पैशांपेक्षा जड असलेलं कर्ज...!
पैशांपेक्षा जड असलेलं कर्ज...!
हा शब्द ऐकायला जितका साधा वाटतो, तितकाच तो मनाला खोलवर बोचणारा असतो.माणूस जेव्हा उसणे पैसे घेतो, तेव्हा तो केवळ रक्कम स्वीकारत नाही; तो आपल्या मनावर एक अदृश्य ओझेही उचलतो. त्या क्षणी परिस्थितीवर मात केल्यासारखे वाटते, परंतु त्याच क्षणापासून शांत झोप हळूहळू दूर जाऊ लागते. डोक्यावर जबाबदारीचे सावट येते आणि प्रत्येक दिवस परतफेडीच्या विचारांनीच सुरू होतो.
सकाळी उठल्यावर मनात येणारा पहिला विचार असतो “आज फोन येईल का?” मोबाईलची प्रत्येक रिंग हृदयाची धडधड वाढवते. नाव ओळखीचे असले, तरी त्या आवाजात दडपण जाणवते. देणाऱ्याला आपले पैसे हवे असतात. ते साहजिकच आहे.पण घेणाऱ्याच्या मनात अपराधीपणाची सल सतत टोचत राहते. शब्द न उच्चारताही मनात असंख्य प्रश्न उभे राहतात.
उसण्या पैशातून मिळणारी मदत क्षणिक असते, पण तिची किंमत फार मोठी असते. उधारीचा घास पोट भरतो, मात्र आत्मसन्मानाला ओरखडा बसतो. स्वतःच्या कष्टातून मिळालेल्या पैशांत जी गोडी असते, ती उसण्या पैशांत नसते. कारण त्या पैशांत आपली हतबलता मिसळलेली असते.
कधी कधी परिस्थितीच माणसाला या वाटेवर आणते. आजारपण, संकटे, जबाबदाऱ्या या सगळ्यांपुढे माणूस हताश होतो. अशा वेळी उसणे पैसे जीवनाला आधार देतात, हे नाकारता येत नाही. परंतु काही वेळा गरजेपेक्षा समाधानाला महत्त्व दिले जाते, आणि तेच समाधान हळूहळू हरवून जाते. मग माणूस स्वतःलाच दोष देऊ लागतो.
ज्यांनी पैसे दिले, ते नकळत उपकाराच्या भावनेत जातात. आणि ज्यांनी पैसे घेतले, ते नकळत अपराधीपणाच्या जाळ्यात अडकतात. नात्यांमध्ये अंतर निर्माण होते, संवाद कमी होतो. कर्ज केवळ पैशांपुरते मर्यादित राहत नाही; ते नात्यांवरही भार टाकते.
खरे पाहता, कर्जाचे ओझे पाकिटात नसतेच; ते मनात असते. रकमेची परतफेड झाली, तरी त्या काळातील आठवणी सहज पुसल्या जात नाहीत. त्या अस्वस्थ करणाऱ्या आठवणी माणसाला आयुष्यभर शिकवण देत राहतात.
म्हणूनच उसणे पैसे हा शेवटचा पर्याय असावा. कारण स्वावलंबनात जो आत्मसन्मान आहे, तीच खरी श्रीमंती आहे. पैसे पुन्हा मिळवता येतात; परंतु मनाची शांतता आणि स्वाभिमान हरवला, तर त्याची किंमत कोणतीही रक्कम भरून काढू शकत नाही.उसणे पैसे आयुष्याला काही काळ आधार देतात,पण आयुष्यभर मनाला एक मोलाची शिकवण देऊन जातात.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा