आदेशांच्या सावलीत हरवलेला गुरु......!
आदेशांच्या सावलीत हरवलेला गुरु......!
एक काळ असा होता की शिक्षक वर्गात प्रवेश करताच विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आदर, विश्वास आणि जिज्ञासा आपोआप दाटून यायची. शिक्षकांचे शब्द अंतिम सत्य मानले जात, त्यांचा सल्ला जीवनाला दिशा देणारा असे, आणि त्यांचे अस्तित्व समाजासाठी दीपस्तंभासारखे भासे. परंतु आज ही प्रतिमा पूर्णपणे बदललेली दिसते. आज शिक्षक वर्गात प्रवेश करतो तेव्हा त्याच्या हातात केवळ पाठ्यपुस्तक नसते, तर मनात आदेशांची भीती, नियमांचे ओझे आणि असहाय्यतेची खोल जाणीव असते. तो आज शिक्षण देण्यासाठी नव्हे, तर स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठी शिकवत आहे, असेच भासते.
आजचा शिक्षक व्यवस्थेच्या कडक बंधनांत अडकलेला आहे. प्रत्येक कृतीवर नियमांची छाया, प्रत्येक शब्दावर संशय, आणि प्रत्येक निर्णयामागे संभाव्य कारवाईची भीती असते. जे अध्यापन कधी साधना मानले जात होते, ते आज जोखमीचे कार्य बनले आहे.चूक करण्याची मुभा नाही, स्वतंत्र मत मांडण्याचे स्वातंत्र्य नाही, आणि परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा अधिकारही हिरावून घेतला जात आहे. “हे बोलणे नियमबाह्य ठरेल का?” हा प्रश्न शिक्षकाच्या मनात सतत घोळत असतो. या भीतीमुळे शिक्षणाच्या आत्म्यावरच घाव बसत आहे.
आज शिक्षणापेक्षा आदेशपालनालाच अधिक महत्त्व दिले जात आहे. शिक्षकाचा दिवस विद्यार्थ्यांपेक्षा संगणकासमोर अधिक जातो. विविध पोर्टल्स भरणे, माहिती अपलोड करणे, सर्वेक्षणे, अहवाल, तक्ते आणि आकडे या मध्येच त्याची ऊर्जा खर्ची पडते. वर्गात विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधण्यासाठी उरतो तो वेळेचा एखादाच तुकडा. शिक्षणाचा अनुभव हळूहळू आकड्यांत बदलतो आहे; संवाद नोंदींमध्ये अडकतो आहे, आणि संवेदना सॉफ्टवेअरच्या चौकटीत कैद होत आहेत.
आज शिक्षक केवळ शिक्षक राहिलेला नाही. तो बहुउद्देशीय कर्मचारी बनला आहे.लिपिक, निवडणूक कर्मचारी, जनगणना करणारा, सर्वेक्षक आणि विविध शासनयोजनांचा प्रचारक. शासन आणि समाज दोघेही त्याच्यावर असंख्य जबाबदाऱ्या सोपवतात. मात्र विद्यार्थ्यांचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही, तर दोष मात्र केवळ शिक्षकाचाच ठरवला जातो. व्यवस्थेतील त्रुटी, सामाजिक परिस्थिती आणि पालकांची भूमिका या सर्व बाबींकडे डोळेझाक करून शिक्षकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते.
पूर्वी शिक्षकाला सन्मान मिळत असे; आज त्याच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते. कधी काळी पालक म्हणत, “गुरुजी जे सांगतील ते योग्यच.” आज मात्र “तक्रार करू” ही पहिली प्रतिक्रिया असते. वर्गात मोबाईल कॅमेऱ्यांची भीती, सोशल मीडियावर बदनामीची शक्यता, आणि किरकोळ कारणांवर नोटिसा या सगळ्यांमुळे शिक्षक सतत तणावाखाली वावरत आहे. तो आदराचा विषय न राहता संशयाचा विषय बनला आहे, हीच शिक्षणव्यवस्थेची सर्वात मोठी शोकांतिका आहे.
विचारस्वातंत्र्य हा शिक्षकाचा मूलभूत अधिकार मानला जात होता. आज मात्र तोच अधिकार नकोसा ठरवला जात आहे. शिक्षकाने प्रश्न विचारला तर तो बंडखोर ठरतो, मत मांडले तर वादग्रस्त ठरतो, आणि सत्य सांगितले तर दोषी ठरतो. “जे लिहिले आहे तेच बोला, जे सांगितले आहे तेच करा,” असे आदेश दिले जातात. विचार करण्याचा आणि विवेक वापरण्याचा अधिकारच जणू हद्दपार केला जात आहे. विचारहीन शिक्षक घडवून सशक्त पिढी तयार होईल, अशी अपेक्षा कशी बाळगता येईल?
या सर्व परिस्थितीचा सर्वात गंभीर परिणाम शिक्षकाच्या मानसिक आरोग्यावर होतो. अतोनात दबावामुळे तणाव वाढतो, नैराश्य बळावते आणि आत्मविश्वास ढासळतो. तरीही शिक्षकाने वर्गात उभे राहून नेहमी हसतमुख असावे, अशी अपेक्षा केली जाते. शिक्षकाला थकवा व्यक्त करण्याची, वेदना सांगण्याची किंवा कमकुवत भासण्याची मुभा दिली जात नाही. त्याच्या भावनांना, वेदनांना आणि संघर्षांना शब्दच उरत नाहीत.
भयग्रस्त, बंधिस्त आणि अपमानित शिक्षकांच्या हातून निर्जीव शिक्षण निर्माण होते. अशा शिक्षणातून केवळ परीक्षाभिमुख यंत्रमानव घडतात; संस्कार, मूल्ये आणि माणुसकी मागे पडते. शिक्षणाचा आत्मा हरवतो आणि राष्ट्राची भावी पिढी कोरडी बनते.
आज शिक्षक होणे गुन्हा नाही, पण तसे भासवले जात आहे. हे थांबले पाहिजे. शासन आणि समाजाने हे ओळखले पाहिजे की शिक्षकाला जखडून नव्हे, तर विश्वास देऊनच शिक्षण उभे राहते. सन्मान देऊनच राष्ट्र घडते आणि स्वातंत्र्य देऊनच विचारवंत पिढी तयार होते. शिक्षक मजबूत असेल, तरच शिक्षण मजबूत राहील; आणि शिक्षण मजबूत असेल, तरच राष्ट्र उज्ज्वल होईल.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा