सर्वसामान्यांच्या मनातील नगराध्यक्ष – स्वर्गीय सुभाष शिवचरण बिर्ला
सर्वसामान्यांच्या मनातील नगराध्यक्ष – स्वर्गीय सुभाष शिवचरण बिर्ला
सामान्य कुटुंबात जन्म घेऊन आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर समाज मनावर अमिट छाप पाडणाऱ्या व्यक्ती फार थोड्या असतात. त्यां पैकीच एक तेजस्वी, अजातशत्रू आणि सदैव प्रेरणा देणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वर्गीय सुभाष शिवचरण बिर्ला. एरंडोल सारख्या शांत गावात मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेले सुभाषराव पुढे संपूर्ण परिसरातील जनतेच्या मनात श्रद्धेचा, विश्वासाचा आणि प्रेमाचा अढळ आधारस्तंभ बनले.
बालवयापासूनच मनात लोकसेवेची जिवंत तळमळ होती. शालेय जीवनातच त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांचं बोलणं, वागणं, आणि सर्वांशी मनमोकळंपणाने मिसळणं – यामुळे ते लवकरच सर्वांचे लाडके बनले. त्यांच्यातील संयम, सहिष्णुता, समतेची भावना आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची हातोटी हीच त्यांची खरी ओळख होती. नेतृत्वगुण त्यांच्यात अगदी नैसर्गिकरित्या होते.
त्यांच्या विचारांवर मा. सुरेशदादा जैन आणि मा.मु.गं. पवार यांचा मोठा प्रभाव होता. तर घरातून मिळालेली प्रेरणा आणि मार्गदर्शन म्हणजे स्व.आमदार श्री. सितारामभाई बिर्ला – त्यांचे आजोबा. आजोबांच्या सार्वजनिक कार्याने सुभाषरावांच्या मनात जनसेवेचे बीज रोवले. आजोबांची भाषणशैली, जनतेशी जोडलेली संवादकौशल्य, आणि कामातील प्रामाणिकपणा हे सारे गुण त्यांनी मनापासून आत्मसात केले.
"पद हे प्रतिष्ठेसाठी नव्हे, तर सेवेसाठी असावं" या विचारधारेवर ठाम राहून त्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरू केली. कोणताही प्रश्न, समस्या असो – त्यांनी त्याकडे कधी ही राजकीय कोनातून न पाहता, ती स्वतःची जबाबदारी मानून हाताळली. त्यामुळेच जनतेचा त्यांच्या वरचा विश्वास दिवसेंदिवस अधिक गडद होत गेला.
एरंडोल नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांची निवड होणं हे त्यांच्या कार्यशक्तीचं आणि लोकांच्या निष्ठेचं उत्तम उदाहरण ठरलं. त्यांनी हा सन्मान पद म्हणून नव्हे, तर संधी म्हणून पाहिला. संधी – आपल्या शहराच्या समृद्धीसाठी काही तरी वेगळं, चांगलं करण्याची. त्यांनी विकासाच्या दृष्टीने अनेक कामांची पायाभरणी केली. पाण्याचा प्रश्न असो, रस्त्यांची अवस्था असो किंवा स्वच्छतेचा विषय – त्यांनी प्रत्येक मुद्द्यावर सखोल विचार करून ठोस उपाययोजना केल्या.
गरिबांचा, श्रमिकांचा, सामान्यांचा – सुभाषराव कायम आवाज बनून राहिले. त्यांच्या घरी येणारा कोणता ही माणूस रिकामा परतला नाही. त्यांच्या दारात नेहमीच आशेचा उजेड असायचा.
नगराध्यक्ष पदाव्यतिरिक्त, त्यांनी 'कृ.बो.को.' सारख्या राज्यस्तरीय संस्थेच्या संचालकपदाची जबाबदारी ही यशस्वीरित्या सांभाळली. एरंडोल खरेदी-विक्री संघाचे अध्यक्षपद त्यांनी पाच वर्षे उत्तम रीतीने पार पाडलं. मात्र,सर्वात विशेष उल्लेख करावा लागेल तो म्हणजे बोरगाव (ता. धरणगाव) येथील विकास सहकारी सोसायटीचे सलग चाळीस वर्षे बिनविरोध अध्यक्ष राहणे ही बाब त्यांच्या नेतृत्वगुणांची आणि जनतेच्या अपार विश्वासाची सर्वात बोलकी साक्ष आहे.
त्यांच्या या सार्वजनिक आणि सामाजिक कार्याचा वसा आज त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक नितीन बिर्ला मोठ्या निष्ठेने पुढे नेत आहेत. वडिलांच्या मार्गदर्शनाचा ठेवा, जनतेसाठी झिजण्याची तळमळ आणि विकासाच्या वाटचालीतील त्यांची प्रत्यक्ष सहभागाची वृत्ती – हे सारे सुभाषरावांच्या कार्याची जिवंत आठवण करून देतात. वडिलांच्या पदचिन्हांवर चालताना त्यांनी ही समाजमनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
राजकारणात असून ही सुभाषराव नेहमीच संयमी, सौम्य आणि शिष्टाचारप्रिय होते. विरोधक ही त्यांच्या नम्रतेचं कौतुक करत. राजकारणात शत्रू निर्माण करणे सहज शक्य असते, पण शत्रू न करता सगळ्यांना आपलंसं करणं – हे केवळ सुभाषरावां सारख्यांच्याच वाट्याला येतं.
त्यांचं राहणीमान अत्यंत साध होतं. गमतीने लोक म्हणायचे, “सुभाषराव कुठं ही गेले तरी तिथले होऊन जातात.” ते इतके लोभस, प्रेमळ आणि सुसंस्कृत होते की त्यांच्या एका हास्याने ही माणसाच्या मनावर चिरस्थायी ठसा उमटायचा.
ते पदाने मोठे नव्हते, तर मनाने मोठे होते. म्हणूनच त्यांना लोक नेहमी “आपले” समजत. जनतेच्या मनात घर करून राहिलेलं असं व्यक्तिमत्त्व विरळच.
आज सुभाषराव आपल्या मध्ये नाहीत – ही गोष्ट मनाला अस्वस्थ करणारी आहे. पण त्यांच्या आठवणी, त्यांचं कार्य आणि त्यांची शिकवण – हीच त्यांची खरी आठवण बनून आपल्या सोबत कायमची राहणार आहे. त्यांनी नेहमीच एक गोष्ट ठामपणे सांगितली होती –
"पदं येतात, जातात; पण माणसाच्या मनातली जागा कायम राहते – हेच खरं यश!"
हीच त्यांची विचारसंपन्नता आणि माणुसकीची खरी ओळख होती.
आजच्या तरुण पिढीने त्यांच्या कार्यातून आणि जीवनातून प्रेरणा घेतली, तर समाज घडवण्याच्या दिशेने खऱ्या अर्थाने पाऊल उचललं जाईल.
स्वर्गीय सुभाष शिवचरण बिर्ला हे एक उत्तम नेता होते, पण त्याहून ही मोठं – ते एक उत्तम माणूस होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे. मात्र त्यांच्या विचारांनी चालत राहणं – हीच त्यांना अर्पण केलेली खरी श्रद्धांजली ठरेल.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा