एक चूक,एक गलती....!
एक चूक,एक गलती....!
फक्त दोन शब्द, पण त्यांच्या सावलीत किती तरी भावना, किती तरी रात्री जागवणारे विचार आणि किती तरी न बोललेल्या कथा दडलेल्या असतात.आयुष्याच्या प्रवासात चूक ही कुणाच्याही दारावर कधीही येऊ शकते; अवचित, अनपेक्षित, आणि थोडीशी अस्वस्थ करणारी. पण तरीही एक गोष्ट कायम लक्षात ठेवावीशी वाटते.एक चूक आयुष्य उध्वस्त करत नाही; तिच्याकडून न शिकणं मात्र माणसाला हळूहळू मागे ओढत नेतं.
चूक जेव्हा घडते, तेव्हा त्या क्षणी ती खूपच लहान वाटते. “एवढंच झालंय”, “याचा काय परिणाम होणार?” असं स्वतःलाच आपण समजावत असतो. पण वेळ हा खूप प्रामाणिक असतो. तो कोणालाही फसवत नाही. काळ पुढे जातो आणि त्या छोट्या चुकीचे पडसाद मनाच्या खोल कप्प्यांमध्ये उमटू लागतात. कधी नात्यांमध्ये अंतर म्हणून, कधी आत्मविश्वासावर पडलेली जखम म्हणून, तर कधी शांत दिसणाऱ्या चेहऱ्यामागे दडलेल्या वेदनेच्या रूपात.
चूक माणसाला तोडत नाही; ती त्याला उघडं पाडते. ती आपल्याला कमकुवत दाखवते असं नाही, तर आपल्याला खरं दाखवते. आपण स्वतःबद्दल ज्या प्रतिमा तयार केल्या असतात.“मी असं कधीच करणार नाही”, “मी मजबूत आहे”, “माझ्याकडून चूक होणार नाही” त्या सगळ्या एका क्षणात गळून पडतात. आणि त्या क्षणी आपली खरी ताकद आणि खरी कमकुवतपणा समोर उभा राहतो. हा क्षण त्रासदायक असतो, पण तोच क्षण परिवर्तनाचा असतो.
काही लोक चूक लपवतात. ती शब्दांखाली, कारणांखाली, परिस्थितीच्या आड लपवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटतं, चूक मान्य केली तर आपली किंमत कमी होईल. पण हे खरं नसतं. कारण लपवलेली चूक आतून कुरतडत राहते. ती मनाला शांत बसू देत नाही. तर काही लोक असतात.जे चूक स्वीकारतात. शांतपणे, प्रामाणिकपणे. “हो, माझ्याकडून चूक झाली.” या एका वाक्यात अफाट ताकद असते. ही ताकद अहंकाराची नसते, तर आत्मजाणिवेची असते.
स्वीकारलेली चूक पुढे जाण्याचा मार्ग दाखवते. कारण स्वीकारणं म्हणजे थांबणं. स्वतःशी दोन शब्द बोलणं. स्वतःला समजून घेणं. चूक मान्य केल्याने माणूस लहान होत नाही; उलट तो मोठा होतो. तो अधिक संवेदनशील होतो, अधिक समजूतदार होतो. जसं एखादं झाड वाऱ्यात थोडं वाकतं, पण त्यामुळेच त्याची मुळं अधिक खोलवर रुजतात, तसंच माणसाचं असतं.
प्रत्येक चूक काहीतरी शिकवून जाते.जर मन ऐकायला तयार असेल तर. काही चुका आपल्याला संयम शिकवतात. काही आपल्याला योग्य माणसं ओळखायला शिकवतात. काही आपल्याला स्वतःच्या मर्यादा दाखवतात, तर काही आपल्याला त्या मर्यादांपलीकडे जायची हिंमत देतात. पण जेव्हा तीच चूक पुन्हा पुन्हा घडते, तेव्हा प्रश्न नशिबाचा राहत नाही; तो सवयीचा होतो. नशीब हा खूप सोयीचा शब्द आहे. पण सत्य हे आहे की आपण बदलायला तयार नसतो, म्हणून चूक परत परत आपल्याकडे येते.
एक गलती माणसाला थांबवू शकते, पण संपवू शकत नाही. आयुष्य कुणासाठीही एका चुकीवर पूर्णविराम लावत नाही. ते फक्त स्वल्पविराम देतं.थोडा थांबा, थोडा विचार. खरी अडचण चूक होण्यात नाही, तर तिथेच अडकून राहण्यात असते. काही लोक स्वतःलाच दोष देत, स्वतःलाच कमी लेखत त्या क्षणात गोठून जातात. पण स्वतःला सतत दोष देणं म्हणजे प्रायश्चित्त नाही; ती एक प्रकारची पळवाट असते पुढे न जाण्याची.
म्हणूनच चूक झाली की डोळे खाली घालू नयेत, तर पुढे उघडे ठेवावेत. कारण पुढे आशा असते. पुढे संधी असते. पुढे आपण स्वतःला नव्याने घडवू शकतो अशी शक्यता असते. मागे फक्त धडा असतो.तो लक्षात ठेवण्यासाठी, पण त्यात अडकून राहण्यासाठी नाही.
हा लेख लिहिताना एकच भावना मनात आहे.चूक करणारा माणूस वाईट नसतो. तो फक्त माणूस असतो. आणि जो माणूस आपल्या चुका समजून घेतो,
स्वीकारतो,आणि त्यातून अधिक चांगला होण्याचा प्रयत्न करतो.तो आदरास पात्र असतो. कारण परिपूर्णतेपेक्षा प्रामाणिकपणा खूप सुंदर असतो. आणि अशा प्रामाणिक मनाशी, अशा संवेदनशील विचारांशी प्रेमात पडणं फार कठीण नसतं… कारण तिथे दिखावा नसतो, फक्त खरं असणं असतं.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा