त्यागमूर्ती भिका आनंदा जाधव आणि लक्ष्मी मायची प्रेरणा
त्यागमूर्ती भिका आनंदा जाधव आणि लक्ष्मी मायची प्रेरणा
गोजरे, तालुका भुसावळ येथील अगदी साध्या आणि सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले भिका आनंदा जाधव. त्यांच्या आयुष्यात सुखाचं निधान असं फारसं काही नव्हतं. लहान वयातच त्यांचे वडील देवाघरी गेले, आणि त्यांच्या कुटुंबावर दु:खाचं मळभ पसरलं. वडील मेकॅनिकल होते, पण त्यांच्या निधनानंतर घराची सर्व जबाबदारी लक्ष्मीबाई म्हणजेच लक्ष्मी माय यांच्या खांद्यावर आली.
लक्ष्मी माय... खरंच, त्या फक्त नावानेच नव्हे तर त्यांच्या कार्यानेही घरची ‘लक्ष्मी’ होत्या. चार मुली आणि दोन मुलं यांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांनी न थकता उचलली. परिस्थितीची कुठलीही तमा न बाळगता, त्यांनी लोकांच्या घरी धुणी-भांडी करून संसाराचा गाडा हाकला. मुलांच्या भविष्याचा विचार करत त्यांनी दिवस-रात्र एक केली. ना कधी थकवा, ना कधी तक्रार, फक्त मुलांच्या सुखाचं स्वप्न आणि ते पूर्ण करण्याची अमर्याद इच्छाशक्ती!
आईची ही संघर्षमय कहाणी पाहून बालपणीच भिका यांच्या मनात एक उमेद जागी झाली. त्यांनी ठरवलं की, घरची प्रगती करायची असेल आणि आईच्या कष्टांचं पांग फेडायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यांनी लहानपणापासूनच आईच्या कष्टांची जाणीव ठेवत शिक्षणाला प्राधान्य दिलं. अनेक अडचणींवर मात करत, स्वकर्तृत्वावर त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि अखेर महावितरण विभागात नोकरी मिळवली.
फक्त स्वतःपुरताच विचार न करता त्यांनी कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलली. त्यांच्या विधवा आत्या देखील त्यांच्याकडेच राहायच्या, त्यांची मुलीही त्यांच्या जबाबदारीत आल्या. त्यांनी त्यांचं संगोपन केलं, त्यांना शिकवलं आणि योग्य वयात त्यांचे विवाह लावून दिले. एका मोठ्या कुटुंबाची काळजी घेत त्यांनी आयुष्यभर कष्टाची शिकवण पाळली.
भिका जाधव यांच्या स्वभावातली शांतता, संयम आणि प्रामाणिकपणा ही त्यांच्या संघर्षाची आणि त्यागाची साक्ष देतात. गरिबीला जवळून पाहिलेल्या या व्यक्तिमत्त्वाने आयुष्यभर प्रामाणिकपणाची वाट धरली. त्यांच्या संस्कारांचा प्रभाव त्यांच्या मुलांवरही स्पष्टपणे जाणवतो. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलंही प्रामाणिकतेची वाट चालत आहेत.
विशेषत: त्यांचा मुलगा राहुल जाधव, जो सध्या इंदिरा कन्या माध्यमिक विद्यालय, धरणगाव येथे कार्यरत आहे. तोही वडिलांसारखाच निष्ठावान आणि कर्तव्यनिष्ठ आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच माणुसकीची आणि प्रामाणिकपणाची शिकवण देत तो आपलं कर्तव्य पार पाडत आहे.
भिका आनंदा जाधव यांच्या आयुष्याची कहाणी म्हणजे त्याग, संघर्ष, आणि प्रेमाची हृदयस्पर्शी गाथा आहे. आईच्या कष्टांना सोनं करण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणाची वाट धरली. आईच्या कष्टांची फेड करणं, कुटुंबाला उभं करणं आणि मुलांना योग्य संस्कार देणं यातच त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं.
लक्ष्मी मायांची त्यागमयी मातृत्वाची कहाणी आणि भिका आनंदा जाधव यांची संघर्षमय वाटचाल हे समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी शिकवलेली प्रामाणिकतेची शिकवण त्यांच्या मुलांना पुढे नेत आहे. त्याग, प्रेम, आणि संघर्षाची ही गाथा नेहमीच मनाला भावेल, प्रेरणा देईल.
त्यागमूर्ती भिका आनंदा जाधव आणि लक्ष्मी माय यांना साश्रू नमन! ते शंभर वर्षा पासून धरणगाव येथे वास्तव्याला आहेत.
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा