एरंडोल नगरपरिषदेच्या पदग्रहण सोहळ्यात ‘जनहित प्रथम’चा निर्धार....!

एरंडोल नगरपरिषदेच्या पदग्रहण सोहळ्यात ‘जनहित प्रथम’चा निर्धार....!

एरंडोल नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत माय-बाप जनतेने दिलेल्या ऐतिहासिक कौलानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा आज आमदार अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहपूर्ण व सुसंस्कृत वातावरणात पार पडला. एरंडोलच्या राजकीय, सामाजिक व विकासात्मक वाटचालीत विश्वासाचे नवे पर्व सुरू करणारा हा सोहळा शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला.
या पदग्रहण सोहळ्यास जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, भाजपा नेते ॲड. किशोरजी काळकर, युवासेना जिल्हाप्रमुख, नगरसेवक तथा गटनेते प्रा. मनोजभाऊ पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, धरणगांव बाजार समितीचे मा. सभापती शालिकभाऊ गायकवाड, तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, भाजपा युवामोर्चा पदाधिकारी भैरवीताई पलांडे, खडके येथील जगदीशदादा पाटील, मा. नगरसेवक डॉ. एन. डी. पाटील, भाजपाचे एस. आर. पाटील, मा. जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन, जयश्रीताई पाटील, शहरप्रमुख बबलूदादा चौधरी यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका,इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजीमाजी पदाधिकारी व सदस्य, महायुतीचे नेते, पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते तसेच एरंडोल शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अमोलदादा पाटील यांनी आपल्या मनोगतातून जनतेप्रती असलेली कृतज्ञता व जबाबदारी अत्यंत आदरयुक्त शब्दांत व्यक्त केली. एरंडोल नगरपरिषदेच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने आपणा सर्वांसमोर उभा राहताना मला मनःपूर्वक आनंद व अभिमान वाटत आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत एरंडोलच्या सुज्ञ व जागरूक मतदारांनी दिलेला ऐतिहासिक कौल म्हणजे विकास, प्रामाणिकपणा व पारदर्शक कारभाराला दिलेली ठाम व भक्कम साथ आहे,” असे त्यांनी नमूद केले.
या निवडणुकीत जनतेने केवळ लोकप्रतिनिधी निवडले नसून एरंडोलच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्पष्ट दिशा दिली असल्याचे सांगत त्यांनी सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. “ही जबाबदारी अत्यंत मोठी असून जनतेच्या अपेक्षा ही तितक्याच मोठ्या आहेत,” असे नमूद करून त्यांनी लोकप्रतिनिधींना कर्तव्य, प्रामाणिकपणा व लोकसेवेची जाणीव करून दिली.

नगरपरिषद ही केवळ प्रशासकीय संस्था नसून शहराच्या सर्वांगीण विकासाची केंद्रबिंदू संस्था असल्याचे स्पष्ट करत आमदार पाटील म्हणाले की, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण, प्रकाश व्यवस्था, उद्याने तसेच व्यापारी सुविधा या सर्व क्षेत्रांत लोकाभिमुख, दर्जेदार व टिकाऊ विकासकामे होणे आवश्यक आहे. “प्रत्येक निर्णय घेताना ‘जनहित प्रथम’ हा मूलमंत्र कायम डोळ्यासमोर ठेवून कार्य करा,” असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

आजपासून सर्व लोकप्रतिनिधींनी एकसंघपणे एरंडोलच्या विकासासाठी काम करावे,नगरपरिषदेचा कारभार पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त व नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरेल असा असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. योजनांची अंमलबजावणी वेळेत व गुणवत्तापूर्ण झाली पाहिजे, हीच माय-बाप जनतेची भावना असून “हा विश्वास आम्ही निश्चितच पूर्ण करू,” असा शब्द आमदार मा. अमोलदादा पाटील यांनी एरंडोलच्या जनतेला दिला.

आमदार अमोलदादा पाटील यांच्या या आदरयुक्त, मार्गदर्शक व प्रेरणादायी मनोगतातून जनतेशी असलेले आत्मीय नाते, कृतज्ञतेची भावना आणि लोकसेवेची ठाम भूमिका स्पष्टपणे दिसून आली. हा पदग्रहण सोहळा एरंडोलच्या विकासाच्या दिशेने विश्वास, एकजूट आणि लोकहिताच्या संकल्पाने परिपूर्ण असा एक ऐतिहासिक क्षण ठरला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !