स्वार्थाची सोय आणि माणूसपणाची किंमत....!

स्वार्थाची सोय आणि माणूसपणाची किंमत....!

हरामखोरपणा म्हणजे एखादी चूक नव्हे, तर माणूस म्हणून स्वतःला कमी करत जाण्याची एक धोकादायक वृत्ती आहे. स्वतःच्या सोयीसाठी माणूसपण गहाण टाकण्याचं धाडस जेव्हा मनात जन्म घेतं, तेव्हा हळूहळू संवेदना बोथट होतात. मेहनत उपहासाची गोष्ट वाटू लागते आणि फसवणूक हुशारीचं लक्षण भासू लागते. इथेच माणूस स्वतःशीच प्रामाणिक राहणं थांबवतो.

दुसऱ्याच्या कष्टांकडे लालसेनं पाहणं आणि स्वतःच्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढणं.यातूनच हरामखोरपणाचं मूळ तयार होतं. असा माणूस वेळेचं, शब्दाचं, कामाचं महत्त्व विसरतो. काम वेळेवर न करता तो फळ आधीच मागतो. नियम पाळणं त्याला जाचक वाटतं, पण अधिकार मात्र त्याला हवेत. शिस्त नको असते, पण सन्मान हवा असतो. आणि जेव्हा नियम मोडल्याची किंमत चुकवायची वेळ येते, तेव्हा स्वतःकडे पाहण्याऐवजी तो संपूर्ण व्यवस्थेलाच दोष देतो.

या वृत्तीचा सर्वात मोठा फटका समाजाला बसतो. विश्वास हळूहळू मरतो आणि संशयाचं राज्य सुरू होतं. मेहनती, प्रामाणिक माणसं मागे पडतात, तर बेमालूम फसवणारे पुढे जातात. प्रामाणिकपणाची किंमत शून्य होते आणि “असं नसलं तर जगणंच कठीण आहे” ही समजूत खोलवर रुजते. पण खरं तर, समाज अशाच वेळी आतून तुटू लागतो.

काम न करता मिळालेलं यश वरून भव्य दिसतं, पण ते मुळातच कमजोर असतं. ते क्षणिक असतं.जसं वाळूवर उभारलेलं घर. त्याचा घात मात्र दीर्घकाळ टिकतो. हरामखोरपणा माणसाला आतून पोकळ करतो; त्याचा आत्मसन्मान, स्वाभिमान आणि स्वतःवरचा विश्वास संपवतो. मेहनत टाळणं जेव्हा सवय बनतं, तेव्हा स्वतःच्या आरशात पाहण्याचं धैर्यही उरत नाही.

समाज बदलायचा असेल, तर बदलाची सुरुवात स्वतःपासून करावी लागते. मोठ्या घोषणा, मोठे विचार उपयोगी पडत नाहीत, जर रोजच्या आयुष्यात प्रामाणिकपणा नसेल. आज मी माझं काम मनापासून केलं का? आज मी जबाबदारी स्वीकारली का? आज मी सोयीपेक्षा योग्यतेची निवड केली का? या साध्या प्रश्नांची उत्तरं ‘हो’ असतील, तरच खरा बदल घडतो.

कारण मेहनत माणूस घडवते.त्याच्या विचारांना खोली देते, आयुष्याला दिशा देते आणि आत्म्याला बळ देते. आणि हरामखोरपणा माणूस मोडून टाकतो.हळूहळू, शांतपणे, पण पूर्णपणे. निवड आपल्या हातात आहे: घडायचं की मोडायचं. माणूस म्हणून उभं राहायचं की स्वार्थाच्या सावलीत हरवायचं.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !