संस्कारांची अमर कथा: स्वर्गीय वाल्मीक गंगाराम सूर्यवंशी
संस्कारांची अमर कथा: स्वर्गीय वाल्मीक गंगाराम सूर्यवंशी
धरतीवर काही माणसं अशी येतात जी आपले संपूर्ण आयुष्य केवळ स्वतःसाठी नाही, तर आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि मातृभूमीसाठी समर्पित करतात. अशीच एक तेजस्वी आणि साधी, पण कर्तृत्ववान व्यक्ती म्हणजे स्वर्गीय वाल्मीक गंगाराम सूर्यवंशी.
फागणे गावातील एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील हातमजुरी करून घर चालवत, तर आईने ही कष्टाची वाट सोसली होती. गरिबीने घर वेढले असले तरी त्यांची स्वप्नं मोठी होती. "शिक्षणा शिवाय प्रगती नाही," हा विचार त्यांनी लहानपणीच मनाशी घट्ट केला होता.
शिक्षणाच्या वाटेवर त्यांनी एकाकी झुंज दिली. परिस्थितीने अनेक अडथळे आणले, पण त्यांच्या जिद्दीपुढे सर्व झुकले. शिक्षण चालू ठेवण्यासाठी त्यांनी कोणते ही काम करण्यास कमीपणा त्यांना वाटला नाही. मजुरीपासून दुकानातील मदतनीस म्हणून, शेतीकामापासून बांधकाम मजुरापर्यंत – जे मिळेल ते काम त्यांनी प्रामाणिकपणे केले. अखेरीस, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि आरोग्य खात्यात नोकरी मिळवली. साधी राहणी, प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ सेवाभाव यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाल्मीक सूर्यवंशी.
त्यांच्या मनात एक मोठे स्वप्न होतं – "माझी मुलं भारतमातेच्या सेवेत जावीत." हे स्वप्न त्यांच्या आयुष्याचा ध्यास बनलं होतं. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांमध्ये देशभक्तीचे संस्कार रुजवले. त्यांच्या त्या निस्वार्थ शिकवणीचा परिणाम असा झाला की दोन्ही पुत्र भारतमातेच्या सेवेसाठी समर्पित झाले.
त्यांचा थोरला मुलगा धनराज भारतीय लष्करात १८ वर्षे सेवा करून आता बँकेत कार्यरत आहे. देशासाठी झिजण्याची शिकवण त्याला पित्याकडूनच मिळाली होती आणि त्याने ती पूर्णतः आत्मसात केली. तर धाकटा मुलगा संजय SRPF ग्रुप ६ मध्ये कार्यरत राहून सध्या जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवेसाठी तत्पर आहे. समाजाच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या पोलीस दलातील हे कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या पित्याच्या निष्ठेचा आणि सचोटीचा वारसा पुढे नेत आहेत.
वाल्मीक सूर्यवंशी यांनी केवळ ६५ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी दिलेले संस्कार मात्र अजरामर राहिले. ज्या वडिलांचे स्वप्न होते की त्यांची मुले भारतमातेच्या सेवेत असावीत, त्यांचेच पुत्र आज त्या स्वप्नाला साकार करत आहेत.
कोण म्हणतो की माणूस मेल्यावर संपतो? खऱ्या अर्थाने तो आपल्या विचारांतून, संस्कारांतून आणि कार्यातून सदैव जिवंत राहतो.
आज ही जेव्हा फागणे गावात कुणी वाल्मीक सूर्यवंशींच्या मुलांचा प्रामाणिकपणा, सचोटी आणि कार्यनिष्ठा बघतो, तेव्हा सर्वांच्या तोंडून हेच शब्द निघतात
"अरे! हे बघा, हे ना वाल्मीक सूर्यवंशींची मुलं! वडिलांसारखं सरळ, प्रामाणिक आणि प्रखर देशभक्त!"
हीच तर खरी श्रद्धांजली आहे – एखाद्या व्यक्तीचा देह गेल्यावर ही तिचं अस्तित्व जिवंत राहणं!
वाल्मीक सूर्यवंशी हे आज त्यांच्या मुलांच्या रूपात जिवंत आहेत. त्यांच्यातील निष्ठा आणि प्रामाणिकपणा पाहूनच समजतं – त्यांचं आयुष्य यशस्वी होतं.
त्यांचा प्रवास संपला असेल, पण त्यांचे संस्कार अमर आहेत.
आयुष्यात पैसा, प्रसिद्धी, सत्ता हे क्षण भंगुर असतात, पण माणसाने दिलेले संस्कार आणि मूल्यं चिरंतन राहतात. स्वर्गीय वाल्मीक सूर्यवंशींनी आपल्या मुलांमध्ये जी निष्ठा आणि देशसेवेची भावना रोवली, ती कोणत्या ही काळात कधी ही नष्ट होणार नाही.
आज त्यांचे नाव जरी घेतले तरी मन अभिमानाने भरून येतं!
त्यांचे संस्कार काळाच्या ओघात ही अमर राहतील…
अशा महान व्यक्तींसाठी फक्त एकच शब्द – "दादासाहेबांना मानाचा मुजरा!"
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
मो.9370165997
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा