धनश्री ऑप्टिकल्सचे संचालक मोहनसिंग (बाळासाहेब) पाटील – शून्यातून विश्व उभारणारा संघर्षमय प्रवास
धनश्री ऑप्टिकल्सचे संचालक मोहनसिंग (बाळासाहेब) पाटील – शून्यातून विश्व उभारणारा संघर्षमय प्रवास
"स्वप्न मोठं असावं लागतं, पण त्याहून मोठं त्यासाठीचं झगडणं असतं." या ओळींचा सार्थ अनुभव मोहनसिंग धनसिंग पाटील यांच्या जीवनप्रवासातून प्रकर्षाने जाणवतो. एरंडोल शहरातील ‘धनश्री ऑप्टिकल्स’ हे आज तालुक्यातील एक विश्वसनीय आणि लोकप्रिय नाव आहे. परंतु या नावामागे दडलेली संघर्षकथा आणि आत्मविश्वासाने जगलेल्या वाटचालीची कहाणी खरंच मन हेलावून टाकते.
बाळासाहेबांचा जन्म धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ या छोट्याशा गावात एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांनी गावाचे सरपंच म्हणून काम पाहिले, मात्र दुर्दैवाने चुकीच्या संगतीत पडून व्यसनांच्या आहारी गेले. वडिलांच्या अकाली निधनाने केवळ १६व्या वर्षी बाळासाहेबांच्या खांद्यावर संपूर्ण घराची जबाबदारी येऊन पडली.
ते वय जेव्हा इतर मुले शिक्षणात, खेळात आणि आयुष्याची दिशा ठरवण्यात मग्न असतात, तेव्हा बाळासाहेब मात्र आपल्या कुटुंबाच्या भवितव्याची लढाई लढत होते. मोठे भाऊ म्हणून बहिणींची लग्न, भावाचे लग्न, घरातील जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या संसाराचे स्वप्न… या सर्व गोष्टी त्यांनी एकटे खांद्यावर घेतल्या.
कधीच तक्रार नाही, कधीच आळस नाही – केवळ स्वप्नपूर्तीसाठी अविरत मेहनत. स्वतःच्या शिक्षणाची वाटचाल स्वतःच्या पायांवर उभी करताना त्यांनी किती तरी संकटांना सामोरे जावे लागले, पण त्यांनी कधी ही हार मानली नाही.
समोर होते एकच ध्येय – स्वतःचं काही तरी निर्माण करायचं, स्वतःच्या कष्टातून नाव कमवायचं. हेच स्वप्न होतं “धनश्री ऑप्टिकल्स”. एका छोट्याशा दुकानातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे. “धनश्री ऑप्टिकल्स” हे नाव आज लोक प्रेमाने, विश्वासाने उच्चारतात.
बाळासाहेबांच्या यशामध्ये फक्त व्यावसायिक कौशल्य नाही, तर आहे माणुसकीचा स्पर्श. ते अत्यंत साधे, सच्चे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या दुकानात केवळ चष्म्यांची विक्री होत नाही, तिथे एक विश्वास मिळतो, एक आत्मीयता अनुभवास येते.
कमी पैशांत गुणवत्ता पूर्ण चष्मे उपलब्ध करून देणे, गरजूंना अल्पदरात डोळ्यांची तपासणी करून देणे, मोफत नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करणे – या त्यांच्या सामाजिक बांधिलकीला आज ही अनेक जण मोठ्या आदराने आठवतात.
बाळासाहेबांनी केवळ स्वतःच्या यशात रमून न जाता आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त केलं आणि त्यांना डोळ्यांचे डॉक्टर बनवलं.त्यांना एक मुलगी असून तिच्यावर उत्तम संस्कार झाले आहेत. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या त्यांच्या पत्नीचे योगदान त्यांच्या यशामागे मोलाचे आहे. जिथे अनेक जण परिस्थितीपुढे झुकतात, तिथे बाळासाहेबांनी संघर्षातून यशाचा मार्ग शोधला.
त्यांचा हा जीवन प्रवास म्हणजे खऱ्या अर्थाने "शून्यातून विश्व निर्माण करणं" काय असतं याचं आदर्श उदाहरण आहे.
आज एरंडोल शहरात त्यांचा मित्र परिवार मोठा आहे. हसतमुख, खेळकर आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे बाळासाहेब म्हणजेच समाजात असावं असं व्यक्तिमत्त्व. अशा व्यक्ती आपल्या समाजात असणं ही खरंच अभिमानाची बाब आहे.
त्यांचा प्रवास केवळ प्रेरणादायी नसून प्रत्येक युवकासाठी एक सशक्त शिकवण आहे – परिस्थिती किती ही कठीण असली तरी, जर तुमच्यात मेहनत, निष्ठा आणि जिद्द असेल, तर यश नक्कीच तुमच्या पावलांपाशी येतं.
– हा प्रवास नक्कीच एक जिवंत प्रेरणा आहे.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा