पंख मुलांचे… बलिदान बापाचे
पंख मुलांचे… बलिदान बापाचे!
रस्त्यावरून चालणारा एक वृद्ध माणूस, अंगावर जुने कपडे, फाटकी चप्पल, चेहऱ्यावर वर्षानुवर्षे सोसलेल्या कष्टांचे ठसे आणि डोळ्यांत अनामिक शांतता... कोणी विचारणारही नाही, कोणाला त्याच्या अस्तित्वाची जाणीवही नाही. पण त्याच्या हातात एक जुनी बॅग आहे, ज्यात काही कागदपत्रे आणि एक फोटो ठेवलेला आहे—त्याच्या मुलाचा फोटो. त्या फोटोकडे बघत तो मनात पुटपुटतो, "माझा मुलगा मोठा झाला... मोठा अधिकारी झाला... आता त्याला माझी गरज नाही."
हा फक्त एक किस्सा नाही, तर हजारो बापांच्या आयुष्याची शोकांतिका आहे. प्रत्येक यशस्वी मुलाच्या पंखांना बापाच्या बलिदानांची ताकद असते. त्या बलिदानाची किंमत फार उशिरा लक्षात येते, कधी कधी तर आयुष्यभर कळतही नाही.
बापाची कहाणी – त्याच्या ओठांवर नाही, पण हातांच्या फटीत आहे!
बाप म्हणजे काय? तो एक झाड आहे, जे स्वतः उन्हात जळते, पण सावली मुलांना देते. बाप म्हणजे ते पाऊस आहे, जो स्वतः रडतो, पण त्याचा प्रत्येक थेंब मुलांसाठी असतो. तो एक नदी आहे, जी कधीच थांबत नाही, पण प्रत्येक प्रवाह मुलांच्या सुखासाठी वाहतो.
एका गरीब घरात जन्मलेला मुलगा, ज्याला शिकायचंय, मोठं व्हायचंय… पण त्याचा बाप रोज सकाळी उठतो, कुदळ-फावडं घेऊन माळरानावर जातो, उन्हातान्हात राबतो. बापाला स्वतःच्या पायात चप्पल नाही, पण त्याला त्याच्या मुलाच्या पायात महागड्या बूट हवे आहेत. बापाच्या अंगावर जुना फाटलेला सदरा असतो, पण त्याला मुलांसाठी नवे कपडे घ्यायचे असतात. बापाच्या हाताच्या रेषा काळ्या पडलेल्या असतात, पण त्याला मुलांच्या हातात कलम द्यायचं असतं.
रोज राबून, स्वतःच्या इच्छांना गाडून, बाप मुलांसाठी जगतो. पण जेव्हा तीच मुलं मोठी होतात, समाजात नाव कमावतात, तेव्हा तोच बाप मागे पडतो. त्याला कुणी आठवतही नाही, त्याचं स्थान एका कोपऱ्यात जातं. ज्या हातांनी मुलांना उचलून घेतलं, तेच हात आता थरथरू लागतात. ज्या डोळ्यांनी मुलांच्या भविष्यासाठी स्वप्न पाहिली, तेच डोळे आता वाट पाहतात… एका भेटीची, एका मिठीची!
मुलांच्या भराऱ्या मागची अबोल कहाणी
एका मुलाला डॉक्टर करायचं स्वप्न बापाने पाहिलं. पण त्यासाठी पैसा कुठून आणायचा? गावातल्या लोकांकडून उसने पैसे घेतले. शेत विकलं, स्वतःचं घर गहाण ठेवलं. बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्रही काढून दिलं. रात्री झोप लागत नव्हती, लोकांच्या शिव्या, कर्जाचे डोंगर, सगळं सहन केलं… फक्त एकच इच्छा होती—मुलगा मोठा व्हावा.
मुलगा डॉक्टर झाला, मोठा झाला, शहरात गेला. बापाचं घर जुनं राहिलं, पण त्याने शहरात बंगला बांधला. बाप तिथे गेला, दारात उभा राहिला, पण आत बोलावणं आलं नाही. "बाबा, मी मिटींगमध्ये आहे... पुढच्या महिन्यात गावी आलो की भेटूया." एवढंच उत्तर मिळालं.
बाप पुन्हा गावाकडे परतला. त्या जुन्या घराच्या ओसरीवर बसून, पंख जड झालेल्या आपल्या मुलाचा फोटो हातात धरून, स्वतःलाच विचारत राहिला—"हेच का होतं माझ्या कष्टांचं फळ?"
कधी उशीर होतो… आणि मग केवळ पश्चात्ताप शिल्लक राहतो!
समाजात असे कितीतरी बाप असतात, जे मुलांच्या सुखासाठी स्वतःला हरवून बसतात. पण मुलं मात्र त्यांच्या जगण्यात बापाला विसरतात. बापाच्या बलिदानाची जाणीव फार उशिरा होते… कधी तो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असतो, कधी तो या जगातून निघून गेलेला असतो.
एक दिवस तोच मुलगा गावाला येतो, वडिलांना भेटायला… पण गावकरी सांगतात, "बाळा, तुझ्या बाबांनी खूप वाट पाहिली… पण आता ते नाहीत."
मुलगा घराच्या ओसरीवर बसतो, त्याच्या आठवणींचा भार त्याच्या काळजावर बसतो. वडिलांनी घेतलेल्या कर्जाच्या ओझ्याने वाकलेली ती पाठ, उन्हातान्हात जळालेला तो चेहरा, प्रेमाच्या झऱ्यासारखे ते डोळे… सगळं आठवतं, पण बाप मात्र नसतो!
तोच फोटो, जो बापाने जीवापाड जपला होता, तोच फोटो मुलाच्या हातात असतो. आता डोळ्यात अश्रू असतात, पण मिठी मारायला बाबा नसतो.
तुमच्या बाबांना "थोडं प्रेम" द्या, कारण उद्या फक्त आठवणी उरतील!
बाप काहीच मागत नाही… तो केवळ मुलांकडून थोडं प्रेम मागतो, थोडा वेळ मागतो, थोडं कौतुक मागतो. त्याला बंगला नको, गाडी नको, महागडे कपडे नकोत… फक्त एका वेळच्या भेटीत, "बाबा, तुम्ही खूप मोठं केलंत आमच्यासाठी," हे शब्द ऐकायला मिळाले तरी पुरे.
आजच बाबांकडे बघा, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता असेल, त्यांच्या डोळ्यांत तुमच्यासाठी हजारो स्वप्नं असतील. त्यांना मिठी मारा, त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवा, कारण उद्या कदाचित वेळ नसेल… आणि मग फक्त पश्चात्ताप उरेल!
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा