संघर्षातून यशाची मशाल: नेरूळच्या शुभम सुनील शिंदे यांची प्रेरणादायी कहाणी
संघर्षातून यशाची मशाल: नेरूळच्या शुभम सुनील शिंदे यांची प्रेरणादायी कहाणी
रावेर तालुक्यातील नेरूळ या छोट्याशा खेडेगावात कधीही न संपणाऱ्या संघर्षांचा इतिहास रचला गेला आहे. या गावातील एका सामान्य कुटुंबातून शुभम सुनील शिंदे नावाचा एक मुलगा संघर्षाची मशाल पेटवत यशाच्या शिखरावर पोहोचला.
शुभमचे वडील सुनील शिंदे यांना एका रिक्षा अपघातानंतर अर्धांगवायूचा झटका आला आणि कुटुंबावर मोठे संकट कोसळले. घरातील कर्ता माणूस काम करू शकत नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला. मात्र, परिस्थितीला शरण न जाता शुभमच्या आई रंजनाताईंनी व त्याच्या बहिणींनी कष्टांची कास धरली. शेतमजुरीसह विविध छोटे मोठे कामे करत त्यांनी कुटुंब चालवले. आर्थिक अडचणींच्या गराड्यात असतानाही त्यांनी शिक्षणाचा ध्यास सोडला नाही.
शुभम आणि त्याच्या बहिणींनी प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत घेतले, तर माध्यमिक शिक्षण सरदारजी हायस्कूलमध्ये पूर्ण केले. मोठी बहीण योगिता इंग्रजी विषयात एमएपर्यंत शिक्षण पूर्ण करत होती, तर शुभम सुरुवातीला विज्ञान शाखेत होता. परंतु, आर्थिक परिस्थितीमुळे त्याला राज्यशास्त्रात पदवी करण्याचा निर्णय घ्यावा लागला. जळगावच्या मुलजी जेठा महाविद्यालयात शिक्षण घेत असताना कमवा-शिका योजनेत सहभागी होत त्याने शिक्षण चालू ठेवले.
शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी शुभम कधी लग्न समारंभात वाढप्या म्हणून काम करत असे, तर कधी जळगावमधील सायली हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असे. वडिलांच्या आजारपणामुळे आलेल्या संकटांमध्येही त्याने एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू ठेवली.
शुभमने सरस्वती हॉस्पिटलमध्ये नाईट बॉय म्हणून काम सुरू केले. रात्रीचे काम आणि दिवसा अभ्यास, असे कठीण वेळापत्रक सांभाळत त्याने स्वप्नांच्या दिशेने प्रवास केला. थकवा आला तरी स्वप्नांना बळ देत तो सतत प्रयत्नशील राहिला.
शुभमच्या मोठ्या बहिणी योगिता हिला 2024 मध्ये नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य सेविका म्हणून नोकरी मिळाली. तिच्या यशाने शुभमला प्रेरणा मिळाली आणि तो अधिक जोमाने अभ्यासाला लागला. या प्रेरणेने पोलीस उपनिरीक्षक पदासाठी एमपीएससी पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण करत त्याने मुलाखत आणि मैदानी चाचणीसाठी तयारी सुरू ठेवली.
ऑगस्ट 2024 हा क्षण शुभमच्या आयुष्यात सुवर्णक्षण ठरला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालात पोलीस उपनिरीक्षक पदासाठी त्याचे नाव झळकले. गावकऱ्यांनी जल्लोष करत नेरूळच्या पहिल्या पोलीस उपनिरीक्षकाचे स्वागत केले. घरी पोहोचल्यावर शुभम आईच्या कुशीत डोकं ठेवून रडला. हे अश्रू संघर्षाचा विजय साजरा करत होते. गावाने ढोल-ताशांच्या गजरात त्याची मिरवणूक काढली आणि संपूर्ण नेरूळचे संघर्षाला सन्मान मिळाला.
शुभमचे यश हे एका व्यक्तीचे नसून एका कुटुंबाच्या अथक मेहनतीचे यश आहे. त्याच्या जीवनप्रवासाने अनेकांना प्रेरणा दिली आहे. शुभम सुनील शिंदे याच्या संघर्षाला आणि यशाला मानाचा सलाम!
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा