गोड शब्दांची श्रीमंती...!
गोड शब्दांची श्रीमंती...!
उगाच वाईट बोलणारा माणूस मनाने गरीब असतो, कारण ज्या मनात प्रेम, शांतता आणि आत्मविश्वास असतो, त्या मनातून कटुता निर्माण होत नाही. शब्द हे माणसाच्या स्वभावाचं खरं सौंदर्य आहे; आणि जेव्हा हेच शब्द बोचणारे, तिखट आणि दुखावणारे बनतात, तेव्हा ते प्रथम त्या व्यक्तीलाच लहान करतात, ज्याच्या तोंडून ते बाहेर पडतात.
काही लोकांना दुसऱ्यांचा अपमान करण्यात जणू विचित्र आनंद मिळतो. त्यांना वाटते की इतरांना कमी करून ते स्वतः मोठे दिसतील. पण प्रत्यक्षात त्यांच्या शब्दांतून त्यांचीच किंमत उघड होते.त्यांच्या मनातली रिक्तता, भीती आणि असुरक्षितता स्पष्ट दिसू लागते. वाईट बोलणं हे मोठेपणाचं लक्षण नसून, खरं मोठेपण म्हणजे दुसऱ्याला मान देणं, त्याला आधार देणं आणि त्याच्या जखमा वाढवण्याऐवजी त्यावर प्रेमाची फुंकर मारणं होय.
एखाद्याचा अपमान करण्यापेक्षा एखादं प्रेमळ वाक्य बोलणं कितीतरी अधिक बलवान असतं. गोड शब्द मनाला उमलवतात, विश्वास देतात आणि नात्यांची मुळे अधिक मजबूत करतात. उलट कटु शब्द मन पोखरतात, नाती दुरावतात आणि अखेरीस दोन्हीकडे वेदनेची जागा निर्माण होते. ज्यांच्या मनात कटुता दाटलेली असते, तेच टोचणारे शब्द सहज बोलतात; परंतु त्या शब्दांनी ते दुसऱ्याला जितकं दुखावतात, त्याहून अधिक स्वतःच्या मनातल्या पोकळीला वाढवतात.
जग सुंदर कसे होईल? जर आपण एखाद्याला दुखावण्याऐवजी त्याला समजून घेण्याचा मार्ग निवडला, त्याच्या भावनांना मान दिला आणि त्याच्यावर थोडं प्रेम उधळलं, तर जग अधिक शांत, ममत्वपूर्ण आणि खऱ्या अर्थानं मानवी बनेल. प्रत्येकाच्या तोंडात गोड शब्द असतील, तर नाती आपोआप गोड होतील आणि हृदयांत उजेड पसरू लागेल.
मोठा तो नाही जो रागाने ओरडतो, अपमान करतो किंवा इतरांना लहान दाखवण्याचा प्रयत्न करतो. मोठेपणा म्हणजे शांत राहणे, संयम राखणे आणि परिस्थितीला समतोलाने हाताळणे. मोठेपणा हा आवाजात नसतो.तो स्वभावात असतो.
आणि शेवटी खरी श्रीमंती ही केवळ पैशांत नसते.
हसतमुखाने जगणं हीच खरी श्रीमंती आहे.ज्याच्या चेहऱ्यावर खरे हसू असते, त्याच्या मनात प्रकाश असतो. असा माणूस स्वतःही उजळतो आणि आपोआप इतरांनाही उजळवतो.
म्हणूनच गोड बोलूया, मन मोठं करूया आणि प्रत्येकाला प्रेमानं सामावून घेऊया.कारण जग बदलतं ते शक्तीनं नाही तर शब्दांनी, प्रेमानं आणि हसतमुखानं.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा