जगण्याचा अर्थ
जगण्याचा अर्थ
आयुष्य म्हणजे क्षणांचे सुंदर गाठोडे, जिथे प्रत्येक क्षण अनमोल असतो. मग या अनमोल क्षणांना रुसव्यांमध्ये किंवा फुगव्यांमध्ये का वाया घालवायचे? या आयुष्याचे एक साधे पण मोलाचे रहस्य आहे – त्याला जितके साधे ठेवाल, तितके ते अधिक सुंदर भासेल.
कधी तुम्ही विचार केला आहे का, आपण दुसऱ्यांवर का रुसतो? का कुणावर फुगतो? आपल्याला वाटते की समोरच्याने आपल्याशी चुकीचे वागले. पण खरोखर चूक कोणाची असते? समोरच्याची की आपली? बऱ्याचदा आपण आपल्या अपेक्षांचे ओझे नात्यांवर लादतो, आणि त्या अपेक्षांच्या भारामुळे नाती तुटू लागतात. पण जर आपण माणसांच्या चुका स्वीकारल्या आणि त्यांना माफ केले, तर आयुष्य किती सुंदर होईल, नाही का?
आयुष्य खूपच थोडकं असतं. आपल्या हातात फक्त चारच क्षण असतात. मग हे क्षण दुःख, द्वेष किंवा मत्सराने भरायचे की प्रेम, आनंद आणि समाधानाने सजवायचे, हे आपणच ठरवायचे असते. हे समजून घेतले पाहिजे की जे येणार आहे, ते अपरिहार्य आहे, आणि जे जाणार आहे, त्याला मुक्तपणे जाऊ द्यावे लागते. हे सत्य समजून घेतले तर आयुष्य अधिक सुसह्य होते.
थोडे हसायला शिकावे, थोडे इतरांना हसवायला शिकावे. हसणे हे औषधासारखे असते, ते दुःखांवर फुंकर घालते. आपण आनंदी राहिलो, तरच आपण इतरांना आनंद देऊ शकतो. कोणाचे मन जपले, कोणाला मदतीचा हात दिला, किंवा कोणासाठी छोटंसे का होईना काहीतरी चांगलं केलं, तरच आपण खरं आयुष्य जगल्याचं समाधान मिळतं.
आपले आयुष्य असे जगावे की आपण नसतानाही आपल्या आठवणींनी लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटावे. आपले नाव घेताना कोणी म्हणावे, "असे माणूस पुन्हा होणे नाही!" हीच आपल्या आयुष्याची खरी संपत्ती आहे.
दुःख, द्वेष आणि राग यांना मागे सोडून, प्रेम आणि आनंद याने आयुष्य समृद्ध करावे. आयुष्याचा खरा गाभा म्हणजे दुसऱ्यांसाठी प्रेरणा बनणे. फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी जगायला शिकणे. जिथे चुका होतात, तिथे त्यातून शिकावे आणि पुढे जावे.
शेवटी, आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास आहे. या प्रवासात आपण हसत-हसवत, माणसे जोडत पुढे जात राहायचे. चला, आजपासून रुसवे-फुगवे बाजूला ठेवून, आयुष्याचे हे साधे गुपित समजून घ्या आणि एकमेकांसाठी जगायला शिका.
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा