मोहन वामन चव्हाण : झाडूपासून झेंडा पर्यंतची प्रेरणादायी वाटचाल
मोहन वामन चव्हाण : झाडूपासून झेंडा पर्यंतची प्रेरणादायी वाटचाल
मोहन वामन चव्हाण हे नाव घेताच, सामान्यतेतून असामान्यतेकडे झेप घेणाऱ्या एका खऱ्या समाजसेवकाचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. एरंडोलसारख्या छोट्याशा शहरात, अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेले हे व्यक्तिमत्त्व जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करत पुढे आले. त्यांच्या जीवनाची सुरुवात झाली ती झाडूपासून... आणि आज त्यांच्या हातात आहे समाजहिताचा झेंडा.
त्यांचे वडील नगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत असत. रोज हातात झाडू घेऊन शहर स्वच्छ करणारे वडील, पण मुलाच्या मनात मोठी स्वप्नं पेरणारे. गरिबी, समाजाकडून मिळणारी उपेक्षा आणि शिक्षणाअभावी झिजणाऱ्या माणसांचे वास्तव लहान वयातच मोहनजीनी पाहिले. हे वास्तव त्याच्या मनाला अस्वस्थ करत होते.
बालपण कठीण होत, पण मन मोठं होतं. त्यांनी ठरवलं – “घर बदलायचं असेल, समाज बदलायचा असेल, तर आधी स्वतःला घडवावं लागेल.” म्हणूनच शिक्षण हे त्यांच्या जीवनाचं मुख्य साधन बनलं. शाळेत ते अभ्यासात तर हुशार होतेच, पण नेतृत्वगुणांमध्ये ही नेहमीच पुढे असत. कार्यक्रमांचं आयोजन असो, किंवा एखाद्या समस्येवर उपाय – मोहनजी नेहमी पुढे यायचे.
त्यांचे आई-वडील पारंपरिक व्यवसाय करीत. झाडू-टोपल्या तयार करून विकत असत. घरात आर्थिक चणचण असली, तरी विचारांची श्रीमंती होती. लहानपणापासूनच मोहनजी समाजाचा बारकाईने अभ्यास करत होते. त्यांना सतत प्रश्न पडायचा – "आपल्या समाजाची अशी अवस्था का झाली?" आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी चळवळीच्या माध्यमातून शोधली.
त्यांनी पदवीधर शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःला संपूर्णपणे समाजकार्यासाठी झोकून दिलं. त्यांना वाटायचं, “फक्त बोलणं पुरेसं नाही, कृती हवी.” म्हणूनच त्यांनी कधीच कोणत्या ही पदासाठी लढा दिला नाही, पण जनतेसाठी मात्र सातत्याने रस्त्यावर उतरले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यांचा सहभाग बालपणापासूनच होता. संघाने त्यांना शिस्त, विचारसंपन्नता आणि कार्यक्षमता दिली. मात्र त्यांनी केवळ संघाच्या चौकटीत राहून मर्यादित काम न करता, सर्वसमावेशकतेचा मार्ग स्वीकारला. त्यांना ठाऊक होतं, की समाज हा केवळ एका वर्गाचा नसून प्रत्येक गरीब, वंचित आणि उपेक्षित घटकाचा आहे.
आज मोहन वामन चव्हाण हे राष्ट्रीय लहुजी ब्रिगेडचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. हे पद त्यांच्या कर्तृत्वाचं व संघर्षाचं फळ आहे. त्यांनी संघटनेतून केवळ आंदोलनं घडवून आणली नाहीत, तर समाजामध्ये जागृती निर्माण केली. शिक्षण, स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये त्यांनी गावागावांत जाऊन कार्य केलं.
त्यांचा स्वभाव अत्यंत साधा पण ठाम आहे. कोणता ही गर्व न करता, ते सामान्य माणसांमध्ये मिसळतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून ‘मी सर्वांचा आहे’ ही भावना सतत जाणवते. त्यांच्यासाठी राजकारण नव्हे, तर समाजकारण हेच सर्वोच्च आहे.
मोहन वामन चव्हाण यांचं जीवन म्हणजे श्रम, संघर्ष आणि सामाजिक समर्पणाचं जिवंत उदाहरण आहे. अगदी झोपडीतून उभं राहिलेलं हे व्यक्तिमत्त्व आज हजारो तरुणांसाठी प्रेरणा ठरतं आहे. त्यांचं यश केवळ यश नव्हे, तर कष्ट, श्रद्धा आणि सततच्या कार्याचं फलित आहे.
हा जीवनप्रवास सांगतो – “झाडू घेणाऱ्या हातांनी जर स्वप्नं पाहिली, तर तेच हात एक दिवस समाजासाठी झेंडा हाती घेऊन चालू शकतात.”
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा