"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"
"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी
यांची प्रेरणादायी वाटचाल"
शेतीची माती, घामाने ओले झालेलं कपाळ आणि डोळ्यांत लपलेलं शिक्षणाचं स्वप्न ही प्रा. डॉ. अनंत लालचंद चौधरी यांची खरी ओळख. चोपडा येथील एका साध्या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेले डॉ. अनंत सर आज शिक्षणाच्या क्षेत्रात एक तेजस्वी दीपस्तंभ ठरले आहेत.
घरात आर्थिक सुबत्तेपेक्षा मेहनत, शिस्त आणि मूल्यांचा वारसा मोठा होता. वडील शेतीमध्ये राबत आणि आई घरकामासह शेतीची जबाबदारी ही निभावत असे. अशा वातावरणात शिक्षणाला फारसा वाव नव्हता, पण डॉ. अनंत सरांनी लहानपणातच ठरवलं होतं."आपलं आयुष्य बदलायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही."
आई-वडिलांच्या कामात मदत करत करतच त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. अभ्यास, कष्ट आणि चिकाटी या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवत त्यांनी जीवनाचा प्रवास सुरू केला. त्यांना लहानपणापासूनच शिक्षक होण्याची प्रबळ इच्छा होती. पुस्तकांची ओढ, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि समाजासाठी काही तरी करण्याची प्रेरणा हे सारे गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अगदी कोवळ्या वयातच रुजले होते.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना चोपडा येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ. सुरेश जी. पाटील यांनी संधी दिली. ही तीच संस्था होती, जिथे ते स्वतः एक काळी विद्यार्थी होते. हीच गोष्ट त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय वळण ठरली. ज्या व्यासपीठा समोर बसून त्यांनी ज्ञान मिळवलं होतं, त्याच व्यासपीठावर उभं राहून आता ते ज्ञान देत होते.
विद्यार्थ्यांमध्ये ते विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात. त्यांनी केवळ विषय शिकवले नाहीत, तर जीवनाचं वास्तव शिकवलं. विचार करायला शिकवलं, प्रश्न विचारण्याची हिंमत दिली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणूस बनायला शिकवलं.
शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे. नोकरीत असतानाच विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांच्या सहकार्याने फॅकल्टी इम्प्रूमेंट प्रोग्राम या अंतर्गत त्यांनी एम फिल व नंतर पीएचडी डिग्री प्राप्त केली.त्यांनी पन्नासहून अधिक पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत. विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि चिंतनशील पन्नास शोधनिबंध त्यांनी नामांकित नियतकालिकांत प्रसिद्ध केले आहेत. तसेच त्यांनी सिंगापूर व जापान येथील विद्यापीठात संशोधन पर निबंध सादर केले.त्यांची लेखणी आज ही अनेक विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रेरणा देणारी आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत, त्यांना महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा चे अध्यक्ष आदरणीय भैय्यासाहेब अँड. संदीप सुरेश पाटील व सचिव आदरणीय डॉ. स्मिता संदीप पाटील यांनी विविध पदोन्नती देऊन विविध पदावर काम करण्याची संधी दिली. विभागप्रमुख, उपप्राचार्य, प्राध्यापक आणि प्र. प्राचार्य तसेच संस्थेच्या विविध समित्यांमध्ये समावेश करून अनेक जबाबदारीची पदं त्यांनी यशस्वीपणे भूषवली. नॅक तर्फे होणाऱ्या महाविद्यालयाच्या मूल्यांकनात विशेष सहभाग घेऊन महाविद्यालयास उत्तम ग्रेड मिळवण्यात मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी एम फिल व पीएचडी प्राप्त केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, फॅकल्टी ऑफ सायन्स चे सदस्य तसेच अकॅडमी कौन्सिलचे सदस्य म्हणून आपले योगदान दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत विद्यापीठाने त्यांना 2005 मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार, रोटरी क्लब तर्फे नॅशनल बिल्डर अवार्ड, तेली समाज चोपडा तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार इ.पुरस्काराने सन्मानित केले. मात्र इतक्या उंच पदांवर पोहोचून ही त्यांचं मन मात्र तितकंच विनम्र, साधं आणि सच्चं राहिलं.
त्यांचं वैयक्तिक आयुष्य ही तितकंच प्रेरणादायी आहे. त्यांच्या मार्गावर चालत त्यांचे दोघी मुली आणि एकुलता एक मुलगा तिघे ही यशस्वी अभियंते झाले आहेत. शिक्षण, कष्ट आणि मूल्यांची परंपरा त्यांनी आपल्या कुटुंबात ही रुजवली आहे.
आज प्रा. डॉ.अनंत चौधरी सर औपचारिकदृष्ट्या निवृत्त झाले आहेत. मात्र ‘शिक्षक’ ही ओळख त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी इतकी घट्ट जोडलेली आहे की, निवृत्ती ही फक्त सरकारी नियमांची औपचारिकता वाटते. आज ही कित्येक विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनासाठी येतात आणि सर ही पूर्वीप्रमाणेच प्रेमाने, मनापासून त्यांना दिशा दाखवतात.
त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहिलं, तर सहज लक्षात येतं शिक्षण देणं ही नोकरी नसून एक साधना आहे. अनंत सरांनी ती साधना संपूर्ण आयुष्यभर प्रामाणिकपणे केली. त्यांच्या शब्दांनी कित्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली, आणि त्यांच्या वागणुकीनं ‘माणूस’ म्हणून जगायला शिकवलं.
त्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे एक दीपस्तंभ आहे. जो स्वतः जळत राहिला, पण इतरांच्या वाटा उजळवत ते राहिला.
अनंत सरांसारख्या शिक्षकांचं कार्य शब्दांत मावणारं नाही . ते अनुभवावं लागतं. अशा शिक्षकाला मन:पूर्वक अभिवादन आणि कार्यास शतश: प्रणाम.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा