स्वप्नातलं गाव,वास्तवातली कोंडी.....!

स्वप्नातलं गाव,वास्तवातली कोंडी.....!

गाव लांबून पाहिलं की मन आपोआप शांत होतं. मातीचा सुगंध, ओळखीची माणसं, संथ चाललेलं आयुष्य सगळं काही आपुलकीचं वाटतं. शहराच्या कोलाहलातून थकलेला माणूस गावाकडे आशेने पाहतो. पण जेव्हा तोच माणूस गावातच राहून जगायचं ठरवतो, काही नवीन उभं करायचं धाडस करतो, तेव्हा गावाचं दुसरं, अस्वस्थ करणारे रूप समोर येतं.

गाव ही केवळ भौगोलिक रचना नाही; ती पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आठवणींची, अहंकारांची आणि न मिटलेल्या वादांची एक गुंतागुंतीची व्यवस्था आहे.

गावातले सर्वात खोल जखमा या भावकीतच असतात. जमीन, वाटप, वारसा हे विषय निमित्त ठरतात; पण मूळ असतं मनात साचलेलं वैर. इथे भांडण माणसांमध्ये नसतं, ते पिढ्यांमध्ये असतं. एकदा निर्माण झालेली कटुता समेटाला कमजोरी समजते आणि माफीला अपमान. त्यामुळे न्यायालयं, राजकारण, प्रशासन हे सगळं नात्यांमधील सूडाचं साधन बनतं. यातून जन्माला येणारी विषारी हवा पुढच्या पिढ्यांचं आयुष्य ही दूषित करते.

गावातली वाट ही केवळ रस्ता नसते. ती सत्ता, वर्चस्व आणि प्रतिष्ठेचं प्रतीक असते. दोन फूट जमिनीसाठी वर्षानुवर्षे चालणारे खटले, वाढत जाणारे ताण, आणि कधी कधी हिंसाचार हे सगळं जमिनीसाठी नसतं, तर “वरचढ कोण?” या प्रश्नासाठी असतं. विकास, शिक्षण, प्रगती या गोष्टी अनेकदा या अहंकाराच्या धुरात हरवून जातात.

गावात रस्ता कुठून जावा, योजना कुणासाठी यावी, हे प्रश्न तांत्रिक नसून सामाजिक आणि मानसिक असतात. “आमच्याकडून नाही” ही भूमिका अनेकदा संपूर्ण गावाचं भविष्य थांबवते. कारण सुविधा आल्यावर फक्त सोय वाढत नाही, तर सत्तेची गणितं बदलतात आणि ती बदलायला गाव तयार नसतं.

लोकशाहीचं सुंदर स्वप्न गावपातळीवर अनेकदा व्यक्तिगत युद्धात बदलतं. निवडणुका म्हणजे विचारांची लढाई न राहता, भावकी, जात आणि जुन्या जखमांची लढाई बनते. निकालानंतर गाव दोन भागांत विभागलं जातं.एक सत्तेतला आणि एक उपेक्षित. कामं थांबतात, योजना अडतात, आणि सामाजिक बहिष्काराचं भय पसरतं.

गावात प्रगती करणारा माणूस अनेकदा प्रेरणा ठरत नाही; तो धोका ठरतो. कोणी शिकला, पुढे गेला, समाजासाठी काही केलं.की त्याच्या भोवती संशयाचं वर्तुळ तयार होतं. बदनामी, कुजबुज, आरोप यांचा मारा सुरू होतो. “आपल्यापेक्षा कुणी पुढे जाऊ नये” ही भावना गावाच्याच पायात बेडी घालते. त्यामुळे प्रगतीची भाषा करणारा माणूस हळूहळू एकटा पडतो.

गावातली दहशत नेहमी हातात शस्त्र घेऊन येत नाही. ती अनेकदा गप्प बसण्याच्या दबावातून येते. “बोलू नकोस”, “विरोध करू नकोस”, “तक्रार केलीस तर परिणाम होतील” अशा सूचक इशाऱ्यांतून सामान्य माणूस शांत केला जातो. शहरात मोकळेपणाने मत मांडणारा माणूस गावात मात्र मौन पाळायला शिकतो.

या सगळ्यात सर्वात जास्त पिचलेला घटक म्हणजे महिला. शेती, घर, कुटुंब सगळं ओझं पेलून ही निर्णयांचे अधिकार त्यांच्याकडे नसतात. व्यक्तिस्वातंत्र्य अजून ही अनेक घरांच्या उंबरठ्याबाहेरच थांबतं. शिक्षणामुळे काही मुली बाहेर पडल्या असल्या, तरी त्यांच्या आयांच्या आयुष्याला अजून ही चार भिंतींची कैद आहे.

अपंग, दुर्बल, वेगळे असणारे.यांना गाव अनेकदा माणूस म्हणून नाही, तर लेबल लावून पाहतं. चेष्टा, हेटाळणी, नावं ठेवणं हे सहज स्वीकारले जातात, कारण इथे संवेदनशीलतेपेक्षा टोमणे जास्त जुने आहेत.

गाव वाईट नाही. पण गाव ही एक बंदिस्त व्यवस्था आहे. पेहराव बदलला आहे, मोबाईल आले आहेत, रस्ते झाले आहेत.पण विचार अनेक ठिकाणी अजून ही मध्ययुगीन आहेत. जो पर्यंत विचार बदलत नाहीत, तो पर्यंत गाव बदलणं कठीण आहे.

म्हणूनच अनेक जण गाव सोडतात. रोजगारासाठीच नव्हे, तर माणूस म्हणून श्वास घेता यावा म्हणून. महिलांनी या बदलाची सुरुवात केली आहे.मुलांच्या शिक्षणासाठी, सुरक्षित भविष्याच्या आशेने.आणि म्हणूनच गावाचं सत्य असं आहे.गाव बाहेरून सुंदर दिसतं,पण गावात राहून माणूस राहणं आज ही सोपं नाही…

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !