ध्यास असल्याशिवाय यश गाठता येत नाही !
ध्यास असल्याशिवाय यश गाठता येत नाही !
ध्येय ठरवले, पावलं पुढे टाकली आणि त्या वाटचालीला समर्पितपणे ध्यास दिला की यशाचा दरवाजा नकळत उघडतो. हेच जणू काही चोपडा येथील आयडियल इंग्लिश अकॅडमीच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात अनुभवायला मिळालं. दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या या सोहळ्यात खान्देशातील सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा मंत्र दिला — “ध्यासाशिवाय साधना फलद्रूप होत नाही आणि साधनेशिवाय अध्ययन व अध्यापन अशक्य आहे.”
या समारंभात व्यासपीठावर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील, डॉ.प्रा. समाधान पाटील आणि अकॅडमीचे प्राचार्य पद्माकर पाटील यांची उपस्थिती होती. प्रा. आंधळे यांनी आपल्या भाषणात भाषेच्या सामाजिक व सांस्कृतिक परिमाणांची सखोल मांडणी केली. “भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती सौंदर्य आणि शक्ती यांचं मिलन आहे. ती जपली गेली पाहिजे, समजून घेतली पाहिजे आणि तिचा अभ्यास होणे आवश्यक आहे,” असे ते उद्गारले.
त्यांच्या भाषणाने सभागृह भारावून गेले. जुन्या-नव्या कविता, त्यातील संदर्भ, संस्कारांची बीजं यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात शब्दांविषयी नवी नाळ जुळली.
पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील व प्रा. डॉ. समाधान पाटील यांनीही विद्यार्थ्यांना जीवनातील कष्ट, प्रामाणिकपणा आणि शिस्तीचे महत्त्व पटवून दिलं. त्यांनी आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, स्वप्न बघायची आणि ती सत्यात उतरवायची प्रेरणा दिली.
प्राचार्य पद्माकर पाटील यांनी प्रस्ताविकात आयडियल इंग्लिश अकॅडमीच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. ही संस्था केवळ शालेय शिक्षणापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांचा भाषिक व बौद्धिक विकास व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यासाठी इंग्लिश ऑलिंपियाड, स्पेलिंग बी, ड्रॉईंग परीक्षा, व्याकरण चाचण्या अशा विविध स्पर्धा राबविल्या जातात.
या कार्यक्रमात आयडियल स्टुडंट ऑफ द इयर, सुपर स्पेलर्स, सुपर रिडर्स, बेस्ट बुक किपर्स या उपक्रमांतून उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदक देऊन गौरवण्यात आले. तेव्हा विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत चमक होती, कारण त्यांनी मेहनतीचं फळ स्वतःच्या हातात पाहिलं होतं.
अकॅडमीचे प्राचार्य पद्माकर पाटील यांना नुकताच लोकमत शिलेदार या पुरस्काराने गौरविण्यात आले. या यशाचा गौरव करण्यासाठी प्रमुख अतिथी प्रा. आंधळे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. हा क्षण केवळ गौरवाचा नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये “ध्येय गाठण्यासाठी ध्यास हवा” हा संदेश बिंबवणारा होता.
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी विद्यार्थिनी जानवी पाटील, यशश्री चव्हाण, श्रेया मोरे, प्रगती पाटील, थोरवी सोनवणे, दीप पाटील, देवांशू सोनवणे, मिहीर पाटील, दुर्वा बाविस्कर, विधी चौधरी, प्रज्ञा चौधरी यांनी टप्प्याटप्प्याने उत्तम सादरीकरण केलं. त्यांचं आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण हेच दाखवून देत होतं की ही पिढी केवळ ज्ञान घेणारी नाही, तर ते प्रभावीपणे मांडणारी आहे. शेवटी यशश्री चव्हाण हिने आभार मानले आणि या तीन तासांच्या प्रवासाची सुंदर सांगता केली.
हा संपूर्ण समारंभ म्हणजे शिक्षणाचा, संस्काराचा आणि सृजनशीलतेचा एक अद्वितीय संगम होता. यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली —
"ध्येय असो कितीही उंच, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ध्यासच तो खंबीर पूल असतो."
आणि अशा प्रेरणादायी क्षणातूनच नवा उद्या आकार घेतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा