प्रामाणिक शिपाई: महेश जोशी यांचा प्रेरणादायी प्रवास
प्रामाणिक शिपाई: महेश जोशी यांचा प्रेरणादायी प्रवास
महेश जोशी हे नाव ऐकताच डोळ्यासमोर एक कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक, आणि कष्टाळू व्यक्तिमत्त्व उभे राहते. प्रांत अधिकारी कार्यालय, एरंडोल येथे शिपाई पदावर कार्यरत असलेले महेश जोशी हे चतुर कर्मचारी संघटनेचे एरंडोल, पारोळा आणि धरणगाव विभागीय अध्यक्ष आहेत. महसूल विभागात त्यांनी आपल्या अथक मेहनतीने आणि प्रामाणिक सेवाभावाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
महेश जोशी यांचा प्रवास अत्यंत साध्या घरातून सुरू झाला. लहानपणापासूनच कष्ट हेच त्यांचे खरे साथीदार होते. 1998 ते 2013 या काळात तहसीलदारांच्या बंगल्यावर काम करताना त्यांनी आपल्या प्रामाणिक आणि मेहनती स्वभावाने सर्व अधिकारीवर्गाचा विश्वास संपादन केला. कोणतेही काम सांगितले गेले तरी ‘नाही’ हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता. जो काम त्यांच्या हाती आले, ते त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि वेळेवर पूर्ण केले.
महेश जोशी हे महसूल विभागातील एक विश्वासार्ह कर्मचारी आहेत. ऑफिसमध्ये कोणताही व्यक्ती आल्यावर “जोशी भाऊ, हे काम करून द्या” एवढं म्हटल्यावर ते काम तत्परतेने पूर्ण होत असे. कधीही पैशासाठी कोणाकडे हात पसरला नाही. त्यांचे काम हेच त्यांचे ओळखपत्र ठरले. त्यामुळेच महसूल विभागातील अधिकारी आणि सहकाऱ्यांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे.
त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची दखल नेहमीच घेतली गेली. त्यांच्या प्रामाणिक कामासाठी त्यांना तीन वेळा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आणि प्रांत अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना मिळालेल्या सन्मानांनी त्यांच्या कार्याचा गौरवच झाला आहे.
महेश जोशी केवळ शिपाई नसून इतरांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांची प्रामाणिकता आणि सेवाभावी वृत्ती अनेकांना प्रेरित करते. आजही त्यांच्या स्वभावात लहानपणीच्या कष्टांची झलक दिसून येते. प्रत्येक कामात त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. त्यामुळेच महसूल विभागात त्यांना ‘प्रामाणिक शिपाई’ म्हणून ओळखले जाते.
महेश जोशी यांच्या कष्टमय प्रवासाचा आणि कर्तृत्वाचा गौरव करताना त्यांच्या जिद्दीला सलाम करावासा वाटतो. त्यांनी केलेले योगदान आणि त्यांचे प्रामाणिकपण प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देताना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया.
"आपल्या प्रामाणिक कार्याने आणि सेवाभावी वृत्तीने अधिकाऱ्यांचे तसेच लोकांचे मन जिंकणाऱ्या महेश जोशी यांना त्यांच्या कर्तव्यनिष्ठतेचा गौरव सतत वाढवत राहण्यासाठी शुभेच्छा!"
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा