" – हे वाचलं की प्रथमदर्शनी समाधान वाटतं. पण जेव्हा प्रत्यक्ष गावातून, तालुक्याच्या बसस्थानकातून, जिल्ह्याच्या स्टेशनाजवळून चालत जातो, तेव्हा ह्या खोट्या समाधानाचे खरे रूप दिसते. शाळांच्या कुंपणाशेजारी, गावाच्या चौकात, सार्वजनिक शौचालयांच्या भिंतींवर, स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर जिकडे पाहावे तिकडे लालसर थुंकीचे डाग. ही आपली संस्कृती आहे का? की ही एका बनावटीच्या बंदीची जळजळीत खूण आहे?

शासनाच्या जाहिराती सातत्याने दाखवतात "गुटखा आरोग्यास घातक आहे", "गुटख्यामुळे कर्करोग होतो", "राज्यात गुटखा बंद आहे". पण त्या जाहिराती संपतात आणि त्याच वेळी तालुक्याच्या एखाद्या कोपऱ्यात, गावातील पानटपरीवर, एखादा दुकानदार काळी पिशवी पुढे करतो "हवे का, भाऊ?"

या प्रश्नाचं उत्तर त्या माणसाकडे नसतं, त्याच्या मागे उभ्या असलेल्या अनेक व्यथा, वंचना, आर्थिक अडचणी, आणि जीवनात निर्माण झालेली नशेच्या आडोशाची गरज यांमध्ये लपलेलं असतं. गुटखा विकणाऱ्याला उदरनिर्वाहासाठी पर्याय लागत नाही, आणि गुटखा खाणाऱ्याला विसरण्यासाठी ही एक सोपी वाट वाटते. पण या वाटेवर चालताना एक संपूर्ण पिढी हरवत जाते.

"बंदी आहे", असं सांगणारे कागदावरचे नियम आहेत. पण त्या नियमांची अंमलबजावणी गावपातळीवर, तालुक्याच्या पोलीस चौक्यांमध्ये, जिल्ह्याच्या आरोग्य खात्यांमध्ये होते का?

गावांमधील शाळांच्या मागे, आजही लहान मुलांच्या खिशात गुटख्याच्या पुड्या सापडतात. कधी त्यांच्या घरची गरीबी, कधी पोटात अन्न नसलेलं वास्तव, तर कधी घरच्यांचे व्यसन यामुळे तेही हळूहळू या साखळीत अडकतात. "गुटखा खाऊ नका" हे वर्गाच्या फळ्यावर लिहिलेलं वाक्य, समोरच गुटखा विकणाऱ्या चहा टपरीवर उपहासाने हसताना दिसतं.

आई एकदा म्हणाली होती "बाळा, गुटखा माणसाला आतून खाऊन टाकतो."तेव्हा वाटलं होतं, ती आरोग्याबद्दल बोलतेय.आज समजतं ती व्यवस्था, समाज आणि माणसाच्या मनोबलाबद्दल बोलत होती.

गुटखा फक्त शरीराला नाही, तर संपूर्ण समाजाच्या आरोग्याला पोखरून टाकतो. तो शहरी झोपड्यांतून ते गावांतील चावड्यांपर्यंत पोहोचतो. एक पिढी नष्ट होते आणि दुसरी त्याच मार्गावर चालू लागते.

राज्य सरकार बंदी घालते, अधूनमधून छापे पडतात, दुकानदार काही दिवस गप्प बसतात, पण काही दिवसांनी सगळं पुन्हा पूर्ववत होतं.

एकदा माझ्या मित्राने विचारले, “खरंच गुटखा बंद आहे का?”मी केवळ हसलो… कारण माझ्याकडे उत्तर नव्हतं.
उत्तर होतं.गावाच्या चावडीवरच्या लालसर भिंतींमध्ये, जिल्हा रुग्णालयाच्या कर्करोग विभागात रांगेत उभ्या असलेल्या रुग्णांमध्ये, तालुक्याच्या बसस्टॅंडवर ठसका घेत थुंकणाऱ्या तरुणाच्या कपड्यांवर.

कधी कधी मनात विचार येतो. ही बंदी केवळ राजकीय घोषणा न राहता, ती एक जनचळवळ बनली पाहिजे. आई मुलाला समजावेल, शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासच नाही तर सुसंस्कार देईल, पोलीस फक्त दंडच नाही तर खरी कारवाई करतील.

एक दिवस एक लहान मुलगा आईच्या कुशीत रडत होता. कारण त्याच्या वडिलांना कर्करोग झाला होता. डॉक्टर म्हणाले,"गुटख्यामुळे झालंय." आणि त्या निरागस मुलाने विचारले "जर बंदी आहे, तर बाबांना तो मिळाला कसा?"

त्या मुलाच्या डोळ्यातूनच अख्ख्या समाजाचे बुरखे गळून पडले होते. आपण सगळेच या बनवटीच्या बंदीचे साक्षीदार आहोत. कुणी दुर्लक्ष करतो, कुणी विकतो, कुणी घेतो.सगळे मिळून हे खोटं जग उभारतो. जिथे बंदी असते, पण व्यसन वाढतं.

पण अजूनही वेळ गेलेली नाही. आपण स्वतःपासून सुरुवात करू शकतो. “मी आजपासून गुटखा सोडणार आहे”  हा निर्णय घेतला, तर समाज बदलायला वेळ लागणार नाही.

एक निश्चय, एक मनोबल, आणि एक सामूहिक बदल  एवढंच हवं आहे.आपल्या मुलाच्या ओठांवर गुटख्याचा लालसर डाग नको, हसू असावं.त्याच्या पायात चपला नसल्या तरी चालेल, पण तोंडात व्यसन नको.

गुटखा बंद आहे का? कायद्याच्या कागदावर… हो.
पण गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, आणि अख्ख्या राज्यात… अजूनही नाही.

पण जर प्रत्येकाच्या मनात ती बंदी सुरू झाली, तर एक दिवस हा प्रश्न विचारायलाच नको लागेल.
कारण तेव्हा उत्तर आपोआपच दिसेल.
एक नशामुक्त, आरोग्यसंपन्न, सशक्त महाराष्ट्र म्हणून.


© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !