एक गुरुजी… ज्यांनी आयुष्य घडवलं!
एक गुरुजी… ज्यांनी आयुष्य घडवलं!
गुरुजी… हा शब्द उच्चारला तरी आपल्या डोळ्यासमोर ज्ञानदान करणारा, योग्य दिशा दाखवणारा, प्रेमळ आणि विद्यार्थ्यांचा हितचिंतक असा चेहरा उभा राहतो. पण काही गुरुजी असे ही असतात, जे केवळ शिक्षण देणारे नसतात, तर विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणारे असतात. अशाच एका असामान्य पण अतिशय साध्या व्यक्तिमत्त्वाच्या शिक्षकाची ही कथा, स्वर्गीय दगडू ज्योतीराम हतागळे गुरुजी – एक असा दिवा, जो स्वतःच्या प्रकाशाने केवळ स्वतःच उजळला नाही, तर इतरांनाही उजळवून गेला.
गरीब घर, हातमजुरी करणारे वडील, संसाराचा गाडा ओढणारी आई, आणि परिस्थितीच्या प्रत्येक झळेला सामोरा जाणारा एक मुलगा. त्या लहान वयातच त्यांना उमगलं होतं की गरिबीवर मात करायची असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. घरची परिस्थिती एवढी हलाखीची होती की शाळेच्या पायरीवर पाऊल ठेवणं ही कठीण होतं. पण या मुलाने हार मानली नाही.
मागासवर्गीय मांग-गारुडी या समाजात जन्म, त्यामुळे समाजाच्या टोकाच्या वागणुकीला सामोरे जाण्याची सवयच झाली होती. पण हतबल न होता, अपमान झेलत, परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. आणि एक दिवस असा आला, जेव्हा ते हतागळे गुरुजी म्हणून परिचित झाले.
गुरुजींनी कधीच केवळ एक शिक्षक म्हणून काम केलं नाही. ते विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचं घर बनले. ते शिक्षक होते, मार्गदर्शक होते, आधार होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आई-वडिलांसारखे मायेने वागणारे होते. विद्यार्थ्यांनी चुका केल्या तरी शिक्षा देणारे नव्हते, तर त्या चुका सुधारून त्यांना पुढे जाण्याचा रस्ता दाखवणारे होते.
त्यांचा शिकवण्याचा स्वभाव गोड, वागणूक सौम्य आणि दृष्टिकोन समजूतदार. त्यामुळे शाळेतला प्रत्येक विद्यार्थी त्यांच्याकडे मुक्तपणे जाऊ शकायचा. आर्थिकदृष्ट्या मागासलेला कोणता ही विद्यार्थी त्यांच्या दारातून उपेक्षित परत जात नसे.
गुरुजींच्या जाण्यानंतर ही त्यांचा वारसा तसाच जिवंत आहे. त्यांचे चिरंजीव आनंद हतागळे, वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत आजही ज्ञानदानाचं कार्य पुढे नेत आहेत. वडिलांसारखीच साधी राहणी, प्रेमळ स्वभाव, आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा, यामुळे लोक आजही म्हणतात, "हतागळे गुरुजी गेले नाहीत, ते आजही आपल्यात आहेत."
आनंद हतागळे हे आज पंचायत समिती, धरणगाव येथे कार्यरत आहेत. त्यांनी वडिलांच्या संस्कारांचा वारसा पुढे नेला आहे. जसे गुरुजी समाजाच्या शेवटच्या घटकाला शिक्षण मिळावे म्हणून झटले, तसेच आनंद हतागळे समाजाच्या उन्नतीसाठी आपल्या सेवेत मग्न आहेत. वडिलांच्या शिकवणुकीचा वारसा जपणाऱ्या आनंद हतागळे यांच्यात लोकांना हतागळे गुरुजींचीच छबी दिसते.
आजही अनेक विद्यार्थी गुरुजींना आठवून डोळ्यात पाणी आणतात. त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळे कित्येक विद्यार्थ्यांचं आयुष्य उजळलं. एका गरीब घरातून आलेल्या एका मुलाने, स्वतःच्याच नव्हे, तर कित्येक पिढ्यांच्या जीवनाचा प्रकाश बनून राहणं, हेच त्यांचं खरं यश होतं.
गुरुजी गेले, पण त्यांची शिकवण, त्यांची माया, आणि त्यांची आठवण कायम राहील. ते आजही विद्यार्थ्यांच्या मनात आहेत… गुरुजींची एक शिकवण… आयुष्यभर पुरेल.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा