"ध्येयाची शक्ती"
व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा भाग २७
"ध्येयाची शक्ती"
"मी यशस्वी होणार, कारण माझं ध्येय माझं जीवन आहे." या एका साध्या वचनात एक गहन सत्य दडलं आहे. प्रत्येक माणूस आयुष्यात वेगवेगळ्या लढाया लढतो, कधी स्वतःच्या मनाशी, तर कधी कठोर परिस्थितीशी. जीवनाच्या या प्रवासात, जेव्हा आपल्याला एक ठरलेलं ध्येय असतं, तेव्हा त्याचं आकर्षण आणि त्यासाठीचे संघर्ष त्याला पार करण्याची अनमोल शक्ती आपल्यात निर्माण करतात. ध्येय फक्त एक स्वप्न नाही, तर ते आपल्या संघर्षाचं, आपली जिद्द आणि आपली मेहनत याचं प्रतिबिंब आहे. ते आपल्या प्रत्येक श्वासाशी, प्रत्येक पावलाशी जोडलेलं असतं.
जेव्हा आपलं ध्येय स्पष्ट असतं, तेव्हा ते आपलं जीवन बनतं. प्रत्येक दिवसाची सुरुवात त्या ध्येयाच्या विचारांपासून होते, आणि प्रत्येक क्षण त्याचं अनुसरण करण्यासाठी समर्पित होतो. ते ध्येय आपलं सर्वस्व बनून आपल्याला दिशा आणि धैर्य देतं. मार्गावर अनेक अडचणी येतात, कधी मनात शंका निर्माण होतात, कधी असं वाटतं की थांबावं आणि सोडून द्यावं. पण तेच ध्येय त्यांना हाक देतं, पुन्हा पाठीवर हात ठेवून सांगतं, "थांबू नकोस, एक सुंदर ठिकाण तुझ्या मार्गावर आहे, जे तुझ्या प्रयत्नांनंतरच तुला मिळेल."
ध्येय कठीण वाटत असलं तरी, त्याच कठोरतेतून एक गोड यश उगवते. प्रत्येक अडचण, प्रत्येक चुकलेलं पाऊल, हे आपल्याला अधिक बलशाली करतं. तेव्हा मी माझ्या ध्येयाच्या मागे धावत असतो आणि ते ध्येयच मला पुन्हा पुन्हा स्फूर्तीदायक बनवतं. कधी इतर लोक मला थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते ध्येय मला थांबू देत नाही. तेच ध्येय, तेच स्वप्न, हेच मला प्रत्येक नवीन दिवशी नवा उत्साह देतं.
ध्येय मिळवायला वेळ लागतो, अनेक वेळा अपयश देखील येतं, पण जोवर तुम्ही त्यावर विश्वास ठेवता आणि त्याच्या दिशेने प्रयत्न करत राहता, तोपर्यंत ते यश तुमच्यापर्यंत नक्की पोहोचते. माझं जीवन हे त्या ध्येयाच्या शोधात आहे, आणि तेच ध्येय मला यशाच्या मार्गावर घेऊन जाईल.
हे ध्येय फक्त एक साधं लक्ष्य नाही, तर ते आपल्यातील असलेल्या शक्तीला, धैर्याला आणि इच्छेला जागृत करतं. ते आपल्या आतल्या उमेदीला प्रज्वलित करतं आणि आपलं सर्वस्व त्या स्वप्नासाठी समर्पित करतं. "ध्येयाची शक्ती" हाच त्याचं असामान्य प्रभाव असतो.
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा