आई-वडिलांचे ऋण: प्रेमाची परतफेड अपुरीच राहते...


आई-वडिलांचे ऋण: प्रेमाची परतफेड अपुरीच राहते...

आई-वडील… हे दोन शब्द उच्चारले तरी मन एक वेगळ्याच भावनेत हरवून जाते. त्यांच्या अस्तित्वाशिवाय आपलं काहीही अस्तित्व नाही. जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत आई-वडील आपल्या लेकरांसाठी झटत असतात. आईच्या वात्सल्याच्या सावलीत आणि वडिलांच्या कष्टाच्या आधारावरच लेकरं मोठी होतात. आईच्या कुशीत लहानाचे मोठे झालेल्या मुलांना तिच्या मायेचा गंध आयुष्यभर विसरता येत नाही. वडिलांच्या जबाबदारीच्या छायेत वाढलेला मुलगा मोठा होऊन स्वतःच्या पायावर उभा राहतो, पण कधी कधी त्याला हेच विसरायला होतं की, ज्यांनी त्याला चालायला शिकवलं, त्यांनी आता त्याच्या आधाराची गरज आहे.

आई म्हणजे त्याग, माया आणि प्रेम यांचं मूर्त स्वरूप. तिचं संपूर्ण आयुष्य मुलांसाठीच समर्पित असतं. ती स्वतःच्या वेदना मनात दडवते, स्वतःच्या सुखाचा विचार न करता लेकरांच्या भविष्यासाठी झटत राहते. तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागे कितीही अश्रू असले, तरी ती मुलांसमोर कधीही व्यक्त करत नाही. मुलांच्या यशातच तिला समाधान मिळतं आणि त्यांच्या दुःखात तिचं मन तुटून जातं.

वडील म्हणजे एक आधारस्तंभ. ते कधी स्वतःसाठी जगत नाहीत. त्यांचं प्रत्येक पाऊल मुलांच्या उज्वल भविष्यासाठी असतं. स्वतःच्या इच्छांचा त्याग करून ते आपल्या कुटुंबासाठी राबत राहतात. उन्हातान्हात कष्ट करत घर सांभाळणारे वडील स्वतःच्या थकव्याकडे कधी लक्ष देत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता कधी दिसत नाही, कारण त्यांच्या मनात फक्त मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठीची आस असते.

आई-वडिलांनी आपल्यासाठी जे काही केलं, त्याची परतफेड करणं केवळ अशक्य आहे. त्यांनी दिलेल्या संस्कारांची, त्यांच्या प्रेमाची किंमत कधीच मोजता येणार नाही. त्यांनी पोटच्या लेकरासाठी दिवस-रात्र झिजणं हे त्यांच्यासाठी स्वाभाविक असतं, पण त्यांच्या ऋणांची जाणीव ठेवणं हे मात्र मुलांसाठी अत्यंत आवश्यक आहे.

मुलं मोठी झाली की, त्यांच्या जबाबदाऱ्या वाढतात. करिअर, संसार, नोकरी यामध्ये त्यांना आई-वडिलांकडे पाहायला वेळ मिळत नाही. लहानपणी ज्या आई-वडिलांनी आपल्या हाका ऐकून धाव घेतली, त्यांच्या हाकेला आपण वेळ देऊ शकत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. काही मुलं तर वृद्धापकाळी आई-वडिलांना घरातूनही दूर करतात. त्यांना वृद्धाश्रमात पाठवून मोकळे होतात. पण त्यांना हे समजत नाही की, ज्या हातांनी त्यांना उभं केलं, त्या हातांना आता त्यांच्या आधाराची गरज आहे.

आई-वडिलांना मोठ्या गोष्टींची अपेक्षा नसते. त्यांना मुलांचा प्रेमळ स्पर्श हवा असतो. त्यांनी केलेल्या कष्टाची जाणीव असणारी दोन मृदू शब्दं त्यांच्यासाठी सर्वस्व असतात. रोज एक फोन करणं, त्यांच्यासोबत काही वेळ घालवणं, त्यांच्या भावना समजून घेणं – हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं समाधान असतं.

आई-वडिलांच्या ऋणांची परतफेड करणं शक्य नाही, पण त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांना प्रेमाने सन्मान देणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. त्यांच्या आयुष्याचा शेवट आनंदाने घालवणं, त्यांना सुखाने जगू देणं हीच खरी कृतज्ञता आहे. आपल्या यशाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या त्यागाचा आणि आशीर्वादाचा वाटा आहे, हे लक्षात ठेवून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणं हेच खऱ्या अर्थाने त्यांच्या ऋणाची परतफेड आहे.

कारण शेवटी आपण कितीही मोठे झालो, तरी आईच्या डोळ्यांत आपण लहानच असतो, आणि वडिलांच्या मनात आपण त्यांचं स्वप्न असतो...

© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !