बाप – त्यागाची सावली !

बाप – त्यागाची सावली !

"बाबा, तुम्ही माझ्यासाठी काय केलं?"
हा प्रश्न विचारायची वेळ कधीच येऊ नये, कारण ज्या क्षणी आपण स्वतः कमावायला लागतो, त्या क्षणीच उत्तर मिळतं. लहानपणी आपल्या डोक्यावर असलेली त्याची सावली आपल्याला फक्त सुरक्षिततेची जाणीव करून देते, पण त्या सावलीमागचं झळाळतं ऊन आपल्याला कधीच दिसत नाही.

बाप म्हणजे काय असतं, हे त्याच्या आयुष्यभराच्या संघर्षाच्या प्रत्येक पावलांमध्ये दडलेलं असतं. घरातली सुखसोयी, शाळेची फी, कपडे, खेळणी, जेवण, औषधं – या सगळ्या गोष्टी सहज मिळतात असं वाटतं, पण त्यासाठी बापाने स्वतःच्या गरजा किती वेळा नाकारल्या असतील, याचा आपण विचारच करत नाही.

लहानपणी आपण हट्टाने काहीतरी मागतो, आणि ते आपल्याला मिळतं. पण कधी विचार केला का, की ते आणताना बापाने स्वतःसाठी काही घेतलं का? आपल्या आनंदासाठी त्याने स्वतःच्या गरजा किती वेळा बाजूला ठेवल्या असतील?

बाजारात गेल्यावर आपण महागड्या वस्तू निवडतो, पण आपला बाप नेहमी स्वस्त वस्तू घेतो. आपण पावसाळ्यात छानसं छत्री घेऊन हिंडतो, पण आपला बाप ओले कपडे घालून घरी पोहोचतो. आपण थंडीच्या दिवसात गरम ब्लँकेटमध्ये झोपतो, पण आपला बाप त्याच जुन्या गोधडीवर रात्र काढतो. आपल्याला कधी जाणवतं का, की बापही थंडी, ऊन, पाऊस याला बळी पडतो?

बापाला कधीच विश्रांती नसते. तो कधीच थकत नाही, कारण त्याच्यासाठी विश्रांती म्हणजे आपल्या लेकरांच्या चेहऱ्यावर हसू पाहणं. तो स्वतःच्या वेदना, दुःख, चिंता कधीच बोलून दाखवत नाही, कारण त्याला फक्त एकच ध्येय असतं – आपल्या मुलांचं सुख.

पण एक दिवस घरातला आवाज बंद होतो.
त्याच्या चहाच्या कपासमोर कोणी बसत नाही.
त्याच्या खोकल्याचा आवाज ऐकू येत नाही.
त्याची पायरीतली चप्पल तशीच पडलेली असते.
आणि तेव्हा जाणवतं – बाप काय असतो!

तो जाईपर्यंत त्याला समजून घ्या.
तो जिवंत असेपर्यंत त्याला प्रेम द्या, त्याच्यासाठी वेळ द्या.
कारण एक दिवस तो भेटणार नाही, बोलणार नाही, आणि तेव्हा तुम्ही त्याला कितीही साद घातली तरी… तो उत्तर देणार नाही...!

© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !