सहानुभूती: भावना शब्दांपलीकडची
सहानुभूती: भावना शब्दांपलीकडची
सहानुभूती ही माणुसकीचा गाभा आहे. दुसऱ्याच्या वेदनांशी तादात्म्य पावणे, त्याच्या दुःखात सहभागी होणे, हे आपल्या मनाला उभारी देणारे असते. जसे आपल्याला कोणी सहानुभूती दाखवली, तर आपल्याला बरे वाटते, तसेच आपण कोणाला सहानुभूती दाखवली, तरीही आपल्याला समाधान मिळते. परंतु खरी सहानुभूती ही केवळ शब्दांत मर्यादित नसावी, ती कृतीतून व्यक्त व्हावी, आणि त्यात हृदयाचा ओलावा असावा.
जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी अडचणींना सामोरे जावे लागते. संकटांशी झुंजत असताना मदतीचा हात मिळाला, तर ते दुःख हलके होऊन जाते. पण मदत ही केवळ सहानुभूतीच्या शब्दांत व्यक्त होऊन थांबता कामा नये. ती हृदयातून यावी आणि कृतीतून व्यक्त व्हावी. कारण "मला तुझं दुःख समजतंय" असे म्हणणे पुरेसे नसते; "मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुला मदत करीन" हे कृतीतून दाखवणे महत्त्वाचे असते.
सहानुभूती दाखवताना आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या गरजा समजून घेतल्या पाहिजेत. कधी कधी त्या व्यक्तीला आपली सहानुभूती नको असू शकते; त्याला फक्त खंबीर आधाराची गरज असते. अशा वेळी, आपण केवळ सहानुभूतीच्या शब्दांनी त्याला दुःखी करण्याऐवजी त्याच्या आत्मविश्वासाला बळकटी देणं अधिक महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ, एखाद्या गरजू व्यक्तीला "तुझं दुःख समजतंय" असे बोलण्यापेक्षा त्याला शिक्षण, अन्न किंवा नोकरीसाठी मदत करणं हीच खरी सहानुभूती ठरते.
तोंडी सहानुभूती दाखवणे सोपे आहे, परंतु ती कृतीतून व्यक्त करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण माणसाच्या अडचणींवर उपाय शोधण्यासाठी फक्त बोलण्याने काही साधत नाही; त्यासाठी प्रत्यक्ष कृती केली पाहिजे. खरा आपलेपणा हा कृतीतून दिसतो, शब्दांतून नाही.
सहानुभूतीची खरी परीक्षा कठीण प्रसंगी होते. त्या वेळी, आपण निःस्वार्थपणे कोणाला मदत करतो का, यावरून आपल्या सहानुभूतीचे खरे मूल्य ठरते. मदत ही प्रसिद्धीसाठी नसावी, ती माणुसकीच्या भावनेतूनच असावी. अशा कृतीतून आपल्यालाही आत्मिक समाधान मिळते आणि दुसऱ्याला संकटातून बाहेर पडण्याचा आधार मिळतो.
आजच्या समाजाला अशीच कृतीशील सहानुभूतीची गरज आहे. आपण फक्त शब्दांनीच नाही, तर कृतीनेही आपलेपणा दाखवला पाहिजे. गरजूला मदतीचा खांदा दिला पाहिजे. त्याच्या वेदनांमध्ये सहभागी होऊन त्याला उभारी दिली पाहिजे. अशा सहानुभूतीमुळेच समाज अधिक स्नेहशील, सुदृढ आणि एकमेकांच्या मदतीला धावून जाणारा होईल.
"सहानुभूती शब्दांनी दाखवली तर ती भाव होते; कृतीतून दाखवली तर ती आधार बनते."
© शब्दांकन दीपक पवार संपादक खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा