शांतता जिंकेल....!
शांतता जिंकेल....!
परिस्थिती कशीही असो मनाला ताण देणारी, धैर्याची परीक्षा घेणारी किंवा क्षणाक्षणाला आपल्याला थकवणारी माणसाने सर्वप्रथम स्वतःच्या चेहऱ्यावर शांततेची सावली आणि मनात संयमाचं सामर्थ्य जपून ठेवणं गरजेचं असतं. कारण अंतःकरणातील शांतता हीच ती शक्ती आहे जी बाहेरच्या गोंधळाला ही आपल्यासमोर गुडघे टेकायला भाग पाडते. जग कितीही गोंगाटात बुडालेलं असो, पण आपण जर शांत राहिलो, तर परिस्थितीचं वादळसुद्धा आपल्याला हलवू शकत नाही.
जीवनाच्या प्रवासात प्रत्येकाला कधी ना कधी कठोर प्रसंगांचा सामना करावा लागतो. काही वेळा वेदना मनाला चिरत जातात, तर काही वेळा अपेक्षाभंग मनाची ताकदच हिसकावून घेतो. अशा वेळी आपण आतून ढासळू लागतो आणि परिस्थितीवर दोषारोप करतो. पण हे विसरतो की वादळ कितीही तीव्र असलं तरी ढगांमागे सूर्य तसाच तेजाने उजळत असतो. फक्त त्याचं दर्शन होण्यासाठी आपण स्थिर राहण्याची गरज असते. संयम हा तो पूल आहे जो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे, संघर्षातून समाधानाकडे घेऊन जातो.
शांतता म्हणजे दुर्बलता नाही; शांतता म्हणजे मनाची परिपक्वता. जेव्हा माणूस भावनांनी वाहून न जाता, विचारांनी उभा राहतो, तेव्हा जग त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागते. तुमची शांत नजर आणि संयमी वागणं परिस्थितीला एक अनोखा संदेश देतं की तुम्ही तिला हार मानणार नाही. आणि ज्या क्षणी परिस्थितीला तुमचं सामर्थ्य जाणवतं, त्या क्षणापासून तिचं रूप बदलायला सुरुवात होते. ती तुमच्यापुढे नतमस्तक होते, तुमच्या इच्छेनुसार चालते, आणि शेवटी तुमच्या पावलांशी जुळून जाते.
आपण अनेकदा विचार करतो की समस्या मोठ्या आहेत, मार्ग कठीण आहे, आणि स्वतःच लहान आहोत. पण खरं तर आपला धीर किती मोठा आहे, हे आपणच विसरतो. शांत चेहरा हा विश्वासाचा आरसा असतो, आणि संयमी मन हे यशाचं बीज. जेथे धावपळ, अधीरता आणि राग हार मानतात, तेथे शांतता आणि संयम जिंकतात.
म्हणूनच, परिस्थिती कशीही असू द्या.तुमच्या चेहऱ्यावर शांततेचा कोमल स्पर्श आणि अंगात संयमाचा स्थिर आधार ठेवत राहा. कारण जेव्हा तुम्ही हलत नाही, तेव्हा परिस्थिती हलायला लागते. आणि ती तुमच्यापुढे झुकल्या शिवाय राहात नाही. हेच जीवनाचं सुंदर रहस्य आहे: शांतता आणि संयम जपत राहिलात, तर प्रत्येक कठीण प्रसंगही एक दिवस तुमच्या विजयाची कहाणी लिहून जातो.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा