आस्था महिला मंडळ : समाजसेवेचा नवा आदर्श


आस्था महिला मंडळ : समाजसेवेचा नवा आदर्श

पत्रकारिता ही केवळ एक व्यवसाय नाही, तर समाजहितासाठी लढणाऱ्या योद्ध्यांचे कार्य आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे, सत्याला वाचा फोडणारे आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना शासनदरबारी पोहोचवणारे पत्रकार लोकशाहीचा खरा आधारस्तंभ आहेत. मात्र, हे करत असताना त्यांना अनेकदा टीका, धमक्या आणि उपेक्षा सहन करावी लागते.

अशा या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा सन्मान करणे, हे समाजाचे कर्तव्यच आहे. आस्था महिला मंडळाच्या संवेदनशील भगिनींनी हे कर्तव्य ओळखत, निस्वार्थ भावनेने पत्रकारांचा गौरव करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

२९ जानेवारी २०२५ रोजी एरंडोल येथे आस्था महिला मंडळाने शहरातील पत्रकारांचा पुष्पगुच्छ व लेखणी भेट देऊन सत्कार केला. हा सोहळा केवळ औपचारिकता नव्हती, तर पत्रकारांच्या योगदानाची जाणीव ठेवणाऱ्या समाजाचा कृतज्ञतेचा अभिवादन सोहळा होता. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात कोणताही गाजावाजा नव्हता. प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता हा सन्मान अत्यंत साध्या आणि आत्मीयतेने पार पडला.

या कार्यक्रमाला आमदार अमोल पाटील यांच्या धर्मपत्नी मृणालिनीताई पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थानी ॲड. मोहन शुक्ला होते. यावेळी नंदा शुक्ला यांनी पत्रकारांच्या कार्याबद्दल हृदयस्पर्शी कविता सादर केली, जी प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा साळी यांनी केले, तर प्रास्ताविक शितल चौधरी यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आस्था महिला मंडळाच्या अध्यक्षा आरती ठाकूर, उपाध्यक्षा नंदा शुक्ला, शोभा साळी, शकुंतला अहिरराव, चंद्रकला जैन, शितल चौधरी, भारती साळुंखे आणि इतर महिला पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सन्मान स्वीकारताना उपस्थित पत्रकारांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे भाव स्पष्टपणे झळकत होते. समाजातील घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या या पत्रकारांना असा सन्मान मिळणे, हे त्यांच्या परिश्रमाची खरी पोचपावती होती.

आजच्या काळात समाजकार्य केवळ प्रसिद्धीसाठी केले जाते, मात्र आस्था महिला मंडळाच्या भगिनींनी निस्वार्थपणे पत्रकारांचा सन्मान करून समाजसेवेचा खरा अर्थ साऱ्यांसमोर उलगडला आहे. त्यांच्या या कार्याला मनःपूर्वक अभिवादन!

सन्मान शब्दांत नसतो, तो कृतीत असतो!

© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !