एरंडोलची खरी ताकद सजग नागरिक आणि संवेदनशील नेतृत्व...!
एरंडोलची खरी ताकद सजग नागरिक आणि संवेदनशील नेतृत्व...!
एरंडोल नगरीच्या शांत आणि निवांत रात्री, जेव्हा संपूर्ण शहर गाढ निद्रेत होते, त्या वेळी एका सजग नागरिकाच्या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली. दिनांक
२५/१२/२०२५, शुक्रवार रोजी मध्यरात्री,जलशुद्धीकरण केंद्रावरून पाण्याच्या टाकीकडे जाणारी मुख्य मेन रायझिंग लाईन हॉटेल कल्याणी परिसरात अचानक फुटली.
काही क्षणांतच पाण्याचा प्रचंड प्रवाह आजूबाजूच्या परिसरात, गॅरेजमध्ये, गोठ्यांमध्ये तसेच शेतांमध्ये वेगाने पसरू लागला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची तसेच पशुहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. विशेष बाब म्हणजे, त्या क्षणी सदर पाईपलाईन नेमकी कुठून जात आहे, याबाबतही स्पष्ट माहिती उपलब्ध नव्हती.
अशा अत्यंत गंभीर व चिंताजनक परिस्थितीत श्री. दाऊद बागवान यांनी दाखवलेली समयसूचकता आणि जागरूकता खरोखरच उल्लेखनीय व प्रेरणादायी ठरली. मध्यरात्री ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पाणीपुरवठा विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री. दीपक गोसावी यांना तात्काळ माहिती दिली. त्यांच्या तत्परतेमुळे जलशुद्धीकरण केंद्रावरून त्वरित पाणीपुरवठा बंद करण्यात आला आणि संभाव्य मोठी हानी वेळेतच टळली. एका जागरूक नागरिकाच्या सजग कृतीमुळे संपूर्ण परिसराला मोठा दिलासा मिळाला.
या घटनेची माहिती मिळताच एरंडोल नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची सखोल पाहणी केली. त्यांनी श्री. दाऊद बागवान यांच्या समयसूचकते बाबत व जागरूकतेबाबत मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांना सतर्क व जबाबदार नागरिक म्हणून गौरविले. याच वेळी, प्रसंगाचे गांभीर्य ओळखून तातडीने कार्यवाही करणाऱ्या पाणीपुरवठा विभागातील संपूर्ण कर्मचारी वर्गाचेही त्यांनी मनापासून कौतुक केले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष श्री. राजेंद्र चोधरी व अभिषेक परदेशी हेही उपस्थित होते. प्रशासनाची तत्परता आणि नागरिकांची सजगता एकत्र आल्यास कोणतीही आपत्ती मोठ्या संकटात रूपांतरित होण्यापासून रोखता येते, असा सर्वांचा एकमुखी सूर होता.
ही घटना केवळ पाईपलाईन फुटण्यापुरती मर्यादित नसून, ती माणुसकी, सामाजिक जबाबदारी आणि सजग नागरिकत्वाचे जिवंत उदाहरण आहे. श्री. दाऊद बागवान यांच्यासारखे जागरूक नागरिक, श्री. दीपक गोसावी यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी आणि डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्यासारखे संवेदनशील व तत्पर नेतृत्व लाभलेली एरंडोल नगरी निश्चितच सुरक्षित आणि सक्षम वाटचाल करीत आहे.
अशा सकारात्मक व प्रेरणादायी घटनांमुळे समाजातील परस्पर विश्वास अधिक दृढ होतो आणि “आपण सर्व एकमेकांसाठी आहोत” ही भावना अधिक बळकट होते.
हीच एरंडोल नगरीची खरी ताकद आहे.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा