मान-अपमान: जीवनाचा अविभाज्य भाग
मान-अपमान: जीवनाचा अविभाज्य भाग
जीवन सुख-दुःख, सन्मान-अपमान यांच्या संमिश्र अनुभवांनी भरलेले आहे. या अनुभवांमधूनच माणसाचे खरं व्यक्तिमत्त्व घडतं. जीवनात प्रत्येकालाच कधी ना कधी सन्मान मिळतो, तर कधी अपमानही सहन करावा लागतो. सन्मान मिळाल्यावर मन प्रसन्न होते, आत्मसन्मान वाढतो, आणि जग जिंकल्याचा आनंद होतो. परंतु जेव्हा अपमानाचा प्रसंग येतो, तेव्हा मनाला प्रचंड वेदना होतात. आत्मसन्मानाला धक्का बसतो, चीड निर्माण होते, आणि अपमान करणाऱ्याविषयी कटुता वाटते.
मात्र खरे पाहता, जीवनाच्या यशस्वी प्रवासासाठी या दोन्ही गोष्टींचा स्वीकार करणे आवश्यक असते. ज्या सहजतेने आपण सन्मानाचा स्वीकार करतो, त्याच संयमाने आणि धैर्याने अपमानाचा सामना करणे गरजेचे आहे.
अपमान हा माणसाला खचवण्यासाठी येत नाही, तर त्यातून काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न असतो. अपमानाने खचून न जाता त्याचा उपयोग प्रेरणा म्हणून केला पाहिजे. आपले ध्येय साध्य करण्यासाठी अपमान हा एक आधार ठरू शकतो, फक्त त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असावा.
अपमान सहन करणे सोपे नसते, परंतु यशस्वी व्यक्ती नेहमी अशा प्रसंगांतून पुढे गेलेल्या असतात. मनाचा कणखरपणा ठेवून अपमानाने खचून न जाता, त्यातून शिकत राहण्याची तयारी ठेवली पाहिजे. अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मनोवृत्तीचा विचार करून त्यांच्याविषयी कटुता बाळगण्याऐवजी त्यांच्या कृतींना क्षमाशीलतेने सामोरे जावे. त्यामुळे मन शांत राहते आणि ध्येय गाठण्यासाठी आपले लक्ष केंद्रित होते.
इतिहासात असे अनेक उदाहरणे आहेत, ज्यांनी अपमानाचे प्रसंग सहन करत स्वतःला सिद्ध केले. महात्मा गांधीजींना दक्षिण आफ्रिकेत रेल्वेतून उतरवले गेले, हा अपमान त्यांनी प्रेरणेचे शस्त्र बनवले आणि जगाला सत्याग्रहाचे तत्त्व दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यतेच्या अपमानाचा सामना केला, पण त्यांनी आपल्या शिक्षणाच्या जोरावर भारताच्या संविधानाची निर्मिती करून समाजाला नवीन दिशा दिली.
मान मिळाला तर त्याचा गर्व न करता तो नम्रतेने स्वीकारावा आणि अपमान झाला तर त्याला प्रेरणादायी धक्का मानून ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत. अपमानाला उत्तर देण्यासाठी वाद-प्रतिवाद करण्याची आवश्यकता नसते, तुमचे कर्तृत्वच त्याला सर्वोत्तम उत्तर ठरते. "अपमानाला उत्तर देण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे यशस्वी होणे."
आपल्या जीवनाचा प्रत्येक प्रसंग, मग तो सन्मानाचा असो वा अपमानाचा, आपल्याला शिकवण देणारा असतो. त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षणाला सकारात्मकतेने स्वीकारून यशस्वी होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा. "अपमानाची खंत न करता त्याला प्रेरणेचे शस्त्र बनवा, आणि आयुष्यात मानाचे स्थान निर्माण करा."
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा