आई-वडिलांचे आशीर्वाद...!
आई-वडिलांचे आशीर्वाद...!
जीवनाच्या या धावपळीच्या प्रवासात आपण सतत काही ना काही मिळवण्यासाठी धडपडत असतो. पैसा, प्रतिष्ठा, सुखसोयी, ऐशोराम यांचा पाठलाग करत असताना कधी कधी आपण विसरतो की खरी संपत्ती ती नाही, जी उघड्या डोळ्यांनी दिसते. खरी संपत्ती ती आहे, जी मनाने जाणता येते, हृदयाने समजता येते. ती संपत्ती म्हणजे आई-वडिलांचे आशीर्वाद.
बाळाच्या पहिल्या हसण्याला ज्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू फुटतात, त्या डोळ्यांतूनच त्याच्या भविष्यासाठी रात्रीचा जागरही सुरू असतो. पहिलं पाऊल टाकताना जे दोन हात आधार देतात, तेच हात त्याला मोठं झाल्यावरही अडखळू नयेत म्हणून शुभेच्छांचा आणि आशिर्वादांचा आधार देतात. त्या हातांच्या उबेशिवाय हे जीवन अपूर्ण आहे.
आई-वडिलांचे प्रेम: एक अव्याहत झरणारा झरा
आई म्हणजे फुलांचा गंध. तिच्या मायेच्या स्पर्शातच जीवनाची खरी मधुरता असते. आई आपल्या लेकरासाठी काहीही करायला तयार असते. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांना भरवते, स्वतः अंधारात राहून त्यांना उजेड देते, स्वतःच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण त्यांच्या सुखासाठी वेचते. तिच्या कुशीत मिळणारं ते ऊबदार प्रेम जगातल्या कोणत्याही महालाच्या सौंदर्यापेक्षा अनमोल असतं.
वडील म्हणजे निसर्गासारखा निःस्वार्थी आधार. उन्हातान्हात राबून लेकराच्या भविष्यासाठी झिजणारा तो महामानव. चेहऱ्यावर कितीही कठोरपणा असला तरी मन मात्र मुलांसाठी लहान मुलासारखंच हळवं असतं. त्याच्या कष्टात आपल्यासाठी किती त्याग दडलेला असतो, हे आपल्याला कधीही पूर्णपणे कळत नाही.
कधी थांबून मागे वळून पाहा…
आपण मोठे होतो, शिक्षण घेतो, करिअर घडवतो, लग्न करतो, स्वतःचा संसार उभा करतो, आणि हळूहळू आई-वडिलांची गरज कमी वाटू लागते. कधी आपण शहराच्या गजबजाटात गुंततो, तर कधी कामाच्या व्यापात हरवतो. पण त्यांच्या आयुष्यात आपण कधीच कमी होत नाही. त्यांच्या प्रत्येक सकाळची सुरुवात आपल्यासाठी प्रार्थना करत होते, प्रत्येक रात्रीचा शेवट आपली आठवण काढण्यात होतो.
एकेकाळी आपल्याला उशिरा घरी यायला लागलं तर काळजीने बेचैन होणारी ती माऊली, आज आपल्या एका फोनसाठी वाट पाहत बसलेली असते. लहानपणी आपली प्रत्येक गरज पूर्ण करणारे ते वडील, आता आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करण्याच्या धडपडीत हरवलेले दिसतात.
आई-वडिलांचे आशीर्वाद: सर्व दुःखांवरचा उतारा
आई-वडिलांचे आशीर्वाद ही अशी अनमोल ठेव आहे, जी संकटाच्या क्षणी आपल्याला पुन्हा उभं राहायला शिकवते. त्यांच्या शब्दांमध्ये एक वेगळीच ताकद असते, जी कठीण प्रसंगांमध्येही मनाला शांत ठेवण्याचं बळ देते.
प्रत्येक वाईट प्रसंगात, अपयशाच्या प्रत्येक क्षणी, त्यांच्या डोळ्यांतून दिसणारा विश्वासच आपल्याला पुन्हा उभं राहण्याची शक्ती देतो. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यांच्या आशीर्वादामुळे त्या पेलण्याची ताकद येते.
आजच त्यांना भेटा…
कधी वेळ काढून त्यांच्या आठवणींमध्ये जगण्यापेक्षा, त्यांच्या सहवासात जगा. कधी त्यांच्या सोबत निवांत बसून त्यांच्या सुख-दुःखांची चौकशी करा. त्यांच्या जुन्या आठवणी ऐका. त्यांच्या हातचा गरम चहा घ्या.
आज आपण जेव्हा त्यांच्यासाठी वेळ काढू, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर उमलणारं हास्यच आपल्यासाठी सर्वात मोठं आशीर्वाद ठरेल. कारण उद्या कदाचित वेळ निघून गेलेली असेल. आणि जेव्हा त्यांच्या डोळ्यांतून प्रेमाने ओघळणारा अश्रू आपल्यासाठी वाहतो, तेव्हाच समजतं की खरी संपत्ती हीच होती, जी आपण कधी लक्षातच घेतली नाही.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा