मला ही मोरपिसासारखं व्हायचंय...
मला ही मोरपिसासारखं व्हायचंय...
काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि त्यांच्या अस्तित्वामुळे आपलं मन हलकं होतं, जणू मोरपिसाचा हळुवार स्पर्श झाला असावा. त्यांच्या शब्दांत, वागण्यात, आणि प्रेमात एक निरागसता असते, जी आपल्याला एका वेगळ्या आनंदाच्या विश्वात नेते. अशा माणसांची साथ म्हणजे आयुष्यभरासाठी मिळालेला स्नेहाचा अमूल्य ठेवा असतो.
काही माणसं साखरेसारखी गोड असतात. त्यांच्या बोलण्याने, हास्याने, आणि त्यांच्या वागण्याने आयुष्य गोडसर होतं. छोट्या-छोट्या क्षणांत ही त्यांच्या सोबत आपल्याला परिपूर्ण समाधान मिळतं. त्यांच्या गोडव्यामुळे आयुष्य कधी सुंदर बनतं, हे कळत ही नाही.
काही माणसं आपल्या जीवनात आधारस्तंभासारखी ठाम उभी असतात. संकटांच्या वावटळीत ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. त्यांच्या उपस्थितीमुळे आपल्याला सुरक्षिततेची अनुभूती होते. त्यांचा आधार म्हणजे आयुष्याला मिळालेला एक विश्वासाचा कणखर पाया असतो.
चाफ्यासारखी माणसं आयुष्यभर सुगंध पसरवत राहतात. त्यांच्या सहवासाने आपला दिवस उजळतो, मन प्रसन्न होतं, आणि आयुष्य सकारात्मक विचारांनी भारलेलं वाटतं. त्यांचं असणं म्हणजे एक सुंदर गंधाळलेलं स्वप्न जगण्यासारखं असतं.
काही माणसं अनोळखी असूनही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून जातात. त्यांच्या कृतींमुळे, शब्दांमुळे किंवा सोबतीमुळे ते आपल्याला आयुष्यभरासाठी संस्मरणीय ठरतात. अशा व्यक्तींनी आपल्याला न विसरता येणारं एक चिरंतन स्मरण दिलेलं असतं.
काही माणसं इतकी समजूतदार असतात की आपण न बोलताही आपल्या मनातील भावना जाणतात. त्यांच्या नजरेतूनच आपल्याला आधार मिळतो. त्यांच्या समजूतदारपणामुळे आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद मिळते.
नाती जपणारी माणसं आपल्याला नात्यांची खरी खोली शिकवतात. दिलेल्या वचनांना आयुष्यभर पाळणं, नात्याला शाश्वत ठेवणं, आणि दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःचं दुःख विसरणं या माणसांच्या आयुष्याचं मुख्य उद्दिष्ट असतं.
वाईट आठवणी पुसून टाकून चांगल्या गोष्टींनी भरलेली माणसं आपल्याला आयुष्य कसं सुंदर बनवायचं हे शिकवतात. त्यांच्या सकारात्मकतेमुळे वाईट प्रसंगांचा भार हलका होतो आणि जगण्याला नवीन दिशा मिळते.
मलाही अशा व्यक्तींपैकी एक व्हायचंय. चेहऱ्यावर कायम हास्य ठेवून जगायचंय. सुखाच्या क्षणी नव्हे, पण दुःखात कोणाचा हात धरायचंय. दूर असताना ही कोणाच्या आठवणीत राहायचंय. माझ्या अस्तित्वामुळे कोणाच्या तरी आयुष्याला सुखद स्पर्श व्हावा, अशी माझी इच्छा आहे.
जगणं म्हणजे केवळ स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी ही चांगलं करायला शिकणं. मोरपिसासारखा नाजूक, साखरेसारखा गोड, आणि चाफ्यासारखा सुगंधी होणं, हाच माझ्या आयुष्याचा खरा उद्देश आहे.
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा