आई : देवाने दिलेली जिवंत माया !
आई : देवाने दिलेली जिवंत माया !
"देव प्रत्येकाच्या सोबत राहू शकत नव्हता, म्हणून त्याने आई निर्माण केली." या एका वाक्यात संपूर्ण सृष्टीचा सारांश सामावलेला आहे. आई ही केवळ जन्म देणारी स्त्री नाही, ती एक अशी शक्ती आहे जी आपल्या मायेने, त्यागाने आणि अथक परिश्रमाने संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवते. जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या जीवनातील सर्वोच्च स्थान असणारी व्यक्ती म्हणजे आई.
बाळाच्या जन्मापासून ते त्याच्या संपूर्ण जीवनप्रवासात आई त्याचा पहिला आधारस्तंभ असते. तिचं हसू म्हणजे बाळासाठी सुरक्षिततेची जाणीव असते, तर तिचे अश्रू म्हणजे काळजी आणि अपार प्रेमाची साक्ष असते. ती बाळाला चालायला शिकवते, त्याच्या पहिल्या शब्दांसाठी त्याला प्रेरित करते आणि त्याचं आयुष्य घडवण्यासाठी स्वतःच्या अस्तित्वाचा संपूर्ण त्याग करते.
आईच्या प्रेमाची खोली मोजता येणार नाही, तिच्या त्यागाचं वर्णन करता येणार नाही. एक नवजात बालक स्वतःच्या जन्माच्या वेदना विसरून फक्त आईच्या कुशीत विसावतो. ती त्याच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवते, त्याच्या प्रत्येक इच्छेला समजून घेते आणि त्याला काही कमी पडू नये यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करते. रात्रीचा गाढ झोपलेला संसार सांभाळत ती मात्र एका लहानशा आवाजाने जागी होते. तिच्या आयुष्यात स्वतःसाठी काहीही नसतं, पण मुलांसाठी तिच्याकडे असतो मायेचा अथांग सागर.
एकदा एक मुलगा आपल्या आईला विचारतो, "आई, तू मला एवढं का सांभाळतेस?" त्यावर आई हसून उत्तर देते, "बाळा, तुज्यासाठी काही करावं लागत नाही, ते आपोआप होतं, कारण तू माझं जग आहेस!" आईसाठी तिचं मूल म्हणजे तिच्या जगण्याचा अर्थ असतो. ती स्वतःच्या शारीरिक वेदना, थकवा, कष्ट या सगळ्या गोष्टी विसरून केवळ मुलाच्या आनंदासाठी झटते.
काही लोक म्हणतात की, देवाने आईला स्वतःच्या रुपात पाठवलं आहे. कारण जिथे आई आहे, तिथे देवाचा आशिर्वाद आहे. जन्मानंतर पहिल्या क्षणी बाळ ज्या स्पर्शाला ओळखतं तो आईचा असतो. संकटात असताना पहिलं नाव घेण्याची गरज वाटते ती आईचीच. आणि दुःखात असताना आपल्याला जेव्हा आधार हवा असतो, तेव्हा आईचं प्रेमच पुरेसं असतं.
जीवनाच्या कोणत्याही वळणावर आई आपल्या मुलासाठी सदैव उभी असते. छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिने केलेला संघर्ष आपण कधीच विसरू शकत नाही. एका मुलाने विचारलं, "आई, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद कोणता?" आई म्हणाली, "बाळा, तुझं यश हेच माझं सर्वात मोठं समाधान आहे." आईने आपलं संपूर्ण आयुष्य मुलांसाठी समर्पित केलेलं असतं, त्यांचं सुख, त्यांचं यश हेच तिचं सर्वस्व असतं.
आईच्या प्रेमाची तुलना कुठल्याही गोष्टीशी करता येत नाही. जीवनातील कोणती ही कठीण परिस्थिती असो, संकट असो, आई नेहमी आपल्या मुलासोबत असते. जेव्हा जग आपल्यावर विश्वास ठेवत नाही, तेव्हा आई मात्र आपल्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवते.
कोणत्या ही वयात, कोणत्या ही परिस्थितीत, आपण किती ही मोठे झालो, तरी आई शिवाय आयुष्य अपूर्णच वाटतं. तिच्या मायेची सावली आपल्यावर असते, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने सुरक्षित असतो. एक दिवस जरी तिच्याशी नीट बोलायला वेळ दिला नाही, तरी मनात अपराधी भावना राहते. कारण तिला खूप काही सांगायचं असतं, खूप काही ऐकायचं असतं, पण आपण व्यस्त होतो.
आपल्यासाठी सर्वस्व गमावणाऱ्या आईला आपण काय देऊ शकतो? तिला फक्त आपल्या प्रेमाची, आपुलकीची आणि काळजीची गरज असते.
आईच्या महत्त्वाची जाणीव फक्त एखाद्या दिवसापुरती मर्यादित न ठेवता, आयुष्यभर तिच्या प्रेमाची आणि त्यागाची कदर करावी. तिच्यासाठी वेळ द्यावा, तिचं कौतुक करावं आणि तिच्या डोळ्यांत कधीच अश्रू येऊ द्यायचे नाहीत.
कारण "आई आहे, म्हणून आपण आहोत!"
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा