"त्यांच्यासाठी तुम्ही नेहमीच लहानच राहाल…"


"त्यांच्यासाठी तुम्ही नेहमीच लहानच राहाल…"

शब्द कितीही मोठे झाले, व्यक्त होण्याचे मार्ग कितीही बदलले, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात पोहोचलात तरी त्यांच्या डोळ्यांत तुम्ही आजही तेच लहान मूल आहात, जे पहिल्यांदा त्यांच्या हातात आलं होतं… जे त्यांच्या कुशीत शांत झोपायचं, त्यांच्या आवाजाने हसायचं, त्यांच्या सहवासात वाढायचं…

त्यांनी तुमच्या लहानग्या बोटांना धरून पहिलं पाऊल टाकायला शिकवलं. तुमच्या पहिल्या शब्दाने ते भारावले, तुमच्या पहिल्या हसण्याने ते हरखले, आणि पहिल्या धडपडीत त्यांचं काळीज थरारलं.

आज तुम्ही मोठे झालात, जबाबदाऱ्या स्वीकारल्या, आयुष्यात पुढे निघून गेलात. पण त्यांच्यासाठी? त्यांच्या हृदयात? तुम्ही अजूनही तोच नाजूक जीव आहात, ज्याला लागलं तर धावत जाऊन उचलावं, ज्याला रडताना पाहून आपलं काळीज तुटावं, आणि ज्याचं हसू पाहून आपल्या जगण्याला अर्थ मिळावा…

तुमच्या हाकेची वाट पाहणारे आजही तेच आहेत. फोन वाजला तरी धडधडत्या हृदयाने तुमचं नाव पाहतात, तुमचा आवाज ऐकला की क्षणभर त्यांच्या सगळ्या वेदना विसरतात. तुम्ही ‘आलोच’ एवढंच म्हटलं तरी त्यांच्या डोळ्यांत समाधानाची चमक येते.

आता तुमचं आयुष्य वेगळ्या वाटांवर चाललंय. तुम्ही जबाबदारीने व्यस्त आहात. पण त्यांच्या मनाचं काय? त्यांना कधी वाटतं, तुम्ही पुन्हा एकदा छोटं व्हावं… त्यांच्यासोबत जुन्या आठवणींत रमावं… त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणावं, "आई, बाबा, मला पुन्हा तुमच्या कुशीत झोपायचंय…"

कधीतरी थांबा… मागे वळून पहा… त्या डोळ्यांतलं प्रेम बघा. ते तुमच्यासाठी जगले, तुमच्यासाठी थांबले, आणि अजूनही तुमच्यासाठीच धडपडत आहेत. आजही तुम्ही कुठे उशिरा घरी आलात तर त्यांना झोप लागत नाही, आजही तुम्हाला काही त्रास झाला की त्यांचे डोळे पाणावतात, आजही ते तुमच्यासाठी देवासमोर हात जोडतात.

त्यांच्यासाठी तुम्ही मोठे होणार नाही… कारण त्यांच्यासाठी तुम्ही नेहमीच तेच छोटं मूल राहणार आहात. आणि तेव्हा तुम्ही समजून घ्याल, की कोणत्याही वयात, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही उंचीवर पोहोचलात तरी, एका जागी तुमचं बालपण अजूनही जिवंत आहे… आणि ती जागा म्हणजे "आई-बाबांचं हृदय!"

© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !