सांभाळून चला कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते
सांभाळून चला कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते
जीवनात प्रत्येकाला कौतुक आवडतं. कोणीतरी आपल्या कामाची दखल घेतो, आपल्यावर स्तुतीचा वर्षाव करतो, तेव्हा मनाला एक वेगळाच आनंद होतो. आपल्याला स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो आणि नवीन ऊर्जा मिळते. पण प्रत्येकवेळी कौतुक हे शुद्ध भावनेतूनच केले जातं, असं नाही. कधी कधी कौतुकाच्या गोड शब्दांखाली एक लपलेला हेतू असतो, ज्याचा आपण लगेच अंदाज लावू शकत नाही.
कौतुक हे दिसायला गोड वाटतं, ऐकायला सुखद वाटतं. पण त्या गोडव्यात किती प्रामाणिकपणा आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जगात काही लोक निखळ मनाने कौतुक करतात, पण काहीजण आपल्याला फक्त फसवण्यासाठीच हे करतात. त्यांच्या गोड शब्दांमागे असतो तो स्वार्थाचा एक छुपा हेतू, जो हळूहळू उघड होतो.
कौतुकाचा पूल मजबूत आणि आकर्षक असतो, पण त्याच्या खाली वाहणारी मतलबाची नदी कधी आपल्याला ओढून घेते हे समजतच नाही. सुरुवातीला ते कौतुक आपल्याला सत्य आणि प्रामाणिक वाटतं, पण जसजसं त्या व्यक्तीचं खरे रूप समोर येतं, तसतसं आपलं मन निराश होतं. एखादा आपल्याला प्रोत्साहन देत असतो, आपलं कौतुक करत असतो, पण तो आपल्याकडून काही अपेक्षा ठेवतो, त्याचा फायदा उचलतो, आणि त्याचं काम झाल्यावर मात्र तो मागे वळून पाहतही नाही.
आपल्याला अशा अनेक प्रसंगांचा अनुभव येतो, जेव्हा कौतुकाच्या मुखवट्याखाली स्वार्थाची छाया दिसते. त्यामुळे कौतुकाचा स्वीकार करताना सावध राहिलं पाहिजे. खऱ्या आणि खोट्या कौतुकामध्ये सूक्ष्मसा फरक असतो, जो ओळखणं फार महत्त्वाचं आहे. खरं कौतुक नेहमी मनापासून आणि अपेक्षाविरहित असतं. त्यामागे कुठलाही स्वार्थ नसतो. अशा कौतुकाला खरंच मान द्यायला हवा.
खोट्या कौतुकामुळे आपला आत्मविश्वास डळमळीत होतो, तर खऱ्या कौतुकामुळे आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळते. त्यामुळे कौतुकाचा अर्थ समजून घ्या. कौतुकाचं स्वागत करा, पण त्यामागील भावनेचा विचार नक्की करा. जगात प्रत्येकजण स्वतःच्या फायद्याचा विचार करत असतो, ही बाब सत्य आहे. मात्र, आपण दिलेलं कौतुक मात्र निखळ, प्रेमाने आणि स्वार्थाशिवाय असलं पाहिजे.
जीवनात खरं कौतुक खऱ्या नात्यांचं आणि निखळ भावनेचं प्रतीक असतं. अशा कौतुकानेच आपण दुसऱ्यांना प्रेरणा देऊ शकतो. त्यामुळे सावध राहा, खऱ्या माणसांची ओळख ठेवा आणि जीवनात खऱ्या भावना जपण्याचा प्रयत्न करा. कौतुकाच्या गोड शब्दांमध्ये हरवू नका, कारण त्या गोडव्यातील सत्य ओळखणं हाच खरी शहाणपणाचा मार्ग आहे.
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा