नवल महाजन : मातीच्या माणसाने घडवलेलं विश्व
नवल महाजन : मातीच्या माणसाने घडवलेलं विश्व
ज्यांचं संपूर्ण आयुष्यच एक प्रेरणादायी अध्याय असतं, अशा व्यक्तींना ओळखण्यासाठी मोठ्या व्याख्यानांची आवश्यकता नसते. त्यांच्या साधेपणातच मोठेपण सामावलेलं असतं. नवल रवींद्र महाजन यांचं जीवन ही अशाच एका सामान्य वाटणाऱ्या, पण असामान्य प्रवासाची प्रेरक गोष्ट आहे.
धानोरा, तालुका चोपडा – एक छोटंसं, शांत गाव. मातीशी नातं सांगणारं आणि काळ्या आईच्या कुशीत राबणाऱ्या हातांचं गाव. अशाच एका कष्टकरी कुटुंबात नवल यांचा जन्म झाला. त्यांचे आई-वडील शेतमजूर. घरात सुबत्ता नव्हती, पण माणुसकी पुरेपूर होती. बालपणापासूनच नवल यांना समजून आलं होतं की, गरिबीचा शाप तोडायचा असेल तर फक्त मेहनतीवरच विश्वास ठेवावा लागेल.
शाळा संपली की शेतात जायचं, आणि शेतातून आल्यावर पुन्हा अभ्यास. आईच्या हाताखाली काम करताना ही त्यांच्या डोळ्यांत शिक्षणाची स्वप्नं लखलखायची. पाटीवरची अक्षरं आणि मातीतली धान्यं – दोन्ही हाताळत त्यांनी बारावी पर्यंतचं शिक्षण स्वतःच्या जिद्दीने पूर्ण केलं. दोन बहिणींचा आधार आणि आई-वडिलांचा आधारस्तंभ असलेला नवल हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा.
पण मनात त्यांनी ठाम निर्धार केला होता – "आपण काही तरी मोठं करायचं!"
आणि म्हणूनच, एक दिवस त्यांनी मोठा निर्णय घेतला – गाव सोडायचा. आई-वडिलांचा एकुलता एक आधार असून ही, त्यांना मागं ठेवत ते शहराच्या दिशेनं निघाले. डोळ्यांत स्वप्नं, हृदयात धडधड, आणि पायाखाली निर्धार.
सुरत नगरीत त्यांनी पाय ठेवला. या शहराने त्यांच्या चिकाटीची परीक्षा घेतली, पण त्यांनी एकदा ही हार मानली नाही. एका कंपनीत साध्या पदावर कामाला लागले... आणि आज २२ वर्षां नंतर ही, ते त्याच कंपनीत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कार्यरत आहेत.
नवल यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या साधेपणात असलेली प्रखर ताकद. त्यांनी केवळ जग जिंकलं नाही, तर स्वतःला घडवलं. आज त्यांना पाच भाषांचं ज्ञान आहे – मराठी, हिंदी, गुजराती, अरबी, मारवाडी आणि थोडंसं इंग्रजीसुद्धा. कोणत्याही भाषेत माणसाशी संवाद साधताना त्यांचं मन बोलतं – म्हणूनच ते जिथे गेले, तिथे माणसं त्यांच्या प्रेमात पडतात.
ते केवळ प्रामाणिक नाहीत, तर त्यांनी प्रामाणिकपणं जगणं निवडलं आहे. कोणती ही घमेंड नाही, कोणता ही दिखावा नाही. एका साध्याशा खोलीत राहणारे, स्वतःच्या श्रमावर जगणारे, आणि प्रत्येक पैशाला आईच्या कष्टाची किंमत समजणारे हे व्यक्तिमत्त्व खरंच अनमोल आहे.
शहरात येऊन अनेक माणसं आपली मूळ ओळख विसरतात. पण नवल यांच्यातलं गाव अजून ही जिवंत आहे. त्यांच्या बोलण्यात अजून ही आईचा सुस्कार आहे, त्यांच्या डोळ्यांत वडिलांच्या आठवणींचा ओलावा आहे. आणि विशेष म्हणजे, दोन्ही बहिणींचं विवाह अगदी आनंदाने आणि यशस्वीपणे पार पडलं आहे, हीच त्यांच्या जीवनातली खरी संपत्ती आहे.
नवल यांचं जीवन सांगतं – प्रगतीसाठी श्रीमंती लागतेच असं नाही, लागतो तो फक्त निश्चय. कुटुंबासाठी झगडणं हीच खरी श्रीमंती असते. स्वतःचं विश्व उभं करणं शक्य आहे – जर मनात प्रामाणिकपणा आणि मेहनत असेल तर.
आज नवल महाजन हे केवळ एका कंपनीचे कर्मचारी नाहीत – ते एक जिवंत उदाहरण आहेत की, कोणत्या ही परिस्थितीत जर माणूस खऱ्या अर्थाने प्रामाणिक असेल, तर तो शून्यातून ही विश्व निर्माण करू शकतो.
त्यांची ही कहाणी लाखोंना प्रेरणा देणारी आहे... आणि आपल्याला सतत हेच आठवण करून देणारी आहे की, खरा हिरा कधीच फक्त चमकून उठत नाही – तो काळोखात ही आपली किंमत सिद्ध करतो.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा