शास्त्री फार्मसी महाविद्यालयात शिवस्वराज्याचा जागर – राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धेने भरले अभिमानाचे रंग


शास्त्री फार्मसी महाविद्यालयात शिवस्वराज्याचा जागर – राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धेने भरले अभिमानाचे रंग

शूरवीरांचा गजर, रणझुंजारांचा जयघोष आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा…! अशा उत्साही वातावरणात शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, पळसदळ-एरंडोल येथे दि.19 फेब्रुवारी 2025 रोजी शिवजयंतीचा सोहळा थाटात साजरा झाला. छत्रपतींच्या शौर्यगाथेला उजाळा देणाऱ्या राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धेने या सोहळ्याला एक वेगळेच तेज प्राप्त झाले.

स्वराज्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या शिवरायांना मानाचा मुजरा करत या भव्य सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. एरंडोल मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दादासो अमोल चिमणरावजी पाटील, युवासेनेचे जिल्हाप्रमुख श्री.मनोजदादा पाटील (पेहलवान), डी. डी. एस. पी. महाविद्यालयाचे अध्यक्ष दादासो अमित पाटील, माजी नगराध्यक्ष श्री. रमेशसिंग परदेशी, माजी नगरसेवक दादासो डॉ.सुरेश पाटील आदी मान्यवरांनी आपल्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांना भारावून टाकले.

सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाआरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि क्षणात वातावरण शिवमय झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या स्पर्धकांनी आपल्या ओजस्वी सादरीकरणातून शिवरायांचा पराक्रम उभा केला. प्रत्येक शब्दागणिक, प्रत्येक आवाजी सुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षाची, पराक्रमाची आणि ध्येयधुंद चळवळीची अनुभूती प्रत्येकाच्या काळजात उतरली.

अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत महात्मा गांधी कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, यावलचे महेश सपकाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. जळगाव शासकीय फार्मसी महाविद्यालयाचे अनिकेत तुपे द्वितीय, तर आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालय, शिरपूरच्या कल्याणी बोरसे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. शिवाय खेमचंद पाटील, ऐश्वर्या पाटील आणि विधी पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

या वेळी आमदार दादासो अमोल चिमणरावजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. "श्रीमान योगी" या ग्रंथाच्या वाचनाचा सल्ला देत, त्यातील शिकवणी आपल्या आयुष्यात उतरण्याचा संदेश दिला. प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी शिवरायांची शिस्त आणि ध्येयनिष्ठा कशी उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली ठरू शकते, यावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या मा. सचिव सौ. रूपा शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नियोजन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा शिवदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. योगेश्वरी लोहार यांनी मानले. उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी, प्रा. जावेद शेख, प्रा. मंगेश पाटील, प्रा. राहुल बोरसे आदी शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.

हा सोहळा केवळ पोवाड्यांची स्पर्धा नव्हती, तर हा होता छत्रपतींच्या विचारांचा जागर, त्यांच्या प्रेरणेचा नवा उजाळा! शास्त्री फार्मसी महाविद्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या या शिवसंवाद सोहळ्याने उपस्थित प्रत्येकाच्या हृदयात शिवरायांचे तेज पुन्हा एकदा चेतवले!


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !