आदर देणे हीच खरी ताकद....!



आदर देणे हीच खरी ताकद....!

आजच्या जगात मोठ्याने बोलणं, कठोर शब्द वापरणं आणि समोरच्याला गप्प बसवणं यालाच ताकद समजली जाते. जणू जो जास्त ओरडतो तोच जिंकतो, आणि जो शांत राहतो तो हरतो. पण खरं सांगायचं तर ही ताकद नसते, तो असतो आतला कमकुवतपणा. कारण ज्याच्याकडे स्वतःवर नियंत्रण नसतं, त्यालाच दुसऱ्याला दाबून ठेवावं लागतं.

आदर देणं ही एक अशी कला आहे जी प्रत्येकाला जमत नाही. अपमान करायला शब्द लागतात, पण आदर करायला संस्कार लागतात. समोरचा माणूस कितीही वाईट वागला, चुकीचं बोलला, आपल्याला दुखावलं… तरीही आपली भाषा शांत ठेवणं, वागणूक माणुसकीची ठेवणं, हे खूप मोठं धैर्य असतं. हीच खरी ताकद आहे. स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहण्याची.

आदर देणं म्हणजे नमते घेणं नाही, मान खाली घालणं नाही. उलट, आदर देणं म्हणजे स्वतःची उंची जपणं. जो माणूस स्वतःला मान देतो, स्वतःच्या अस्तित्वाचा सन्मान करतो, तोच इतरांनाही मान देऊ शकतो. ज्याचं मन लहान असतं तो अपमान करतो, आणि ज्याचं मन मोठं असतं तो माफ करतो.

अपमान करून मिळणारी ताकद क्षणिक असते. ती भीतीवर उभी असते. आज लोक घाबरून तुमच्यासोबत उभे राहतील,पण उद्या पहिल्याच संधीला पाठ
फिरवतील.कारण भीती टिकत नाही. पण आदराने मिळणारी उंची कायमची असते. आदरावर उभं असलेलं नातं, विश्वासावर उभं असलेलं नातं, काळाच्या कसोटीवर टिकून राहतं.

जगात सगळ्यात सुंदर गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आदर. जिथे आदर असतो, तिथे शब्द कमी पडतात. तिथे शांतताही बोलकी असते. जितका आदर तुम्ही देता, तितकंच जग तुमच्याकडे आपुलकीनं पाहायला लागतं. लोक तुमचं नाव आदरानं घेतात, तुमची उपस्थिती महत्त्वाची वाटते.

आदर करायला माणूस मोठा असावा लागत नाही, पद, पैसा किंवा प्रतिष्ठा लागते असंही नाही. फक्त मन मोठं असावं लागतं. कारण मोठेपणाचा खरा मापदंड हा तुमच्या वागण्यात असतो, तुमच्या शब्दांत असतो.

शेवटी एकच सांगावंसं वाटतं शांत राहणं हे दुर्बलतेचं लक्षण नाही,आदर देणं हे पराभवाचं चिन्ह नाही,
आणि माणुसकी जपणं हे कधीच तोट्याचं नसतं.
कारण जो माणूस आदर देतो,तोच खऱ्या अर्थानं शक्तिशाली असतो.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !