जगदीशभाऊ ठाकूर : समर्पित जीवनाची जिवंत प्रेरणा



जगदीशभाऊ ठाकूर : समर्पित जीवनाची जिवंत प्रेरणा

एरंडोल हे शहर आपल्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. याच नगरीत एका साधारण कुटुंबात जन्म घेऊन, असाधारण कार्याचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचं नाव म्हणजे जगदीशभाऊ ठाकूर. किराणा दुकान चालवणाऱ्या कष्टकरी वडिलांच्या घरात वाढलेले भाऊ बालपणापासूनच काहीसे वेगळे भासत. त्यांच्या डोळ्यांत समाजासाठी काही तरी भव्य घडवण्याची चमक होती, तर मनात होती निस्वार्थ सेवेची जळणारी तळमळ.

अवघ्या वयाचा सातव्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत पाऊल टाकलं आणि तिथूनच त्यांच्या समर्पित जीवन यात्रेला आरंभ झाला. लहान वयातच संघाच्या विचारधारेशी ते पूर्णपणे एकरूप झाले. ईश्वरदत्त नेतृत्वगुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून सातत्याने प्रकट होत असत. त्यामुळे त्यांचं आजूबाजचं वातावरण जिवलग मित्रांनी नेहमीच भरलेलं असे. त्यांच्या बोलण्यात वजन, विचारांत स्पष्टता आणि कृतीत सातत्य दिसून येत असे.

एरंडोल शहरातून प्रथम प्रचारक होण्याचा मान त्यांना मिळाला, आणि ही घटना त्यांच्या जीवनातील एक सोनेरी पर्व ठरली. भाऊ केवळ संघाचे कार्यकर्ते नव्हते, तर त्या विचारसरणीचे चालते-बोलते उदाहरण होते. प्रचारक म्हणून त्यांनी कार्य स्वीकारल्यानंतर स्वतःचा विसर पडत समाजासाठी झोकून दिलं. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा समाजसेवेसाठी वाहिलेला होता.

त्यांचं संघटनकौशल्य अत्यंत प्रभावी होतं. त्यामुळे शहरातील असंख्य युवक त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन संघाच्या कार्यात सहभागी झाले. त्यांच्या प्रत्येक कृतीत विचारांची खोल बैठक आणि अमलात आणण्याची चिकाटी दिसून येई. काहींनी त्यांना "कट्टर हिंदुत्ववादी" म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या विचारांचा गाभा धर्मापुरता सीमित नसून सामाजिक समतेचा आणि राष्ट्रीयतेचा होता.

पांडव वाड्याचा प्रथम संघर्ष हे त्यांच्या नेतृत्वगुणाचं एक ठळक उदाहरण म्हणता येईल. शंकराचार्यांच्या उपस्थितीत त्यांनी ही पवित्र जागा सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी व त्यांचा मित्रांनी खुली केली. हा लढा एखाद्या वास्तूसाठी नव्हता, तर तो होता समतेच्या समाजाच्या विचारासाठी.

राजकीय पार्श्वभूमी नसता नाही त्यांनी जनतेच्या मनात अढळ स्थान मिळवलं. नगरसेवक म्हणून त्यांची निवड ही केवळ निवडणूक नव्हती, ती होती लोकांच्या विश्वासाची मोहोर. भाऊंनी जनतेशी आपुलकीचं नातं जपलं. त्यांचं कार्यालय सर्वांसाठी सदैव खुलं असायचं. तिथं येणारा प्रत्येक माणूस त्यांच्यासमोर छोटा वाटत नसे त्यांच्या नजरेतला आत्मीयपणा कोणालाही मोठेपण देत असे.

सध्या ते एरंडोलच्या दीडशे वर्षांच्या इतिहास लाभलेल्या नगर वाचनालयाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. वाचनालय म्हणजे केवळ पुस्तकांचं दालन नव्हे, तर विचारांचं मंदिर असतं, आणि भाऊंनी ते मंदिर विचारांच्या प्रकाशाने उजळवलं आहे. त्यांनी प्रत्येक वयोगटाला सामावून घेत नव्या पिढीत विचारांची मशाल पेटवली.

त्यांचं नेतृत्व निस्वार्थ सेवेचं प्रतीक आहे. त्यांनी कधीही गटबाजी, वैयक्तिक स्वार्थ किंवा राजकीय लाभ यांना स्थान दिलं नाही. त्यांचं संपूर्ण राजकारण हे सेवाभाव आणि समर्पण यांच्यावर आधारलेलं आहे.

जगदीशभाऊ ठाकूर हे केवळ एक नाव नाही, ते एक प्रेरणादायी शक्ती आहेत. साध्या परिस्थितीतून उभं राहत, त्यांनी ज्या प्रकारे समाजासाठी झटून कार्य केलं, त्यातून लाखो तरुणांसाठी ते दीपस्तंभ ठरले आहेत. त्यांच्या कार्यामुळे एरंडोलच्या मातीवर, लोकांच्या आठवणींवर आणि हृदयावर त्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेलं आहे.

आज ही अनेकांच्या मनात असं वाटतं – "आपल्या शहरात भाऊसारखं कोणी असणं म्हणजे भाग्याचं लक्षण आहे." त्यांच्या साधेपणात तेज आहे, आणि त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे समाजासाठी अखंड झिजलेलं आयुष्य आहे.

भविष्यात किती ही पिढ्या बदलल्या, काळ पुढे गेला, तरी एरंडोलच्या आठवणींच्या पानांवर कट्टर हिंदुत्ववादी जगदीशभाऊ ठाकूर यांचं नाव सन्मानाने व तेजाने कोरलेलं राहील. कारण ते केवळ एक नेता नव्हते – ते होते समाजासाठी अखंड झटणाऱ्या सच्च्या सेवकांचं जिवंत प्रतीक.

© दीपक पवार(संपादक) खान्देश माझा
  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !