शेवटी आपणच मूर्ख ठरतो…!
शेवटी आपणच मूर्ख ठरतो…!
शेवटी आपणच मूर्ख ठरतो, कारण आपण अपेक्षा चुकीच्या ठिकाणी ठेवतो. आपल्याला मनातून माहीत असतं की समोरचा कधीच बदलणार नाही; तरीही आपण त्याच्याकडून बदलाची आशा धरून बसतो. कारण आशा ही मनाची सवय असते आणि मन हट्टी असतं. ते वास्तवापेक्षा स्वप्नांवर अधिक विश्वास ठेवतं.
जिथे केवळ दुर्लक्ष मिळतं, तिथेही आपण आपुलकी शोधतो. दोन क्षणांचं लक्ष मिळालं तरी ते पूर्ण नातं असल्याचा भास निर्माण होतो. अपमान सहन करूनही आपण समजून घेण्याचा अट्टहास करतो, कारण आपल्याला वाटतं.आपण समजून घेतलं तर समोरचाही समजून घेईल. पण समजून घेणं ही संवेदना प्रत्येकाकडे असतेच असं नाही, हे आपण विसरतो.
ज्यांना आपली किंमतच नाही, त्यांच्यासाठी आपण स्वतःला स्वस्त करतो. स्वीकार मिळावा म्हणून आपण आपल्या आत्मसन्मानाची किंमत हळूहळू कमी करत जातो. स्पष्ट नकार मिळूनही मनात होकार जपतो, कारण मनाला वास्तवापेक्षा शक्यता अधिक प्रिय असतात.
खोट्या शब्दांवर आपण विश्वास ठेवतो आणि खऱ्या संकेतांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. कृती काहीतरी वेगळंच सांगत असतात, पण शब्द गोड असतात आणि आपलं मन त्या गोडव्याला भुलतं. स्वतःच्या जखमांपेक्षा आपण दुसऱ्याच्या सोयी अधिक महत्त्वाच्या मानतो, कारण प्रेम करताना स्वतःला विसरण्याची आपल्याला सवय झालेली असते.
वेळ सतत आपल्याला थांबण्याचा इशारा देत असते, पण आपण हट्टाने पुढे जातो. ज्यांनी कधीच थांबून आपल्याकडे पाहिलं नाही, त्यांच्यासाठी आपण वाट पाहत राहतो. प्रेम असो, नातं असो किंवा मैत्री
सगळीकडेच आपणच जास्त देतो, जास्त सहन करतो, जास्त समजून घेतो.
आणि शेवटी जेव्हा सत्य समोर येतं, तेव्हा दोषही आपण स्वतःलाच देतो.“मला आधीच कळायला हवं होतं,” असं म्हणत आपण स्वतःवरच कठोर होतो. कारण समोरचा जितका स्वार्थी असतो,त्यापेक्षा आपण अधिक भावनिक असतो. आपल्याकडे भावना असतात, आपुलकी असते, मनापासून जपलेलं जोडलेपण असतं.
म्हणून फसवणूक झाल्यावर राग दुसऱ्यावर नसतो, तर स्वतःवरच असतो. कारण आपण दिलेलं असतं, आपण थांबलेलो असतो, आपण विश्वास ठेवलेला असतो. पण खरं तर यात आपला दोष नसतो. भावना ठेवणं, प्रेम करणं, शेवटपर्यंत प्रयत्न करणं ही कमजोरी नाही.ती माणुसकी आहे.
शेवटी आपणच मूर्ख ठरतो…पण हा मूर्खपणा मनातून, हृदयातून जन्मलेला असतो.आणि ज्याचं हृदय जिवंत असतं,तो कधी ना कधी तरी असा मूर्ख ठरतोच.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा