शून्यातून विश्व घडवणारा गोसेवक : मेहुल चेंनकरण जैन यांची जीवनगाथा
शून्यातून विश्व घडवणारा गोसेवक : मेहुल चेंनकरण जैन यांची जीवनगाथा
आपल्या देशात काही व्यक्ती अशा असतात, ज्या मोठमोठ्या घोषणा करत नाहीत, प्रसिद्धीच्या झोतात राहत नाहीत; मात्र त्यांच्या कृतीमुळे समाजाला नवा मार्ग मिळतो. अशाच निस्वार्थ, कष्टाळू आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्वाचे नाव म्हणजे — मेहुल चेंनकरण जैन.
जळगावसारख्या छोट्या शहरात, एका अत्यंत साध्या आणि कष्टकरी कुटुंबात मेहुलजींचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचा रद्दी विक्रीचा व्यवसाय होता. घराची आर्थिक परिस्थिती अतिशय कठीण होती. बालपण हालअपेष्टांत गेले, परंतु या कठीण काळाने त्यांच्या मनात एक विचार खोलवर रुजवला — "या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही."
हाच निर्धार घेऊन त्यांनी शिक्षणाच्या वाटेवर पाय ठेवला. अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी बी.टेक.ची पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण होताच एका नामांकित कंपनीत उच्च पदावर नोकरी ही मिळाली. घरात आनंदाचे क्षण आले, पण त्यांच्या मनात मात्र एक वेगळीच ओढ सतत खदखदत होती — गायांची सेवा.
लहानपणापासूनच गायींबाबत त्यांना विशेष प्रेम होते. रस्त्यावर उपाशी गाय दिसली, की ती कुणाची वाट पाहत आहे हे विसरून ते तिची काळजी घ्यायचे, तिला चारा घालायचे. ही ओढ इतकी गहिरी होती की, अखेर त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि ‘गिर नॅचरल इंडिया’ या नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
गिर गायींच्या संवर्धनावर आधारित ही संस्था केवळ एक व्यवसाय नसून एक सामाजिक चळवळ ठरली आहे. नैसर्गिकता, पारंपरिक ज्ञान, शुद्धता आणि गोमातेशी असलेली नाळ या तत्वांवर आधारित उत्पादने त्यांनी तयार केली. यामध्ये आयुर्वेदिक दवाखाने, नैसर्गिक गो-उत्पादने आणि आरोग्यवर्धक पंचगव्य यांचा समावेश आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेकांना रोजगार मिळाला आणि देशी गायींच्या संवर्धनाला नवा आयाम मिळाला.
देशी गायींच्या सन्मानासाठी उचललेले पाऊल हे त्यांच्या ठाम विचारातून आले. त्यांनी एक महत्त्वाचा मूलमंत्र स्वीकारला — “देशी गायींना जर स्वाभिमानाने जगवायचं असेल, तर त्यांना स्वावलंबी बनवावं लागेल.” याच दृष्टीकोनातून त्यांनी "समर्पण गोतीर्थ गोशाळा, मराठखेडे"चे संचालक श्री. योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने, गायींच्या गवरीवर आधारित अंत्येष्टी प्रक्रिया लोकांसाठी सुरू केली.
ही एक आगळी-वेगळी संकल्पना होती — हिंदू धर्मातील सोळावा संस्कार अंतिम संस्कार आपण देशी गाईच्या गौरीवर करून धर्मशास्त्र आणि पर्यावरण यांचा उत्तम संतुलन साधून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कारण लाकूड न कापता अशाप्रकारे अंतिम संस्कार केल्याने देशी गाय आणि झाडे दोघांची संरक्षण होते.
त्याच बरोबर, देशी गायीच्या पंचगव्यापासून — दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण — विविध आयुर्वेदिक औषधी तयार करण्यात ही त्यांनी पुढाकार घेतला. याचा इतका सकारात्मक परिणाम झाला की, प्रमोद चौधरी यांची बंद पडण्याच्या मार्गावर असलेली कामधेनु गो सेवा केंद्र, पिंप्री ही गोशाळा नव्याने उभी राहिली आणि आज ही यशस्वीपणे कार्यरत आहे.
आजही ते एक गोसेवकच आहेत…
आज एवढे मोठे यश मिळवूनही मेहुलजींनी आपली मूळ ओळख जपली आहे. ते आजही पिंप्री येथील गोशाळेत नियमितपणे जातात. गायींना चारा घालणे, त्यांची सेवा करणे, त्यांच्या कुजबुजीत मन रमवणे — हेच त्यांचे नित्याचे कार्य आहे. त्या क्षणात त्यांच्या डोळ्यांत दिसणारे समाधान कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहे.
ते म्हणतात — “गायींशी संवाद साधणं म्हणजे आईशी बोलणं… ती काही न बोलताही सर्व काही समजून घेते.”
तरुणांसाठी प्रेरणास्तंभ
त्यांचे जीवन आजच्या तरुण पिढीसाठी एक जिवंत प्रेरणा आहे. जन्म लहानशा घरात झाला, कुणाचे पाठबळ नव्हते, तरी ही केवळ कष्ट, सेवाभाव, शिक्षण आणि दृढनिश्चय यांच्या जोरावर त्यांनी शून्यातून विश्व उभारले.
आजच्या तरुणांनी हे शिकले पाहिजे की, केवळ स्वतःसाठी नव्हे, तर समाजासाठी काही तरी देणं, हेच खरे यश आहे. श्रीमंती मिळवणे ही मोठी गोष्ट नाही, तर त्या यशाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करणे, हेच खरे महान कार्य आहे.
मेहुल चेंनकरण जैन — एक नाव, एक विचार, एक ध्येय, एक गोसेवक… आणि खऱ्या अर्थाने शून्यातून विश्व घडवणारा एक प्रेरणास्तंभ.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा