आदेशांच्या सावलीत हरवलेला गुरु......!
आदेशांच्या सावलीत हरवलेला गुरु......! एक काळ असा होता की शिक्षक वर्गात प्रवेश करताच विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आदर, विश्वास आणि जिज्ञासा आपोआप दाटून यायची. शिक्षकांचे शब्द अंतिम सत्य मानले जात, त्यांचा सल्ला जीवनाला दिशा देणारा असे, आणि त्यांचे अस्तित्व समाजासाठी दीपस्तंभासारखे भासे. परंतु आज ही प्रतिमा पूर्णपणे बदललेली दिसते. आज शिक्षक वर्गात प्रवेश करतो तेव्हा त्याच्या हातात केवळ पाठ्यपुस्तक नसते, तर मनात आदेशांची भीती, नियमांचे ओझे आणि असहाय्यतेची खोल जाणीव असते. तो आज शिक्षण देण्यासाठी नव्हे, तर स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठी शिकवत आहे, असेच भासते. आजचा शिक्षक व्यवस्थेच्या कडक बंधनांत अडकलेला आहे. प्रत्येक कृतीवर नियमांची छाया, प्रत्येक शब्दावर संशय, आणि प्रत्येक निर्णयामागे संभाव्य कारवाईची भीती असते. जे अध्यापन कधी साधना मानले जात होते, ते आज जोखमीचे कार्य बनले आहे.चूक करण्याची मुभा नाही, स्वतंत्र मत मांडण्याचे स्वातंत्र्य नाही, आणि परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा अधिकारही हिरावून घेतला जात आहे. “हे बोलणे नियमबाह्य ठरेल का?” हा प्रश्न शिक्षकाच्या मनात सतत घोळत असतो. या ...