स्वतःच्या कर्तृत्वावर घडलेली यशोगाथा – संदीप प्रल्हाद पाटील


स्वतःच्या कर्तृत्वावर घडलेली यशोगाथा – संदीप प्रल्हाद पाटील

धरणगाव तालुक्यातील भोद खुर्द या लहानशा गावात जन्मलेले संदीप प्रल्हाद पाटील हे नाव आज अनेकांसाठी प्रेरणेचे स्रोत ठरले आहे. एका अत्यंत सामान्य व गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरात आर्थिक टंचाई होती, जीवन म्हणजे संघर्षच होता. बालपण अपार कठीणतेत गेले. लहान वयातच वडिलांचे छत्र हरपले आणि संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर म्हणजेच विठाआई वर येऊन पडली.

आईच्या डोळ्यांतले अश्रू, आणि दोन वेळच्या अन्नासाठीचा तिचा संघर्ष संदीप यांनी जवळून अनुभवला. परिस्थिती इतकी बिकट होती की, अनेक वेळा उपासमार ही ओढवायची. त्याच वेळी त्यांनी मनाशी ठाम निर्धार केला – “आयुष्य बदलायचं असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही.” त्यामुळे शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिलं.

घरात कोणती ही आर्थिक मदत नव्हती. मात्र जिद्द, आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी यामुळे त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा निश्चय केला. शाळेनंतर बिगारी कामं केली, रेल्वे स्टेशनवर हमाली केली, उन्हातान्हात कष्ट उपसले, पण शिकण्याची इच्छा कधीच मावळली नाही. स्वतःच्या कष्टाच्या बळावर त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.

या जिद्दीला अखेर फळ मिळालं. संदीप आणि त्यांचे भाऊ भारतीय लष्करात दाखल झाले. देशसेवा हाच सर्वोच्च धर्म मानून त्यांनी निष्ठेने आपली जबाबदारी पार पाडली. सैन्यसेवेत मिळालेल्या शिस्तीने आणि अनुभवाने त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले. सेवानिवृत्ती नंतर त्यांनी आपल्या मूळ गावी परत येण्याचा निर्णय घेतला.

गावासाठी काही तरी करायचं, ही भावना त्यांच्या मनात प्रबळ झाली. त्यातूनच त्यांनी ‘सेवा सुपर स्मॉल’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजूंना मदतीचा हात दिला. समाजसेवा हे केवळ शब्द नव्हते, तर ती त्यांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाली होती.

सेवानिवृत्ती नंतर ही त्यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही. कायद्याची माहिती असणं समाजसेवेसाठी आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी एलएलबीची पदवी संपादन केली. त्यांच्या शिक्षण प्रेमाने आज अनेक तरुणांना प्रेरणा मिळते आहे.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी व त्यांचे मित्र विजय पाटील यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी स्वतःचं पॅनल उभं केलं. विशेष म्हणजे त्यांच्या प्रामाणिक कार्याची आणि सेवावृत्तीची जनतेला खात्री होती. त्यामुळे संपूर्ण पॅनल बिनविरोध निवडून आलं. ही निवडणूक नव्हती, तर त्यांच्या कार्याची लोकांनी दिलेली सन्मानाची पोचपावती होती.

आज संदीप पाटील हे नाव म्हणजे निर्धार, आत्मविश्वास, आणि कष्टाने घडवलेलं स्वप्न आहे. त्यांनी कोणती ही शासकीय मदत न घेता, फक्त आपल्या मेहनतीच्या बळावर स्वतःचं आयुष्य घडवलं. त्यांच्या संघर्षाने आणि यशाने अनेक तरुणांना प्रेरणा दिली आहे.

त्यांच्या यशामागे केवळ त्यांची मेहनत नाही, तर त्यांच्या आईचा त्याग, तिच्या कष्टांची पावती ही आहे. आज ते केवळ उपसरपंच नाहीत, तर एक विचार, एक आदर्श आहेत. ते सांगून जातात – “परिस्थिती किती ही कठीण असली, तरी जर प्रयत्न आणि जिद्द सतत असली, तर अशक्य काहीच नाही.”

त्यांच्या जीवनकथेतून एक सत्य पुन्हा अधोरेखित होतं “कष्टाला पर्याय नाही, आणि सेवेला वयाचं बंधन नाही.”

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !