संघर्षातून यशाकडे: प्रभाकर कासार यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास"
"संघर्षातून यशाकडे: प्रभाकर कासार यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास"
प्रभाकर कासार हे आपल्या देशासाठी कार्य करणारे आणि भारतीय तंत्रज्ञानाला जागतिक स्तरावर नेणारे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी आपल्या मेहनतीने आणि कौशल्याने देशाचा सन्मान वाढवला आहे. पुण्यातील NCRA (आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था) अंतर्गत जगप्रसिद्ध GMRT प्रकल्पात टेक्निकल ऑफिसर म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे."
२५ मे १९७१ रोजी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील आसनखेडा या छोट्या गावात प्रभाकर कासार यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण खडतर परिस्थितीत गेले. वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय आणि आईचा कासारी व्यवसाय कुटुंब चालवण्यासाठी पुरेसा नव्हता, पण मुलांच्या शिक्षणासाठी वडिलांनी विशेष कष्ट घेतले. परिस्थिती हलाखीची असली तरी शिक्षणासाठी घरातील जिद्द कायम होती.
प्रभाकर यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. पुढे पाचोऱ्यातील श्री गो. से. हायस्कूलमध्ये त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि चांगले गुण मिळवून परीक्षा उत्तीर्ण झाले. वडिलांच्या प्रेरणेतून त्यांनी जळगावच्या ITI संस्थेत फिटर ट्रेडचे शिक्षण घेतले. त्यांची गुणवत्ता आणि मेहनतीचे फळ त्यांना लवकरच मिळाले. फिलिप्स इंडिया लिमिटेड, पुणे येथे त्यांची NCTVT प्रशिक्षणासाठी निवड झाली. शिक्षण घेताना त्यांनी बजाज ऑटो लिमिटेड आणि पथेजा फोर्जिंग अँड स्टॅम्पिंग लिमिटेडसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये कामाचा अनुभवही घेतला. याच काळात त्यांनी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगही पूर्ण केले.
१९९५ साली GMRT प्रकल्पासाठी यांत्रिक तंत्रज्ञ या पदासाठी जाहिरात निघाली, ज्यामध्ये प्रभाकर यांनी लेखी व तोंडी परीक्षा उत्तीर्ण केली आणि प्रकल्पाचा भाग झाले. या प्रकल्पात ३० रेडिओ टेलिस्कोपच्या डिझाइन, विकास आणि सुधारणांसाठी त्यांनी आपले योगदान दिले. त्यांच्या या प्रकल्पात काम करणाऱ्या शास्त्रज्ञामुळे व त्यांच्या ग्रुपच्या कार्यकुशलतेमुळे प्रकल्पाला जागतिक मान्यता मिळाली, आणि त्यांना सातत्याने पदोन्नती मिळत गेली व ते आता या GMRT प्रकल्पात यांत्रिक विभागात टेक्निकल ऑफिसर या क्लास वन ऑफिसर पदावर कार्यरत आहेत.
१९९५ साली मनिषा यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात स्थैर्य आले. मनिषा यांनी वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला कॅलेंडर, डायरी आणि इलेक्ट्रिकल वस्तूंच्या डीलरशिपपासून सुरुवात करून त्या आज १७ नामांकित कंपन्यांच्या वितरक झाल्या आहेत. या व्यवसायात प्रभाकर यांचा पाठिंबा त्यांना नेहमीच मिळाला.
प्रभाकर कासार यांचा जीवनप्रवास संघर्ष, जिद्द आणि ध्येयासक्तीचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी जिथे जन्म घेतला ती परिस्थिती बदलत त्यांनी स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. शिक्षणासाठी घेतलेले कष्ट, कामासाठी दिलेली निष्ठा आणि देशासाठी काहीतरी भरीव करण्याची जिद्द यामुळे ते आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत अजुनही ते पुढे शिक्षण घेत असुन त्यांच्या नावापुढे Dr ही पदवी PHD करुन रिटायर्ड होण्यापूर्वी लावण्याची त्यांची इच्छा आहे, त्यांनी भाषण तंत्रज्ञानात RPTS इन्स्टिट्यूट विमान नगर पुणे येथे मास्टरी पुर्ण केली असून नुकतेच या इन्स्टिट्यूट मध्ये कोच म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले असून ते आता कोच म्हणून ऑन लाईन काम करत आहेत.
त्यांचे जीवन म्हणजे स्वप्नांवर विश्वास ठेवून कठोर परिश्रमाने ते साध्य करण्याचा संदेश देणारी कथा आहे. नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी प्रभाकर कासार यांचे जीवन हे दीपस्तंभासारखे आहे.
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा